मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवर

सध्या बाजारात येणाऱ्या जास्तीत जास्त उत्पादनात १५ ते १८ टक्के आर्द्रता आहे. त्यामुळे हा मका साठवणूक करणे शक्य नाही. परिणामी हा मका पशुखाद्य आणि स्टार्च उद्योगातच वापरावा लागणार आहे. - अविनाश कुमार, मका व्यापारी, बिहार
मका
मका

नवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी असल्याने चिंतेचे वातावरण आहे. पीक बाजारात आल्यानंतर दर वाढण्याची अपेक्षा असताना बाजार मात्र घसरला आहे. केंद्राने २०१७-१८ च्या रब्बी हंगामात मक्याला १४२५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र मागील तीन आठवड्यांपासून बाजारात मक्याला प्रतिक्विंटलला एक हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हा मागील चार वर्षांतील नीचांकी दर आहे.  रब्बीत मका उत्पादनात बिहार हे आघाडीचे राज्य आहे. मात्र मका काढणीला आल्यानंतर बिहार आणि इतर मका उत्पादक राज्यांमध्ये बऱ्याच वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यातच हवामान बदलाचा परिणाम पिकावर झाला. त्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांनी मका उत्पादन घटणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु या परिस्थितीतही पीक टिकले आणि उत्पादन वाढले; परंतु पाऊस आणि हवामानामुळे उत्पादनाची गुणवत्ता बिघडली. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. त्यामुळे सध्या बाजारात सरासरी दरापेक्षा १५० ते २०० रुपयांनी कमी दर मिळत आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. ‘‘बाजारात मक्याचे दर पडले असले, तरीही १४ टक्के आर्द्रता असलेल्या चांगल्या प्रतीच्या मक्याला १२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तरीही गुणवत्तेअभावी जास्तीत जास्त उत्पादन हे कमी दरानेच विक्री होत आहे. जास्तीत जास्त उत्पानात १५ ते १८ टक्के आर्द्रता असल्याने साठवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे या मक्याचा पशुखाद्य आणि स्टार्च उद्योगात वापर होतो. आणखी मोठ्या प्रमाणात मका बाजारात येणे बाकी आहे. हे उत्पादन बाजारात आल्यास किमती आणखी घसरतील. सध्या बाजारात अवकेच्या हंगामाच्या केवळ २० ते ३० टक्के आवक आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.  भारतातील मका उत्पादन २०१७-१८ मध्ये २७.१४ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी हे उत्पादन २५.९० दशलक्ष टनांवर होते.  आंतरराष्ट्रीय दर वाढण्याची शक्यता दक्षिण आफ्रीकन देशांध्ये सध्या मक्याचे दर १६० डॉलर प्रतिटन आहेत. आशियाई देशांना येथून आयात करण्यासाठी वाहतूक खर्चासह हा मका २०० डॉलर म्हणजेच १३०० रुपये प्रतिटन दराने पडतो. त्यातच अमेरिकेतील बऱ्याच भागात दुष्काळी स्थिती असल्याने येथील उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढण्याची शक्यता आहे. त्यातच बांगलादेशसह इतर शेजारील देशांकडून मागणी वाढण्याची शक्यता आहे.  निर्यात ठप्पच २०१४-१५ पासून भारतातून मका निर्यात ठप्पच झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर हे भारतातील दरापेक्षा कमी आहेत, त्यातही महत्त्वाच्या दक्षिण आफ्रिका या मका उत्पादक देशातील दरही कमी आहेत. बांगलादेश, मलेशिया, नेपाळ आणि इतर अाग्नेय आशियातील देश हे २०१३-१४ पर्यंत भारतातून मका आयात करत असत. परंतु भारताचा देशांतर्गत वापर वाढल्याने मका दर वाढले आणि हे देश आयातीसाठी इतर देशांकडे वळाले आणि भारताची निर्यात ठप्प झाली.    साठवणूकदार खरेदीत अनुत्सुक मागील दोन वर्षांत तोटा सहन करावा लागल्याने साठवणुकदार खरेदी करायला उत्सुक नाहीत. २०१६-१७ च्या दुष्काळानंतर मका किंमत १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढली होती. या वेळी पुढील वर्षीही याच किमती कायम राहतील ही अपेक्षा करून साठवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून साठा केला होता. त्यातच साठवणूकदारांनी २०१७-१८ च्या खरिपात १४०० रुपये प्रतिक्विंटलने मका खरेदी केला; परंतु मका दर दबावात येऊन ११५० रुपयांवर आले. त्यामुळे वेअरहाउसमध्ये साठवण करणे महाग झाल्याने साठवणुकदार परताव्याविषयी चिंतेत आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय स्टॉकिस्ट कंपनीच्या सूत्रांनी  दिली.  प्रतिक्रिया दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मक्याचा मागील साठा कायम आहे. त्यामुळे येथून मक्याला नवीन मागणीची शक्यता कमी आहे. त्यातच रब्बीतील उत्पादनाचा पुरवठा जास्त आहे. त्यामुळे त्याचा परिणाम दरावर झाला आहे.  - दीपक चव्हाण,  शेतीमाल बाजार अभ्यासक, पुणे पीक काढणीच्या काळात झालेल्या पावसाने मक्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गुणवत्ता खालावल्याने मका दर मागील २० दिवसांमध्ये १५० ते २०० रुपयांनी घसरले आहे. - सहदेव जयस्वाल, मका व्यापारी, पुरनेआ, बिहार  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com