रिलायन्स विमा कंपनीला पीकविमाप्रकरणी नोटीस

रिलायन्स विमा कंपनीला पीकविमाप्रकरणी नोटीस
रिलायन्स विमा कंपनीला पीकविमाप्रकरणी नोटीस

परभणी ः २०१७ च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत केलेल्या अनियमिततेप्रकरणी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीला शनिवारी (ता. १४) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आठ दिवसांच्या आत सर्व बाबींचा खुलासा करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी नोटिसीद्वारे दिला आहे.

परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेची अमंलबजावणी करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने राज्य शासन आणि रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक होते. परंतु रिलायन्स विमा कंपनीने अटी, शर्तींचे पालन न करता पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विहित वेळेत नुकसान भरपाई अदा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी १ हजार ३०० च्यावर तक्रारी विमा कंपनीकडे पाठविल्या; परंतु त्यांचे निरसन करण्यात आलेले नाही. विमा कंपनीने तालुका स्तरावर कार्यालय उघडून तेथे विमा प्रतिनिधींची नेमणूक करणे आवश्यक आहे. परंतु कंपनीकडून याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाले नाही. विमा परतावा प्रश्नांवर शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणासह विविध आंदोलने सुरू केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. याप्रकरणी सर्व बाबीचा खुलासा आठ दिवसांत सादर करण्यात यावा, अन्यथा कादेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीचे प्रकाश थाॅमस यांना पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिसीद्वारे दिला आहे. अदा केलेली आणि खात्यात जमा रकमेत फरक पोखर्णी (ता. परभणी) येथील नरहरी सोपान वाघ यांच्या १ हेक्टरवरील मूग पिकाच्या नुकसानीबद्दल विमा कंपनीने ४ हजार ७४६.८७ रुपये, ६० गुंठे उडीद पिकाच्या नुकसानीबद्दल ५८९.९९ रुपये अदा केल्याचे दाखविले आहे. परंतु नरहरी वाघ यांच्या खात्यावर प्रत्यक्षात २ हजार ३५६ रुपये जमा झाले असल्याचे आढळून आले. प्रसाद तातेराव वाघ यांना कंपनीने मूग आणि उडिदाच्या नुकसानीबद्दल अदा केल्याचे दाखविलेली रक्कम आणि त्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेली रक्कम यामध्ये १ हजार ७७१.२४ रुपये एवढी तफावत येत आहे. या दोन शेतकऱ्यांना अदा केलेल्या विमा परतावा रकमेची शेतकऱ्यांच्या खात्यावर कमी रक्कम जमा झाल्याचे आढळून आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com