कापूस दराबाबत वायदा बाजार सावध

चीनमधून आयातीसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. परंतु, आतापर्यंत केवळ सात ते आठ लाख गाठींचेच (एक गाठ १७० किलो) करार झाले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाच लाख गाठींचे करार झाले होते. त्यानंतरच्या पाच आठवड्यांमध्ये केवळ दोन ते तीन लाख गाठींचेच करार झाले आहेत. - अरुण सेखसारिया, व्यवस्थापकीय संचालक, डीडी कॉटन
कापूस गाठी
कापूस गाठी

मुंबई  : देशात २०१७-१८ च्या हंगामात बोंड अळीने पिकाला बसलेला फटका, परिणामी चालू हंगामात घटलेली कापूस लागवड आणि केंद्राने कापसाच्या हमीभावात केलेली वाढ, यामुळे देशातील कापूस बाजारातील चित्र अद्याप तरी अस्पष्ट आहे. त्यामुळे निर्यातदार फ्युचर करार करताना सावधगिरीची भूमिका घेत आहेत. परिणामी मागील काही आठवड्यांपासून फ्युचर करार कमी होत आहेत.  

चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धानंतर चीनने भारतीय कापसाला पसंती दिली. भारतीय निर्यातदारांनीही चीनमधील कापूस निर्यातीचे मोठ्या प्रमाणात फ्युचर करार केले आहे. देशातील गरज भागविण्यासाठी चीनने अाणखी आयातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  देशात यंदा मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर अनेक भागात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही, तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्‍य पाऊस झाला. त्यामुळे येणाऱ्या काळातही पाऊस आणि वातावरणाचा कापूस पिकावर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. त्यातच आतापर्यंत मागील वर्षापेक्षा ३० टक्के कमी कापूस लागवड झाली आहे. त्यातच बदलत्या वातावरणाचा पिकावर परिणाम झाल्यास पुरवठ्यावरही परिणाम होईल. तसेच केंद्राने कापसाच्या हमीभावात मोठी वाढ केली. त्यामुळे देशातील कापूस उद्योगाची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धात्मक क्षमता कमी झाली आहे. निर्यातदारांना नेमका हंगाम आणि दर याबाबत अंदाज येत नसल्याने त्यांची मोठी गोची झाली आहे. भारतातून चीनमध्ये निर्यातीसाठीचे करार मागील पाच अाठवड्यांपासून मंदावले आहेत. सप्टेंबर महिन्यात संपणाऱ्या २०१७-१८ या विपणन वर्षात साडेसात दशलक्ष गाठी कापूस निर्यात होण्याची शक्यता आहे. २०१६-१७ मध्ये ६.२ दशलक्ष गाठींची निर्यात झाली होती. कापूस निर्यातीचे फ्युचर करार हे कापूस लागवडीच्या शेवटच्या टप्प्यात जुलै किंवा आॅगस्टमध्ये होतात. तर बाजारात कापूस सप्टेंबपासून येण्यास सुरवात होते.  अमेरिकेबरोबरचे व्यापारी संबंध ताणल्यानंतर चीनने भारतीय कापूस बाजारकडे आपला मोर्चा वळविला. चीनने मोठ्या बफर स्टॉकसाठी मोठ्या प्रमाणात कापूस आयात करण्यास सुरवात केली. परंतु, जागतिक व्यापार संघटनांनी भारतात कापूस टंचाई निर्माण होणार असल्याने अपेक्षेपेक्षा चीनला १० लाख गाठी कमीच निर्यात करेल. त्यातच बफर स्टॉक कमी झाल्याने चीनने मागील सहा ते आठ आठवड्यापासून कापूस आयातीचा कोटा वाढविला आहे. २०१८-१९ मध्ये भारातातून आठ दशलक्ष टन कापूस निर्यात होण्याची शक्यता आहे, त्यापैकी एकट्या चीनमध्ये ३० ते ४० टक्के निर्यात होईल.

हमीभाव वाढीचाही परिणाम केंद्राने नुकतेच २०१८-१९ च्या हंगामासाठी मध्यम धागा कापसासाठी ४०२० रुपयांपासून ५१५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे, तर लांब धाग्याच्या कापसासाठी ४३२० रुपयांपासून ५४५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हमीभावावाढीमुळे स्पॉट मार्केटमध्ये कापसाच्या एका कॅंडीमध्ये (एक कॅंडी ३५६ किलो) ३६,५०० रुपयांपासून ४३, ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यातच अमेरिकेत सध्या चीनसोबतच्या व्यापार विवादामुळे कापसाचे दर कमी झाले आहेत. त्याचा परिणाम भारतीय कापूस निर्यातीवर भविष्यात होऊ शकतो. त्यातच देशात उत्पादन घटीची शक्यता असल्याने त्याचा परिणाम आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामावर होऊ शकतो. जूनपासून परिस्थिती बदलली देशात गुरुवापर्यंत (ता.१२ ) कापूस लागवड २४ टक्क्यांनी माघारली आहे. महत्त्वाच्या कापूस उत्पादक गुजरातमध्ये ६१ टक्के, तेलंगणात ३७ टक्के आणि आंध्र प्रदेशात ६८ टक्के कापूस लागवड कमी झाली आहे. परिणामी हंगामात कमी कापूस उपलब्ध होईल या भीतीने व्यापारी फ्युचर करार करताना सावधगिरी बाळगत आहेत. सौराष्ट्र आणि कच्छ या कापूस उत्पादक भागात आतापर्यंत सरासरीच्या ८० टक्के कमी पाऊस लागवड झाली आहे. नंतरच्या काळात या भागात मागील वर्षाएवढीच लागवड झाली तरीही उत्पादनात घट होणार आहे. देशातील कमी कापूस लागवडीचा परिणाम उत्पादनावर होणार असून दरही वाढतील, असे गृहित धरून निर्यातदारांनी जूनपासून करार करताना सावधगिरी बाळगायला सुरवात केली आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.   प्रतिक्रिया सौराष्ट्र आणि कच्छ या दुष्काळी भागात याआधीही उशिरा कापूस लागवड झाल्यानंतरही देशातील कापूस उत्पादनावर जास्त परिणाम झालेला नाही. त्यामुळे यंदाही उशिरा कापूस लागवडीचा फारसा परिणाम उत्पादनावर होईल असे वाटत नाही. - नयन मिरानी, माजी अध्यक्ष, कॉटन असोसिएशन आॅफ इंडिया 

कापसाची वेळेवरच लागवड झाल्यावर चांगली उत्पादकता येते. आता कापूस लागवडीचा हंगाम संपत आहे. लागवडीच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांनी लागवड केल्यास त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो.  - राजेश राठी, मालक, बाल मुकूंद आॅईल मिल, दर्यापूर, जि. अमरावती.   अमेरिकेत कापसाचे दर कमी झाले असले तरीही डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस कुमकुवत होत आहे. त्याचा लाभ कापूस निर्यातदारांना होईल. त्यामुळे हमीभाववाढीचा परिणाम कापूस निर्यातीवर होणार नाही.  - विनय कोटक, कोटक कमोडिटिज्

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com