मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात सोयाबीन पेरणीला पसंती

पेरणी
पेरणी

औरंगाबाद : मराठवाड्यात मोसमी पावसाच्या आगमनानंतर झालेल्या पहिल्या टप्प्यातील पेरणीत कपाशीच्या तुलनेत सोयाबीनला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे आठही जिल्ह्यांच्या पेरणी अहवालातून समोर आले आहे. कृषीच्या औरंगाबाद व लातूर कृषी विभागात कपाशीची लागवड अपेक्षीत क्षेत्राच्या तुलनेत अनुक्रमे १.९४ टक्‍के ते १८ टक्‍क्‍यांदरम्यान राहिली आहे, तर दोन्ही विभागात सोयाबीनचा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पेरणीचा टक्‍का अनुक्रमे २.२८ ते १७.२५ टक्‍क्‍यांदरम्यान राहिला आहे.  यंदा मराठवाड्यात ४९ लाख १० हजार ९१४ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत २१ जूनपर्यंत ३ लाख ६७ हजार ३१६ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी आटोपली. यामध्ये लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत सर्वाधिक ३ लाख ३८ हजार ८३६ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद कृषी विभागांतर्गत २८ हजार ४८० हेक्‍टरवर खरिपाची पेरणी उरकली आहे. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षी मराठवाड्याचं `पांढरं सोनं` काळवंडलं होतं. शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झाला नाही, तर पुढील वर्षी पुन्हा बोंड अळीचं संकट घोंगावण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत यंदा कपाशी लागवड कमी होण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. त्या अंदाजावरून औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत यंदा कपाशीचे १० लाख १४ हजार ६६७ हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. त्या क्षेत्राच्या तुलनेत २१ जूनअखेरपर्यंत केवळ २७ हजार ६९४ हेक्‍टरवरच कपाशीची लागवड झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ती केवळ १.९४ टक्‍के इतकीच आहे. दुसरीकडे लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाचही जिल्ह्यांत कपाशीचे क्षेत्र ७ लाख २ हजार ७८४ हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले होते. त्या तुलनेत १ लाख ३१ हजार १३७ हेक्‍टरवर पाचही जिल्ह्यांत कपाशीची लागवड झाली आहे. प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष पेरणीचा टक्‍का १८.६६ इतका आहे. दुसरीकडे औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ६७ हजार ९१२ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत ३ हजार ८३० हेक्‍टरवर अर्थात प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २.२८ टक्‍के पेरणी झाली आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील सोयाबीनचा बेल्ट म्हणून ओळख असलेल्या लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत यंदा ८ लाख ७० हजार ९७८ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित आहे. त्या तुलनेत १ लाख ५० हजार २७१ हेक्‍टवर अर्थात अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत १७.२५ टक्‍के पेरणी आटोपली आहे. संपूर्ण मराठवाड्यात कपाशीची प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत केवळ ८.७८ टक्‍के क्षेत्रावरच लागवड झाली असून, सोयाबीनची मात्र १४.८३ टक्‍के क्षेत्रावर पेरणी आटोपल्याचे चित्र आहे.  सोयाबीन व कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र व २१ जूनपर्यंत प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

   सोयाबीन सोयाबीन कपाशी कपाशी
जिल्हा    सर्वसाधारण  प्रत्यक्ष पेरणी  सर्वसाधारण  प्रत्यक्ष पेरणी
औरंगाबाद  १०७२३      ००    ३८७३५४     ४९०५
जालना   १०१६  ००  २९७९२२   ९४७३
बीड   २३९३    ००   ३२९३२१     ५२७३
लातूर   २७४०७१    २९७३८     ४५८६    ८१
उस्मानाबाद     १०६९६२  ३३३८   २४६३२ २९
परभणी    १३३३२०  ७०२२   २५७११९   २५७८९
हिंगोली    १५७५२८     ६२९३३  ९२६१३    ११६७३
नांदेड   १९९०८९  ४७२४०  ३२३७५४  ९३५६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com