शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री कार्यक्रम : पंतप्रधान मोदी

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री कार्यक्रम : पंतप्रधान मोदी
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री कार्यक्रम : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी केंद्र सरकार शेतीसाठी विविध योजना राबवित आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार चारसूत्री कार्यक्रम राबविणार असून, कृषी निवष्ठांचा खर्च कमी करणे, शेतीमालाला रास्त भाव, शेतीमालाची नासाडी थांबविणे, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत तयार करणे या गोष्टींचा समावेश असेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.  देशातील ६०० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी (ता. २०) संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, की सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारने चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. शेतकऱ्यांचा शेतीतून उत्पन्नवाढीसाठी कृषी निवष्ठांचा खर्च कमी करणे, शेतीमालाला रास्त भाव, शेतीमालाची नासाडी थांबविणे, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत तयार करणे, हे चार मुद्दे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. शेतीचा विकास करायचा असेल तर पुरेसा निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. ही गोष्ट जाणूनच भाजप सरकारने चार वर्षांत शेतीसाठीच्या निधीत दुप्पट वाढ करून २.१२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘‘शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात तरतुदी करून दीडपट हमीभाव मिळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. तसेच सरकार कष्टकरी शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी जे काही आवश्यक मदत आहे ती सरकार करत आहे. आमचा देशातील शेतकऱ्यांवर विश्वास आहे. सध्या देशात केवळ अन्नध्यान्याचेच विक्रमी उत्पादन झाले नाही तर दूध, फळे आणि भाजीपाला उत्पादन आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोचले आहे. २०१० ते २०१४ मध्ये देशात २५० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. तुलनेत २०१७-१८ मध्ये २८० दशलक्ष टन उत्पादन झाले, असेही मोदी म्हणाले. सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत करत असल्याचे सांगते ते म्हणाले, की सरकार शेतकऱ्यांना पेरणीवेळी तसेच पेरणीनंतर आणि काढणीच्या वेळीही मदत करते. शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनीचे आरोग्य कळावे आणि योग्य प्रमाणात खतांचा वापर करता यावा यासाठी मृदा आरोग्यपत्रिका वाटप केल्या आहेत. तसेच चांगल्या प्रतीचे बियाणे मिळावे यासाठी कर्जे उपलब्ध करून देण्यात येत आहे. युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी निमकोटेड युरिया बाजारात आणला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी ई-नाम योजना सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले...

  • आमचा देशातील शेतकऱ्यांवर विश्वास
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री कार्यक्रम
  • कृषी निवष्ठांचा खर्च कमी करणे, शेतीमालाला रास्त भाव, शेतीमालाची नासाडी थांबविणे, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत तयार करणार
  • चार वर्षांत शेतीसाठीच्या निधीत दुप्पट वाढ करून २.१२ लाख कोटींची तरतूद
  • २०१४ पासून अन्नधान्य उत्पादनात १०.५ टक्के वाढ
  • निमकोड युरिया, मृदा आरोग्यपत्रिका, ई-नाम या निर्णयांनी शेतकऱ्यांचा फायदा  
  • सोलापुरातील महिला शेतकरी कंपनीचे केले कौतुक शेतकऱ्यांची संघटन चळवळ वाढावी, त्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा, यासाठीच शेतकरी कंपन्यांचा उपक्रम हाती घेतला आहे, महिला शेतकरी कंपनी म्हणून बोरामणीची यशस्विनी महिला शेतकरी कंपनी उत्कृष्ट काम करते आहे. शेतकरी कंपनीच्या उद्देशानुसार सुरू असलेले हे काम असेच सुरू ठेवा, केंद्र शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र शेतकरी कंपनीच्या कामाचं कौतुक केलं.  पंतप्रधान मोदी यांनी देशातील नऊ जिल्ह्यांमधील काही मोजक्‍या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यात सोलापूर जिल्ह्यातून दक्षिण सोलापुरातील यशस्विनी महिला शेतकरी कंपनीच्या अध्यक्षा सौ. अनिता माळगे यांच्याशी त्यांनी संवाद केला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, उपसंचालक रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. लालासाहेब तांबडे यांच्यासह बार्शीतील सीताफळ उत्पादक नवनाथ कसपटे, सुर्डीचे धनाजी शेळके, काळेगाव येथील उमेश देशमुख तसेच मोहोळ तालुक्‍यातील पाथरीचे समाधान भोसले व सावळेश्‍वर येथील धनाजी गावडे आदी उपस्थित होते. त्याशिवाय बुलढाण्याचे अशोक नाहरणे हे शेतकरी कंपनीचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. संवादाची सुरुवात पंतप्रधान मोदींनी नमस्कार मंडळी अशी मराठीतूनच केली. महिला शेतकरी कंपनीच्या अध्यक्ष सौ. माळगे यांच्याशी त्यांचा संवाद खूपच चांगला झाला. महिलांनी महिला शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली राज्यातील ही पहिलीच कंपनी आहे. 585 महिला कंपनीच्या सभासद आहेत, दूध उत्पादन, भाजीपाला उत्पादनासह तूर उत्पादनात कंपनीच्या सभासदांनी आघाडी घेतली आहे, असे सौ. माळगे यांनी सांगताच, कितीपट उत्पन्नवाढ झाली, किती पैसे मिळाले. ​पूर्वीचे उत्पन्न आणि आताचे उत्पन्न याच्यात किती फरक आहे, असे प्रश्‍न पंतप्रधान मोदी यांनी केले. शेतकरी कंपन्यांना आयकरातून सूट दिली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सोलापूरची ओळख ही हातमागासाठी आहे, पण ती आता शेतीच्या चांगल्या प्रयोगासाठी होते आहे, ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब आहे, असे सांगताना देशातील अन्य शेतकऱ्यांनीही सोलापूरच्या या कंपनीचे काम पाहावे, असे आवाहन केले.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com