राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार

राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार
राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार

मुंबई ः कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी राज्य शासनाला कॅनडातील क्यूबेक प्रांताचे सहकार्य मिळणार आहे. आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटी संस्थांचे सहकार्य महाराष्ट्राला मिळणार असून राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार आहे. मुख्‍यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. कॅनडामधील मॉन्ट्रिएल येथे क्यूबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड आणि मुख्यमंत्री यांच्यात मंगळवारी (ता. १२) आर्टिफिशियल इंटिलिजन्स या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात वापर करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.  क्यूबेक सरकारचा निसर्ग तंत्रज्ञानविषयक उपक्रम असलेली ‘एफआरक्यूएनटी’ संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात क्यूबेक सिटी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे. या अभ्यासगटाच्या माध्यमातून कीड निर्मूलन, कृषी तंत्रज्ञान आणि माती व्यवस्थापनासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नेक्स्ट एआय संस्थेसोबतच्या सामंजस्य करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली. राज्यातील 50 स्टार्टअप्सना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत नेक्स्ट एआय ही संस्था काम करणार आहे.  राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि आयव्हीएडीओ यांच्यात महाराष्ट्रात आर्टिफिशियल एक्सलेटर्सच्या स्थापनेबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला. चर्चेत निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भातील जागतिक प्लॅटफार्मशी महाराष्ट्र जोडला जाणार आहे. आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्स तयार करण्यासाठी आयव्हीएडीओसोबत महाराष्ट्रातील आयआयटी आणि विद्यापीठे एकत्रितपणे काम करतील. आर्टिफिशियल इंटिलिजन्समुळे रोजगारसंधी कमी होण्याची शक्यता पूर्णपणे निराधार असून उलट यामुळे मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती होईल. भारतासह महाराष्ट्र अतिशय वेगाने प्रगती करीत असून या विकासपर्वात भागिदारी करण्यासाठी कॅनडातील उद्योग समूहांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्यूबेक सिटी येथे केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com