कर्जमाफीच्या याद्या क्लिष्ट

दोन महिन्यांपूर्वी कर्जमाफी झाल्याच संदेश फोनवर आला तेव्हापासून यादीत नाव पहाण्यासाठी बॅंकेत चकरा मारत आहे. परंतु, बॅंकेतील कर्मचारी याच्याकडे जा, त्यांच्याकडे जा असे सांगत कर्जमाफीची यादी दाखवायला टाळाटाळ करत आहेत. नवीन पीक कर्ज वाटपाचे आदेश नसल्याचे सांगत आहेत. कर्जासाठी चकरा मारून थकलो. पैसे नसल्यामुळे पेरणी राहिली. - सोनाजी अंभुरे, शेतकरी, नागापूर, ता. जिंतूर, जि. परभणी.
कर्जमाफीच्या याद्या क्लिष्ट
कर्जमाफीच्या याद्या क्लिष्ट

परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती अत्यंत धीमी झाली आहे. पात्र शेतकऱ्यांनाही वेळेवर पीककर्ज मिळत नसल्यामुळे बी, बियाणे, खतांसाठी उधार-उसणवारी, सावकारी कर्ज घेण्याची वेळ आली आहे. कर्जमाफीच्या याद्या क्लिष्ट असल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची खातरजमा करून नवीन वाटप करावे लागत आहे. विविध कारणांवरून शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींप्रमाणेच बॅंक कर्मचारीदेखील आता सरसकट कर्जमाफी दिलेली बरी, असा सूर आळवित  आहेत. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ४.७० टक्के एवढेच पीक कर्ज वाटप करण्यात आले. नूतनीकरण (जुनं-नव) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आजवर एकदाही पीक कर्ज न घेतलेल्या नवीन (फ्रेश) शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू आहे; परंतु त्यांची संख्या कमी आहे. कर्जमाफी मिळालेल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या याद्या अद्याप प्राप्त नाहीत. त्यांचा घोळ सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अपुरे कर्मचारी संख्या आदी कारणांनी कर्जवाटपातील खोडा कायम आहे. अन्य बॅंकाच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बॅंकाच्या खातेदार शेतकऱ्यांना जास्त अडचणींनी तोंड द्यावे लागत आहे. नवीन शेतकऱ्यांना थेट कर्जमंजुरी दिली जात नाही. मध्यस्थांमार्फत सादर केलेल्या कर्जप्रस्तावांना तत्काळ मंजुरी दिले जाते, अशा तक्रारी राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या खातेदार शेतकऱ्यांनी केल्या. त्यामुळे दरवर्षीच्या जून महिन्यात बॅंकांमध्ये दिसणारी शेतकऱ्यांची गर्दी यंदा अनेक बॅंकांमध्ये दिसत नाही. पीक कर्ज वाटपाची गती आजवर कधी नव्हे ती यंदा अत्यंत संथ असल्यामुळे बोरी (ता. जिंतूर), झरी (ता. परभणी) तसेच परभणी बाजार समितीतील भारतीय स्टेट बॅंकेची कृषी विकास शाखा या ठिकाणी भेट दिली असता शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी तसेच बॅंकांना कर्ज वाटपासाठी येणाऱ्या अडचणी समोर आल्या. बोरीच्या भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत कर्जमाफीच्या यादीतील नाव शेतकऱ्यांना दाखविण्याची तसदी घेतली जात नाही. या बॅंक शाखेला ३५ गावे दत्तक आहेत. परंतु, नवीन कर्ज वाटप सुरू केले नव्हते. बोरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेअंतर्गंत ९ दत्तक गावातील साडेपाच हजार शेतकरी कर्जदार आहेत. २ हजार २०० शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. गुरुवार (ता.१४) पर्यंत बॅंकेने ५०० शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले तर ११०० ते १२०० शेतकरी कर्जमंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातील वारनिहाय गावातील शेतकऱ्यांचे कर्ज प्रस्ताव स्वीकारून लागलीच मंजुरी दिली जात आहे, असे शाखा व्यवस्थापक सुनील धर्म यांनी सांगितले. झरी येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेअंतर्गत १८ दत्तक गावातील ९ हजारांवर शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी ५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असले तरी आजवर केवळ दीड हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली आहे. दीड लाखावरील रक्कम भरली जात नाही. एक जूनपासून २०० च्या आसपास कर्जमाफी मिळालेल्या तसेच नवीन शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू करण्यात आल्याचे शाखा व्यवस्थापक रमेशचंद्र मीन यांनी सांगितले. परभणी बाजार समितीतील भारतीय स्टेट बॅंकेच्या कृषी विकास शाखेअंतर्गतच्या १५ दत्तक गावातील ३५ हजार शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यात आलेले आहे. त्यापैकी १८ हजारावर पीक कर्ज खातेदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. एवढ्या शेतकऱ्यांच्या याद्या लावण्यासाठी जागा नाही. लावल्या तरी शेतकरी त्यातील नाव शोधणार कसे हाही प्रश्न आहे, असे मुख्य व्यवस्थापक राजेश शिंदे यांना सांगितले. प्रतिक्रिया पुनर्गठन केल्या कर्जाचे व्याजासहित दीड लाख रुपये झाले आहे. परंतु, त्याची परतफेड करण्यासाठी जवळ पैसे नाहीत. कपाशीच्या पाच बॅग उधार घेऊन लागवड केली. सोयाबीनच्या बियाणासाठी अडचण आहे. - विठ्ठल पितळे, चांदज, ता. जिंतूर. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या बोरी शाखेने केलेल्या नियोजनामुळे व्यवस्थित कर्जवाटप सुरू आहे. कौसडी मोठे गाव असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी आठवड्यातील दोन दिवस ठेवावेत. - पद्माकर कौसडीकर, कौसडी, ता. जिंतूर दोन एकर जमीन आहे. आजवर बटई ने दिलेली होती. यंदा घरी केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून पीक कर्ज घेत आहे. एकरी २० हजार रुपये प्रमाणे ४० हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे. मो. गौस, शेतकरी, कौसडी, ता. जिंतूर आधीचे कर्जमाफ झाले पण नवीन कर्जासाठी काही बी आडफाटे आणले जात आहेत. यापूर्वी सामाईक क्षेत्र असताना तीन भावांना स्वतंत्र कर्ज दिले होते. पण आता नाही म्हणत आहेत. नाही ला काहीच इलाज नाही. खातेफोडीसाठी येणाऱ्या खर्चासाठी पैसे नाहीत. पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे बियाणे, खते उधारीवर घ्यावे लागणार आहे. उमराव घाडगे, संबर, ता. परभणी. एक लाख ७० हजार रुपये पीक कर्ज उचलेले होते. त्याचे व्याजासह साडेतीन लाख रुपये झाले आहेत. माफीसाठी आधी वरचे अडिच लाख रुपये भरा म्हणतात. तूर, हरभरा बेभाव विकावा लागला. त्यामुळे यंदा पैसे शिल्लक राहिले नाहीत. भरण्यासाठी अडिच लाख रुपये आणायचे कुठून. - चांगदेव हरकळ, आर्वी, ता. परभणी. २०१५-१६ मध्ये घेतलेल्या कर्जाचे २०१६-१७ मध्ये पुनर्गठन केलेल्या ८२ हजार ६२४ शेतकऱ्यांकडे ७२९ कोटी ३२ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. तूर्त कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने त्यांनी थकित कर्ज भरून नवीन कर्ज उचलणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने पीक कर्ज वाटपाची गती संथ आहे. आजवर प्राप्त सात ग्रीन लिस्ट नुसार १ लाख ३४ हजार ५४५ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे ७४५ कोटी १७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. सर्व बॅंकांना कर्जमाफीच्या याद्या लावण्याच्या सूचना वारंवार दिलेल्या आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. दीड लाखावरील रक्कम आधी भरण्यास प्रतिसाद कमीच आहे. त्यामुळे यंदा पीक कर्ज वाटपाच्या कामात वेग नाही. कर्जमाफीची आठवी आणि नववी ग्रीन लिस्ट येणार आहे. - तुकाराम खिल्लारे,  व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, परभणी. परभणी जिल्ह्यातील २७ हजार २३२ शेतकऱ्यांना ३९ कोटी रुपये कर्जमाफी मिळाली आहे. सेवा सहकार संस्थांनी केलेल्या मागणी पत्रकांनुसार कर्ज वाटप केले जाईल. सध्या कर्जमाफी मिळालेल्या तसेच नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जवाटपास प्राधान्य देण्यात येत आहे. निधी उपलब्ध झाल्यास नवीन शेतकऱ्यांना कर्ज दिले जाईल. मागणीच्या प्रमाणात कॅशचा पुरवठा होत नाही. त्यामुळे रक्कम देण्यास अडचणी येत आहेत. - व्ही. जी. जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com