इंदापूर, बारामतीमधील द्राक्षबागांना डाउनीचा तडाखा

द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव
द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव
बारामती, जि. पुणे ः पावसाचा उसासह इतर पिकांना फायदा झाला आहे. पुरेशा पावसामुळे उन्हाळा दिलासादायक जाणार आहे. असे असले तरी पावसाने द्राक्ष उत्पादकांसाठी दिवाळी कडू केली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यांत डाऊनीमुळे तब्बल २ हजार एकरांवरील बागांचे पूर्णतः नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादकांसाठी हा पाऊस किमान ३० कोटींच्या खर्चावर पाणी फिरवणारा ठरला आहे. 
इंदापूर तालुक्यात बोरी, काझड, शिंदेवाडी, लासुर्णे, अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव, कडबनवाडी हा पट्टा द्राक्षबागेचे आगार समजला जातो. या तालुक्यात पाच हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत; तर बारामती तालुक्यातही काटेवाडी, ढेकळवाडी, सोनगाव, झारगडवाडी, सांगवीचा पट्टा या भागांत दोन हजार एकरांहून अधिक क्षेत्रात द्राक्षबागा आहेत.
पाच वर्षांपूर्वी डाऊनीने या दोन्ही तालुक्यांतील द्राक्षबागांना असाच झटका दिला होता. मात्र या वर्षीचा फटका द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला आहे. २० ते २५ ऑगस्टपासून १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत छाटणी झालेल्या द्राक्षबागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे डिसेंबर महिन्यात विक्रीस येणाऱ्या द्राक्षमालावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले आहे.
इंदापूर तालुक्यातील अंदाजे १ हजार एकरांवरील बागा डाऊनीच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे सोडून देण्याची वेळ आली असून उत्पादन सोडा, मात्र वर्षाच्या हंगामासाठी त्यावर केलेला प्रतिएकरी २ लाखांपर्यंतचा खर्च वाया गेला आहे. या खर्चावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले असून, दुसऱ्यांदा छाटणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. डाऊनीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी हा हंगाम सोडून दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक भरत शिंदे यांनी दिली. 
बोरी येथील द्राक्ष निर्यातदार रामचंद्र शिंदे यांनी एवढे नुकसान यापूर्वी कधीच झाले नव्हते, अशी प्रतिक्रिया दिली. इंदापूर तालुक्यातील साठ टक्क्यांहून अधिक बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.
बारामती तालुक्यात मुख्यत्वे मद्यार्क निर्मितीसाठी उपयोगी ठरणाऱ्या बेंगलोर पर्पल जातीच्या द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. उर्वरित क्षेत्र बहुसंख्येने थॉमसन सीडलेस जातीच्या द्राक्षाखाली आहे. या तालुक्यात बेंगलोर पर्पल जातीच्या द्राक्षाची छाटणी करून बहर धरला होता. मात्र तब्बल ६०० ते ७०० एकर द्राक्षबागांना डाऊनीचा मोठा तडाखा बसल्याने या संपूर्ण बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, तर थॉमसन सीडलेस जातीच्या जवळपास ४०० एकरांवरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.
या द्राक्षबागांचा बहर धरून आतापर्यंतच्या प्रक्रियेसाठी एकरी साधारणतः एक लाखापर्यंत खर्च येतो. त्याचा विचार करता बारामती तालुक्यात जवळपास १० कोटींच्या पुढे आलेला खर्च मातीमोल झाला असल्याची भीती बारामती तालुका फलोत्पादक संघाचे अध्यक्ष वसंतराव घनवट यांनी व्यक्त केली. 
ते म्हणाले, हे अभूतपूर्व असे नुकसान आहे. या नुकसानीमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. अगोदरच नोटाबंदी, जीएसटीचा तडाखा फळ उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर बसला. व्यापारी फिरकत नव्हते अशा स्थितीचा सामना त्यांनी केला. आता तर त्यापलीकडे जाऊन नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com