सोलापूर बाजार समिती निवडणुकीत नेत्यांचे ठरेना, कार्यकर्ते संभ्रमात

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत नेत्यांचे ठरेना, कार्यकर्ते संभ्रमात
सोलापूर बाजार समिती निवडणुकीत नेत्यांचे ठरेना, कार्यकर्ते संभ्रमात

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कोणत्याच राजकीय पक्षाने अद्याप आपले पॅनेल घोषित न केल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. नेत्यांकडून अद्यापही बैठकावर बैठका आणि फक्त चाचपणीच सुरू आहे. परिणामी कोणाचा पत्ता कट होणार, कोणाला संधी मिळणार, याबाबत कोणतीच माहिती समोर येत नसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. सध्या तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख या भाजपमधील दोन्ही गट अशी तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.  आतापर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात ही बाजार समिती राहिली आहे. भाजप आणि शिवसेनेला कधीच संधी मिळाली नाही. त्यातच यंदा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने या जोरावर भाजपकडून जोरदार शक्‍तिप्रदर्शन सुरू आहे. स्वतः सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार व पणन खाते आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार असो की पणन कायद्यातील विविध दुरुस्त्या यांसारख्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर देशमुख हे बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह काही संचालकांवर बाजार समितीतील गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यासाठी मैदान तयार झाले आहे, अशी शक्‍यता असताना आता भाजपचेच दुसरे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे स्वतः दुसरे पॅनेल करून लढण्याच्या तयारीत असल्याने मंत्री सुभाष देशमुखांच्या `प्रयत्ना'वर विरजन पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे त्यांना कॉंग्रेसमधीलच काही नेते पाठबळ देत आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढत आहे. माजी आमदार माने यांच्यासह त्यांच्या संचालकांना आता जामिन मिळाला आहे. त्यांनीही त्यांच्या परीने जोरदार तयारी सुरू केली आहे. काही गुप्त बैठका आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचे सांगण्यात येते. पण अद्याप ठोस काहीच ठरलेले नाही. तर मंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनीही स्वतंत्रपणे बैठका आणि चर्चा सुरू ठेवल्या आहेत. पण कोण कोणासोबत जाणार, याचे चित्र अद्यापही ठरलेले नाही. येत्या 19 जूनला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. पण तोपर्यंत कार्यकर्त्यांना नेत्यांकडे बघत राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com