कर्जमाफी योजना
कर्जमाफी योजना

साडेअडतीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत ३८ लाख ५२ हजार खातेधारकांच्या बँक खात्यात १४ हजार ९८३ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याची व ऑनलाइन अर्ज करण्याची शुक्रवारी (ता.१५) अंतिम मुदत होती.   गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली; तसेच २०१५-१६, २०१६-१७  या वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही घोषित केले होते. सुरवातीला ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल, अशी घोषणा सरकारने केली होती. दरम्यान, २००८ मधील कर्जमाफीच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या २००१ ते २००९ पर्यंत थकीत असलेल्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा सरकारने अर्थसंकल्पी अधिवेशनात केली. २०१६-१७ मधील जे थकीत खातेदार आहेत, त्याचा आढावा घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य अशी योजना तयार केली जाईल, असेही सांगण्यात आले. तसेच पीककर्जासोबत मुदत कर्जाचाही समावेश करून यात शेती, इमूपालन, शेडनेट, पॉलिहाउस यासाठीच्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचाही समावेश केला जाणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. वन टाइम सेटलमेंटची मुदतही सरकारने ३० जूनपर्यंत वाढवली आहे. प्रत्यक्षात, योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८ लाख ५२ हजार इतकी आहे. त्यांच्या खात्यात १४ हजार ९८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या योजनेत शेतकऱ्यांच्या संख्येसोबत कर्जमाफीच्या रकमेत आता फारशी वाढ होईल, याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com