राज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेत

पेरणी
पेरणी

पुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा मुगाचा पेरा घटण्याची शक्यता असून, कडधान्य बियाण्याला अजूनही मागणी वाढलेली नाही, अशी माहिती बियाणे उद्योगाच्या सूत्रांनी दिली.  चार लाख हेक्टरच्या आसपास मुगाचा पेरा करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रमुख मुग उत्पादक राज्य समजले जाते. मृग नक्षत्रातील चांगला पाऊस पाहून शेतकरी मुगाचा पेरा करतात. यंदा मात्र, मृगात तोंड दाखवून पाऊस बेपत्ता झाल्यामुळे बाजारात मुगाच्या बियाण्याला उठाव नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बियाणे उद्योगाच्या अंदाजानुसार मुगाची लागवड यंदा पाच ते साडेपाच लाख हेक्टरवर अपेक्षित होती. महाबीजनेदेखील यंदा सहा हजार क्विंटल बियाणे पुरविण्याची तयारी केली. खासगी कंपन्यांचे नियोजन बघता १७ हजार क्विंटलच्या आसपास मूग बियाणे पुरविले जाणार होते. मात्र, बाजारात मूग बियाण्याला मागणी नसून, पेरा घटण्याची दाट शक्यता आहे, असे महाबीजमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘‘२५ जूनपर्यंत राज्यातील मुगाचा सर्व पेरा आटोपणे अपेक्षित आहे. कारण, त्यानंतर लागवड झाल्यास मुगाचे नुकसान होते. आता मुळात पाऊस २० ते २३ जूनपर्यंत परतण्याचे संकेत नसल्यामुळे मुगाचा पेरा घटणार असे दिसते आहे. उडदाचा पेरा १५ जुलैपर्यंत चालतो. मात्र, उडीद आणि तूर बियाण्यांमधील हालचाली उत्साहवर्धक नाहीत’’, अशी बियाणे बाजारातील सूत्रांनी स्पष्ट केले. राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता राहील, असे कृषी खात्याला वाटत होते. त्यामुळे टंचाई जाणवल्यास शेतकऱ्यांनी स्वतःजवळील बियाणे वापरावेत, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. मात्र, सध्या पाऊस नसल्यामुळे सोयबीन बियाण्यांची सार्वत्रिक टंचाई आहे की नाही हे लक्षात आलेले नाही. राज्यात यंदा ३९ लाख हेक्टरवर सोयबीनचा पेरा होण्याची चिन्हे आहेत. कंपन्यांकडून किमान एक लाख ३३ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा केला जाईल. त्यापैकी महाबीजने आपल्या वाट्यातील चार लाख ३० हजार क्विंटल सोयाबीन बियाणे बाजारात पाठविले असून, त्यापैकी ७० टक्के बियाणे विकले गेले आहे.

कपाशीचा पेरा घटून सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे ‘‘पहिल्या टप्प्यात बियाणे बाजारात सोयाबीन बियाण्याची उचल चांगली झाली. महाबीज अजून दहा हजार क्विंटल बियाणे विविध भागात पाठविणार आहे. राज्यात सोयाबीनचा ४० टक्के पेरा झाला असून, शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचा इतिहास बघता सोयाबीन उत्पादक शेतकरी आशावादी आहेत. १५ जुलैपर्यंत सोयाबीन पेरला जात असला तरी काही भागात अगदी जुलैअखेरपर्यंत पेरा सुरू असतो. त्यामुळे यंदा कपाशीपेक्षाही राज्यात सोयाबीनचे पेरा मजबूत राहील,’’ असा अंदाज महाबीजच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com