चीनने सोयाबीन आयातीवरील शुल्क हटविले

चीनने सोयाबीन आयातीवरील शुल्क हटविले
चीनने सोयाबीन आयातीवरील शुल्क हटविले

मुंबई ः चीन आणि अमेरिका या देशांमध्ये व्यापार विवाद सुरू अाहे. त्यामुळे दोन्ही देशांनी परस्परांच्या सोयाबीन आयातीवर कर लादले आहेत. चीन हा सोयाबीनचा मोठा आयातदार देश आहे आणि अमेरिका सर्वात मोठा निर्यातदार आहे. परंतु व्यापार विवादामुळे अमेरिकेच्या सोयाबीनवर चीनने शुल्क लादल्याने देशांतर्गत गरज भागविण्यासाठी चीनने भारताच्या सोयाबीन आायतीवरील शुल्क हटविले आहे.  चीन आणि अमेरिकेच्या व्यापार विवादामुळे चीनने इतर देशांच्या वस्तू आयातीवर निर्बंध कमी करण्यास सुरवात केली आहे. चीनने भारतासह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, लाओस आणि श्रीलंका या देशांतून आयात होणाऱ्या ८५४९ वस्तूंवरील शुल्क कमी केले आहे. या देशांतून आयात होणाऱ्या सोयाबीनवरील आयात शुल्क तीन टक्क्यांवरून शून्य करण्यात आले आहे. सोयाबीनबरोबरच केमिकल्स, कृषी उत्पादने, मेडिकल पुरवठा, कपडे, स्टील आणि ॲल्युमिनयम उत्पादनांवरील शुल्कही कमी करण्यात आले आहे. या देशांच्या उत्पादनावरील शुल्क हे एशिया पॅसिफिक कराराच्या दुसऱ्या सुधारणेनुसार आकारण्यात आले आहे.  चीन आणि अमेरिकेच्या व्यापार विवादानंतर चीनने इतर देशांतून आयात होणाऱ्या उत्पादनांवरील कर कमी करण्याची धोरण अवलंबविले आहे. अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन निर्यातदार देश आहे. अमेरिकेतून आशिया खंडातील देशांना मोठ्या प्रमाणात सोयाबीन निर्यात केली जाते. चीनही अमेरिकेतून दरवर्षी सोयाबीन आयात करते. भारतातून आग्नेय आशियातील देशांना सोयाबीन निर्यात होते. मात्र चीनला सोयाबीन निर्यात होत नाही. आता चीनने भारातातून आयात होणाऱ्या सोयाबीनवरील शुल्क हटविल्याने देशातून निर्यात वाढण्यास मदत होणार आहे.   चीनने भारतातून आयात होणाऱ्या सोयामीलवर गुणवत्तेच्या कारणावरून निर्बंध घातले होते. परंतु आता अमेरिकेच्या सोयाबीनला चीनने दार बंद केले आहे. तसेच भारताच्या सोयाबीनला दार उघडले आहे. त्याचा फायदा निश्चित होणार आहे.  सोयाबीन निर्यात वाढवावी देशात २०१७-१८ मध्ये तेलबिया उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाले होते. सोयाबीन उत्पादकांनाही दर मिळाला नाही. तसेच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने गेल्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी सोयबीनकडे मोठ्या प्रमाणात वळण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात पीक पद्धतीत मोठा फरक दिसेल असे सूत्रांनी अलीकडेच स्पष्ट केले होते. त्यामुळे यंदा देशात सोयाबीनचे उत्पादन वाढेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही सोयाबीनच्या दराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच चीनने भारताच्या सोयाबीनला दार खुले केल्याने निर्यात करून हा प्रश्न सोडविता येऊ शकतो. त्यामुळे भारताने या संधीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात निर्यात करून येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com