‘व्हाउचर्स’ गायब करून साडेसहा कोटी हडपले

जलयुक्त शिवार गैरव्यवहार
जलयुक्त शिवार गैरव्यवहार

पुणे : जलयुक्त शिवार अभियानात कृषी अधिकारी व ठेकेदारांच्या सोनेरी टोळीने बीड घोटाळ्यात सहा कोटी ८५ लाख हडपल्याचे उघड झाले आहे. कामाची तपासणी करण्याचे आयुक्तालयाचे आदेश असतानाही व्हाउचर्स गायब करून पेमेंट करण्याचा निर्णय कोणी घेतला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.    कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्या आदेशानुसार जलयुक्त घोटाळ्याबाबत बीड जिल्ह्यातील गुरुवारी (ता. २८) १३८ ठेकेदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. मृद्‌संधारण व जलसंधारणाची कामे केल्याच्या खोट्या नोंदी करून निधी लाटण्यात आलेला आहे.  ‘‘कृषी विभागाने पोलिसांकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात अपहाराची रक्कम केवळ अडीच कोटीची आहे. मात्र, पावणेसात कोटीच्या घोटाळ्याबाबत सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. ही चौकशी झाल्यास काही राजकीय नेतेदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे’’, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. बीड जिल्ह्यात जलयुक्तच्या कामांमध्ये आधीच्या चौकशीत सात कोटी ९२ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. त्यापैकी चार कोटी रुपये थेट वसूल करण्याचे आदेशदेखील देण्यात आलेले असून हडपलेल्या या रकमेची वसुली झालेली नाही.  कृषी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरून प्रशासकीय मंजुरी न घेता तसेच अनुदान मंजूर नसतानाही पावणेसात कोटीची कामे केली आहेत. या कामांची १०० टक्के तपासणी झाल्याशिवाय पेमेंट करू नका, असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिलेले होते. मात्र, आदेश डावलून बनावट व्हाऊचर्सच्या साहाय्याने पेमेंट केले गेले आहे. यापूर्वीच्या चौकशीत ही व्हाऊचर्स सादर केली गेली नाहीत. ही कागदपत्रे कोणी गायब केली याचा तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  दरम्यान, १३८ ठेकेदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, अटकेसाठी अत्यावश्यक असलेली पुरावे सादर करण्याची आमची तयारी असल्याचे कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com