भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता : स्काउटेन

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या देशातील पहिल्या पशुधन अनुवंश  सुधारणा उच्च गुणवत्ता केंद्राचे भूमिपूजन नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काउटेन यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २५) माळेगाव येथे झाले.
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या देशातील पहिल्या पशुधन अनुवंश सुधारणा उच्च गुणवत्ता केंद्राचे भूमिपूजन नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काउटेन यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २५) माळेगाव येथे झाले.

बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता आहे आणि नेदरलॅंड हा उच्च गुणवत्तेच्या शेती उत्पादनाचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे दोन्ही देश तंत्र आणि ज्ञानाच्या बाबतीत एकत्र येत असल्याने भविष्यातील जागतिक अन्नसुरक्षेचे आव्हान नक्कीच पेलतील, असे मत नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काउटेन यांनी शारदानगर येथे व्यक्त केले. राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या मान्यतेने येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती हे देशातील पहिला पशुधन अनुवंश सुधारणा उच्च गुणवत्ता केंद्र प्रकल्प उभारणार आहे. त्याचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. २५) कॅरोला स्काउटेन यांच्या हस्ते माळेगाव येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, रणजित पवार, जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हिरो कंपनीचे प्रमुख पंकज मुंजाळ, आयुक्त कांतीलाल उमाप, नेदरलॅंडच्या डी. कार्डोझो, एम. सोरेमा, व्हाऊटर वरे, रिक इवाग, जगदिश भट्टर आदी उपस्थित होते.   स्काउटेन म्हणाल्या, की आमचे प्रमुख लक्ष्य हे भारतीय शेतीला निर्यातीचे तंत्र व त्यासंबंधातील अधुनिक ज्ञान देण्यावर आहे. भारत व नेदरलॅंडमधील कृषी क्षेत्रातील हे परस्परसामंजस्य पशुसंवर्धन क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने दूर करण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल. मी आज बारामती पाहिली, खूप प्रभावित झाले. बारामतीत शेतीच्या बाबतीत अद्ययावत शैक्षणिक केंद्र आहे. शेतकऱ्यांना खूप चांगले व नवे तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न होतो हे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न व एकरी उत्पादन वाढविण्यावरचा भर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला उच्च गुणवत्तेसाठी नेदरलॅंडच्या तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भारतीय कृषी क्षेत्र जागतिक स्तरावर आपले महत्त्व नक्कीच वाढवेल, असा विश्वास आहे. त्यासाठी डेअरीचा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. नेदरलॅंड व भारतातील तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीत शरद पवार यांनी मोलाचे योगदान दिले. शरद पवार म्हणाले, की निर्यातीच्या बाबतीत उच्च गुणवत्तेचे डच तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचेल. यापुढील काळात केवळ शेतमाल पिकवून चालणार नाही, तर निर्यातीपर्यंतची धोरणे आखावी लागतील. तसे काम नेदरलॅंडमध्ये झाले, जे आता भारतात होऊ शकेल. आज दुधाच्या क्षेत्रात आव्हाने खूप आहेत. दुध दराचा प्रश्न केंद्र व राज्य सरकारपुढे आपण मांडूच, मात्र जनावरांची दुधाची क्षमता वाढविण्याचे तंत्र उत्पादकांना शिकवावे लागेल, त्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचे काम करेल. नवीन व चांगल्या दर्जाची वासरे तयार करण्यासाठी, देशी गाईंचा दर्जा वाढविण्यासाठी येथे काम होईल. यावेळी खासदार सौ. सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com