कृषी अधिकाऱ्यांनो गावाकडे चला !

कृषी अधिकाऱ्यांनो गावाकडे चला !
कृषी अधिकाऱ्यांनो गावाकडे चला !

पुणे: कृषी खात्यातील बदल्या करण्यासाठी हजार अडथळे येऊनदेखील विद्यामान कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी समुपदेशनाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. वर्षानुवर्षे कार्यालयांमध्ये वेटोळे घालून बसलेल्या काही खुर्चीबहाद्दरांना आयुक्तांनी थेट गावाकडे पाठविले. ऑनलाइन बदल्यांमध्ये शहरातील मोक्याच्या जागा लॉक करून तालुक्यांच्या रिक्त जागांवर बदल्या करण्याचे धडाकेबाज पाऊल आयुक्तांनी टाकले आहे.  कृषी आयुक्तांनी कृषी अधिकारीपदाच्या ३४५, तंत्र अधिकारी व तालुका कृषी अधिकारीपदाच्या १८० बदल्या ऑनलाइन केल्या आहेत. याशिवाय उपविभागीय कृषी अधिकारी पदाच्या ९५ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दर्जाच्या ३० बदल्यांची यादीदेखील शासनाच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले.  ‘‘शेतकऱ्यांचा जास्त संबंध तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी येतो. तेथील जागा भरण्यास आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे. समुपदेशन बदलीचे धोरण आयुक्तांनी काटेकोरपणे पाळल्यामुळे वर्षानुवर्षे कार्यालयात चिकटून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ग्रामीण भागात झाल्या आहेत. काहींना थेट चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यात पाठविण्यात आले आहे. तसेच, डोंगराळ भागात व साइडपोस्टमध्ये अडकवून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देत त्यांना शहरी व कार्यालयीन जागा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  ‘‘कृषी खात्यातील बदल्यांच्या चाव्या हाती असलेल्या किल्लेदारांना एरवी नजराणे दिल्याशिवाय कधीही कामे झाली नव्हती. त्यामुळे प्रामाणिक व वशिलेबाजी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतत साइडपोस्ट दिल्या गेल्या. आयुक्तांनी मात्र खात्याच्या इतिहासात प्रथमच ‘नजराणा’ लॉबीचे कंबर मोडले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना काहीही न करता पारदर्शकपणे हवी ती जागा मिळाल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला असून, आयुक्त श्री. सिंह यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  कृषी आयुक्तांनी समुपदेशानासाठी आग्रह धरला होता. यामुळे हादरलेल्या नजराणा लॉबीने मंत्रालयातून समुपदेशनाच्या प्रक्रियेवर स्थगिती आणली होती. मात्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणेच बदल्या केल्या जातील, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली. त्यामुळे मंत्रालयातील मंडळींचाही नाईलाज झाला. परिणामी वरिष्ठ गटातील बदल्या करण्यास दिलेली स्थगिती उठविण्यात आली.  बदल्यांची यादी आता मंत्रालयात पाठविण्यात आली असून, ३१ मेपर्यंत त्यावर स्वाक्षरी होण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास बदल्यांसाठी आयुक्तांनी घेतलेली सर्व मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  बदल्या करताना सर्व जिल्ह्यांमध्ये सारख्या प्रमाणात पदे भरले जातील, अशी भूमिका आयुक्तांनी ठेवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदे भरलेली आणि विदर्भ, मराठवाड्यात चक्क पर्यवेक्षकाच्या ताब्यात तालुका कृषी अधिकारीपदाची सूत्रे देण्याची वेळ कृषी खात्यातील लॉबीने आणली होती. ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केल्याचे एका संचालकाने स्पष्ट केले. आयुक्तांनी दिला ठिय्या समुपदेशनामुळे सुरू केलेल्या बदल्यांमध्ये लॉबीकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता होती. मात्र, कोणालाही बोलण्याची संधी मिळू नये यासाठी आयुक्तांनी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत समुपदेशन सभागृहातच ठिय्या दिला. विस्तार संचालक विजय घावट व आस्थापना सहसंचालक सुधीर ननावरे यांनी या प्रक्रियेची हाताळणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com