बियाणे
बियाणे

खरिपासाठी मुबलक कापूस बियाणे उपलब्ध

​बियाणे कंपन्या व कृषी विभागात बियाणेपुरवठा, तसेच माहितीपत्रक व इतर मुद्द्यांवर काही मतभेद होते. हे मतभेद हंगामापूर्वीच्या बैठकांमधून दूर झाले. या वर्षीच्या हंगामात बियाणेपुरवठ्यातील अडसर त्यामुळे दूर झाले. - प्रभाकर राव, अध्यक्ष, नॅशनल सीड असोसिएशन, तसेच संचालक नुजिविडू सीड कंपनी

नागपूर ः कापसावर बोंड अळीचा झालेला प्रादुर्भाव, परिणामी घटलेली उत्पादकता, दरातील चढउतार यामुळे कापसाखालील क्षेत्र राज्यात चार लाख हेक्‍टरपेक्षा अधिकने कमी होण्याचा अंदाज आहे. कापसाखालील हे कमी झालेले क्षेत्र सोयाबीनखाली येण्याची शक्‍यता असली तरी वाढीव क्षेत्रासाठी बियाणे उपलब्धतेचे नियोजन नसल्याने हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. राज्यात ३९ ते ४० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. या क्षेत्राकरिता एक कोटी ६० लाख बियाणे पाकिटांची गरज राहते. त्यानुसार खासगी कंपन्यांकडून बियाण्याचा पुरवठा होतो. या वर्षीच्या हंगामात गरजेपेक्षा तब्बल दोन कोटी एक लाख बिटी बियाणे पाकिटांचा पुरवठा राज्यात झाला आहे. त्यामुळे बीटी कपाशी बियाण्यांचा कोणताच तुटवडा राज्यात भासणार नसल्याचे संकेत मिळत असले, तरी सोयाबीन बियाण्यांचा तुटवड्याचा सामना राज्यातील शेतकऱ्यांना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.  कापसावर गतवर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापसाची उत्पादकताही घटली. त्यातच कापूस दरातील घसरणीमुळे देखील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. परिणामी, या वर्षी राज्यात कापसाखालील क्षेत्र तब्बल दोन ते चार लाख हेक्‍टरने कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  कापसाचे क्षेत्र कमी होत शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळतील, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. सोयाबीन दरातील तेजी हेदेखील सोयाबीन क्षेत्र वाढीमागील एक कारण सांगितले जात आहे. हंगामा अखेरीस ३३०० ते ३४०० रुपये क्‍विंटलचा दर सोयाबीनला मिळाला. त्यामुळे दरवर्षी ३६ लाख हेक्‍टरवर पेरा असलेले सोयाबीन क्षेत्र वाढून ४० लाख हेक्‍टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ३६ लाख हेक्‍टरकरीता ११ लाख क्‍विंटल बियाण्याचा पुरवठा ‘महाबीज’ व खासगी कंपन्यांमार्फत होतो. या वर्षी सोयाबीन क्षेत्र ४० लाख हेक्‍टरपर्यंत जाणार असल्याची शक्‍यता पाहता त्याकरिता लागणाऱ्या अतिरिक्‍त बियाण्यांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. एकरी २५ ते ३० किलो सोयाबीन बियाण्यांची गरज राहते. त्यानुसार १२ लाख क्‍विंटलपेक्षा अधिक बियाणे लागणार आहे. परंतु त्यासाठी कृषी विभागाची तयारी नसल्याचे वृत्त आहे.  अशी आहे कंपन्यांची तयारी नुजिविडू सीड कंपनीचे संचालक तसेच नॅशनल सीड असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बियाणे कंपन्या व कृषी विभागात बियाणे पुरवठा, तसेच माहितीपत्रक व इतर मुद्यांवर काही मतभेद होते. हे मतभेद हंगामापूर्वीच्या बैठकांमधून दूर झाले. श्री सीड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत श्रीराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विभागाने या वर्षी बोंड अळी नियंत्रणासाठी कृषी विभागाने उपाययोजना केल्या. यामुळे बियाणे कंपन्यांची शेवटच्या क्षणी धावपळ झाली. परंतु बोंड अळी नियंत्रणासाठी हे गरजेचे होते. सोयाबीनचे घरचे बियाणे वापरा कृषी विभागाने अधिकच्या सोयाबीन बियाण्याची गरज भागविण्याकरिता शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कापसाप्रमाणेच सोयाबीन पुरवठादार कंपन्यांवर देखील नियंत्रण आणण्यात आले आहे. त्यानुसार ‘महाबीज’सह ४३ कंपन्यांना सोयाबीन बियाणे विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. १५ मे रोजी बैठक झाली. त्यात कोणती कंपनी किती पुरवठा करेल याबाबत पहिल्या टप्प्यात नियोजन झाले. त्यानंतर २६ मे रोजी दुसरी बैठक झाली. महाबीजकडून हंगामात साडेतीन लाख क्‍विंटल बियाणे पुरवठा होतो; त्यासोबतच खासगी कंपन्याकडून सात लाख क्‍विंटलवर बियाणे पुरवठा होणार आहे. सोयाबीनचा पेरा वाढल्यास शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्याला प्राध्यान द्यावे, असे आवाहन राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक इंगळे यांनी केले आहे. राज्याचा वर्षनिहाय बियाणेपुरवठा  २०१६-१७    १५ लाख ३१ हजार ६८४ क्‍विंटल २०१७-१८    १४ लाख ८ हजार ११२ क्‍विंटल २०१८-१९    मागणी १६ लाख २५ हजार ७७९ क्‍विंटल पुरवठा     १६ लाख ६३ हजार ७५० क्‍विंटल पीकनिहाय अपेक्षित लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये) आणि बियाणे उपलब्धता (क्विंटलमध्ये)  

पीक  क्षेत्र     बियाणे मागणी    उपलब्धता
संकरित ज्वारी   ४ लाख ५० हजार   ३३७५० ३६०३५
सुधारित ज्वारी   ५० हजार   १०००    १६४०
संकरित बाजरी   ८ लाख      २००००     २३६९५
सुधारित बाजरी   ५७ हजार   १८२४   २५१०
भात  १६ लाख  २२५६००  २३१३०३
मका   ८ लाख १६ हजार     १२२४००   १३०७७०
तूर     १६ लाख   ६७२००  ६८२४९
मूग    ५ लाख ३७ हजार  १६११०   १७४२६
उडीद ४ लाख ५० हजार      २३६२५   २४२२०
भुईमूग २ लाख ५० हजार    १५०००    १५३००
तीळ    ४० हजार    ५३०  ८४७
सोयाबीन    ३९ लाख    १०२३७५०   १०३३००९
बीटी कापूस     ४० लाख    ७२०००  ७५३९४
सुधारित कापूस    १ लाख हेक्‍टर      ३०००    ३३५२

प्रतिक्रिया या वर्षी बोंड अळी नियंत्रणासाठी कृषी विभागाने उपाययोजना केल्या. त्यामध्ये बाजारात बियाणे उशिरा आणण्याचा प्रयोग होता. त्यासोबतच बॉक्‍सवर काही बाबी नव्याने छापण्यास सांगण्यात आले. यामुळे बियाणे कंपन्यांची शेवटच्या क्षणी धावपळ झाली. परंतु बोंड अळी नियंत्रणासाठी हे गरजेचे होते.  - विनीत श्रीराव,  मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री सीड कंपनी

कृषी विभागाने बोंड अळी नियंत्रणासाठी बाजारात बियाणेपुरवठ्याकरिता केलेल्या नियोजनामुळे धावपळ झाल्याचे सांगितले. परंतु व्यापक शेतकरी हित लक्षात घेता; आमचीदेखील त्याविषयी तक्रार नव्हती. - समीर मुळे,  कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक, अजित सीड कंपनी

मागील हंगामात कापसावर मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा लागवड करताना बोंड अळी नियंत्रणासाठी रिफ्यूजी बियाणे वापरावे.  - नवीन शहा, विभागीय मार्केटिंग व्यवस्थापक,  राशी सीड्स प्रा. लि. कंपनी

सोयाबीन पुरवठ्यासंदर्भाने कृषी विभागाने या वर्षी धोरणात बदल केले. व्यापाऱ्यांना चोर समजून ही धोरण बदलण्यात आली. त्यामुळे इच्छा असूनदेखील अपेक्षित सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करता आला नाही. - शैलेंद्र दफ्तरी, संचालक, दफ्तरी सीड

मागील वर्षी अनधीकृतपणे एच.टी. बियाणे विक्री करण्यात आले होते. यंदा एच.टी. बियाणे बाजारात अनधिकृतपणे पोचू नयेत याकरिता आणखी नियंत्रणाची गरज आहे.  - नितीन चौधरी, शिवा ॲग्रीजेनेटिक्‍स प्रा. लि.

कृषी विभागाने दिलेल्या सूचनेचे पालन करून बियाणे बाजारात पुरवढा करणे आवश्यक होते. त्यामुळे बियाणेपुरवठा उशिरा झाला तरी बाजारात कोणताही बियाणे तुटवडा नाही.  - माधव शेंबेकर, अंकुर सीड कंपनी

या वर्षी कृषी विभागाने राबविलेल्या जागृतीच्या परिणामी शेतकरी अवैध बियाण्यांविषयी सावध झाले. त्याच्या परिणामी नामांकित कंपन्यांच्या ब्रॅण्डलाच शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. - हरीश पांडे, जनरल मॅनेजर, कावेरी सीड 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com