राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता

राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता
राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता

मुंबई : राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिमवाहिनी नद्या व महानदी खोऱ्यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास शुक्रवारी (ता. २२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील सर्वच खोऱ्यांच्या एकत्रित एकात्मिक जल आराखड्याचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या वेळी दिले.  सह्याद्री अतिथिगृहात शुक्रवारी (ता. २२) झालेल्या परिषदेच्या बैठकीस परिषदेचे उपाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते. राज्यात गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिमवाहिनी नद्या व महानदी या सहा खोऱ्यांचा अभ्यास करून स्वतंत्रपणे जल आराखडे तयार करण्यात आले. यापैकी गोदावरी खोऱ्याच्या जल आराखड्यास ३० नोव्हेंबर २०१७ रोजी मान्यता देण्यात आली होती. तर उर्वरित पाच आराखड्यांचे सादरीकरण काल परिषदेच्या बैठकीत करण्यात आले. सर्व खोऱ्यांचा एकात्मिक जल आराखडा मंजूर होईपर्यंत प्रत्येक खोरे निहाय आराखड्याची अंमलबजावणी करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. जल आराखडे मंजूर झाल्यामुळे सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की राज्य जल परिषदेने व जलसंपदा विभागाने राज्यातील नदी खोऱ्यांचे आराखडे तयार करून ऐतिहासिक काम केले आहे. नदी खोऱ्यांचे आराखडे तयार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. कृष्णा खोऱ्यातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, तसेच सर्व शहरांना येत्या तीन वर्षात सांडपाणी पुनर्वापर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. कोकण भागातील नदी खोऱ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी भविष्यात नावीन्यपूर्ण पद्धती वापरण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे श्री. कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव रा. वा. पानसे, सचिव (लाभक्षेत्र विकास) अ. वा. सुर्वे, मेरीचे महासंचालक आर.आर. पवार आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com