उत्तरेकडून १८ लाख गाठींचा पुरवठा घटणार

नॉर्थ झोनमध्ये कापूस लागवड घटणार नाही, असा अंदाज होता, कारण तेथे पाणी मुबलक असते शिवाय बोंड अळीही नव्हती. जानेवारीपर्यंतच तेथे कापूस पीक घेतात. या भागातील कापूस उत्पादन हमीचे मानले जाते. परंतु तेथे धरणांमधून शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. शिवाय तापमान अधिक होते. यामुळे तेथे पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड घटली आहे. - अरविंद जैन, माजी अध्यक्ष, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन
कापूस गाठी
कापूस गाठी

जळगाव ः धरणांमधून पूर्वहंगामी कापसासंबंधी पाणी न मिळाल्याने पंजाब, हरियानामध्ये पूर्वहंगामी कापूस लागवड ३० टक्‍क्‍यांनी घटली आहे. याच वेळी राजस्थानातही कापसाखालील क्षेत्र कमी झाले आहे. पाकिस्तानातील पंजाब, सिंध भागातही कमी पाण्यामुळे पूर्वहंगामी कापूस लागवड सुमारे तीन ते साडेतीन लाख हेक्‍टरने घटल्याची माहिती आहे. बाजारात पुढील कापूस हंगामात (१ ऑक्‍टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९) सुमारे १८ लाख गाठींचा पुरवठा कमी होईल, अशी भीती कापूस उद्योगातील जाणकार, अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मागील हंगामात पंजाब, हरियानात कापसावर बोंड अळी नव्हती. तेथे पूर्वहंगामी कापूस अधिक घेतला जातो. राजस्थानातही पंजाब व हरियानालगतच्या भागात पूर्वहंगामी कापूस असतो. मे ते जूनदरम्यान या भागात धरणांतून मिळणाऱ्या पाण्यावर कापूस लागवड केली जाते. मोसमी पाऊस जुलैतच या भागात येतो. परंतु पंजाब, हरियानामध्ये धरणांतून कापूस उत्पादकांना पाणी मिळाले नाही. शिवाय मे अखेरीस तापमानही ४२ सेल्सिअसवर होते. अजूनही तेथे ४० सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. यामुळे पंजाबमध्ये तीन लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड अपेक्षित असताना तेथे दोन लाख ४५ हजार हेक्‍टवर मेअखेरपर्यंत लागवड झाली. हरियानामध्ये मेअखेर पाच लाख ४० हजार हेक्‍टरवर लागवड अपेक्षित होती, तेथे चार लाख ८५ हजार हेक्‍टरवर लागवड झाली. तर राजस्थानात एक लाख २८ हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड अपेक्षित होती, तेथे फक्त ९८ हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. सुमारे ३० टक्के लागवड उत्तरेकडे कमी आहे.  पूर्वहंगामी कापसाचे उत्पादन कोरडवाहू कापूस पिकापेक्षा अधिक, लवकर व दर्जेदार असे असते. परंतु उत्तर भागात सुमारे एक लाख ४० हजार हेक्‍टरने पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र कमी झाले आहे. पुढे कोरडवाहू कापूस लागवडही कमी होण्याची शक्‍यता आहे. कारण या भागात मोसमी पाऊस २ किंवा ४ जुलैनंतर सक्रिय होईल. या भागातून सुमारे १४ ते १६ लाख गाठींचा (एक गाठ १७० किलो रुई) पुरवठा कमी होईल, अशी शक्‍यता आहे. उत्तरेकडील मिलांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे. सध्याच्या हंगामात या उत्तर भागातून ५६ लाख गाठींचा पुरवठा झाला आहे. त्यात राजस्थानमधून २१ लाख, हरियानामधून २४ लाख आणि पंजाबमधून ११ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती मिळाली. पाकिस्तानातही टंचाईचा फटका पाकिस्तानात मार्च ते जुलैदरम्यान कापूस लागवड केली जाते. कापूस लागवड सुरू असतानाच मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राने बीटी (बॅसिलस थुरिलेंझीस) कापूस वाणाबाबत तेथे शंका व्यक्त केली. यावरून शेतकरी, कापूस उद्योगात गोंधळ वाढला. यातच पंजाब, सिंध भागात कमी पाण्यामुळे कापूस लागवड घटली आहे. पाकिस्तानातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासंबंधी काश्‍मिरातील धरणातून प्रतिदिन तीन लाख लिटर पाणी सोडले जात होते. तेथेही जुलैमध्येच मोसमी पाऊस सक्रिय होत असतो. २४ लाख ९६ हजार हेक्‍टर तेथे अपेक्षित असते. त्यांची उत्पादकता ६६६ किलो रुई प्रतिहेक्‍टरी आहे. तेथून सुमारे ११८ ते १२० लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु तेथेही सुमारे तीन ते साडेतीन लाख हेक्‍टरने पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र कमी होण्याचे संकेत असून, आठ ते १० लाख गाठींचे उत्पादन तेथेही कमी होण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.  उत्तरेकडे पूर्वहंगामी कापसाखालील कमी झालेले क्षेत्र असे (हेक्‍टरमध्ये) पंजाब ५५ हजार 

राजस्थान ३० हजार

हरियाना  ५४ ते ५५ हजार

अपेक्षित उत्पादन ४० ते ४२ लाख गाठी

पंजाब, हरियाना, राजस्थानातून या हंगामात अपेक्षित उत्पादन ५६ लाख गाठी प्रतिक्रिया उत्तरेकडे कापूस लागवड कमी दिसत आहे. पण उत्पादन यंदा चांगले येईल. गाठींचा फारसा कमी पुरवठा या भागात होणार नाही. कारण बोंड अळी तेथे नाही.  - राजाराम दुल्लभ पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि. नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com