ऑनलाइन तूर नोंदणीपासूनच शेतकरी वंचित

''ऑनलाइन नोंदणीसाठी संबंधित कार्यालयात कागदपत्रे नेऊन दिली होती. पोच दिली नाही, नंतर मात्र जबाबदारी झटकली. शेवटी मला ३९०० रुपयांनी बाजारात तूर विकावी लागली. यात माझे आर्थिक नुकसान झाले. अनुदानापासूनही वंचिंत राहावे लागणार आहे." - दत्तात्रय घोरतळे, शेतकरी, बोधेगाव, ता. शेवगाव
तूर
तूर

नगर ः हमी दराने तूर विक्री करता यावी यासाठी शेवगाव बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर कागदपत्रे दिली. मात्र ‘ऑनलाइन नोंदणी'च करून घेतली नसल्याने बोधेगाव (ता. शेवगाव, जि. नगर) परिसरातील सहा शेतकऱ्यांना तूर विक्रीपासून वंचित रहावे लागले असल्याचा प्रकार पुढे आला आहे. आता या शेतकऱ्यांनी सहायक निबंधक, मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांसह कृषी मंत्र्याकडे तक्रार केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये गतवर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. तूर बाजारात विक्रीसाठी येताच बाजारात व्यापाऱ्यांनी दर पाडले. दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत तुरीची कमी दराने खरेदी होत असल्याने हमी दराने तुरीची खरेदी करता यावी यासाठी खरेदी केंद्रे सुरू केली होती. यंदा तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी ऑनलाइन नोंदणी करावी लागत होती. त्यानंतर तूर विक्री करण्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर केंद्रावर तूर विक्रीसाठी नेली जायची. केंद्र सरकारची मुदत संपल्यानंतर खेरदी केंद्रे बंद झाली, परंतु मागणी केल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली. मात्र, अजूनही अनेक शेतकरी नोंदणी करूनही तूर विक्री करू शकले नाही. नोंदणी केलेले जवळपास चार हजार शेतकरी वंचित असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्‍यक ती कागदपत्रेही देऊनही नोंदणीच केली नसल्याचा प्रकार बोधेगाव येथील शेतकऱ्यांबाबत घडला आहे. येथील दत्तात्रय घोरतळे, सुभाष घोरतळे, परमेश्वर तांबे, भागवत घोरतळे, साईनाथ पोटभरे, नितीन घोरतळे या शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी शेवगाव येथे खरेदी केंद्र चालवणाऱ्या संस्थेच्या आखेगाव रस्त्यावरील कार्यालयात सातबारा व आठ अ उतारा, आधार ओळखपत्र आणि बॅंक खात्याची पासबुक प्रत कागदपत्रे दिले. त्यानंतर बऱ्याच दिवस तूर विक्रीसाठी मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे न आल्याने तीन मे रोजी शेतकऱ्यांनी संस्थेकडे चौकशी केली असता तुम्ही सदर कागदपत्रे देण्यासाठी कार्यालयात आलेच नाही, असे बोलून जबाबदारी झटकली. त्यावर कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी शेतकऱ्यांनी केल्यावर मात्र आता खरेदी बंद असून खरेदीस पुन्हा मुदतवाढ मिळाल्यावर तुमची तूर खरेदी करू, असे सांगितले असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. ऑनलाइन नोंदणी करून घेतली नसल्याने तुर विक्रीपासून वंचित रहावे लागणार असून त्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी शेवगावच्या सहायक निबंधकासह, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, तहसीलदार कृषि व पणनमंत्री, महसूल व मदत पुनर्वसनमंत्री, पणन संचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, तहसीलदार, जगदंबा सहकारी संस्थेकडे निवेदन देऊन तक्रार केली असून चौकशीची मागणी केली आहे. अनुदानापासून वंचित राहावे लागणार नोंदणी केलेल्या परंतु खरेदी होऊ शकली नाही, अशा शेतकऱ्यांना सरकारने अनुदान जाहीर केले आहे. मात्र, बोधेगाव येथील शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीच झालेली नसल्याने त्यांना एक तर बाजारात कमी दराने तूर विकावी लागणार आहेतच, पण सरकारी अनुदानापासूनचही वंचित राहावे लागणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com