कर्ज मागतोय म्हणजे गुन्हा करतोय का ?

कर्जासाठीची फाइल देऊन १५ दिवस झालेत. दरवेळेस बॅंकेत गेलो की एकतर अधिकारी जागेवर नसतात आणि ते भेटले तर फोन करून कळवतो, असं सांगितले जात आहे. अजून किती दिवस लागतील तेच समजत नाही. - विष्णू पानगव्हाणे, चोंडी, ता. सिन्नर
सिन्नर : येथील स्टेट बॅंकेत पीककर्जासाठी शेतकऱ्यांना दिवसभर थांबून प्रतीक्षा करावी लागत आहे.
सिन्नर : येथील स्टेट बॅंकेत पीककर्जासाठी शेतकऱ्यांना दिवसभर थांबून प्रतीक्षा करावी लागत आहे.

वडांगळी, जि. नाशिक : महिना झालाय. बॅंकेतल्या साहेबानं सगळे कागदपत्र घेतले. सगळे कागदपत्रं घेण्यासाठी आधीच चार चकरा माराव्या लागल्या. जामीनदार शोधावे लागले. दरवेळी चौकशी केली की कळवू म्हणताहेत. साहेब जागेवर कधीच नसतात. पाऊस सुरू झालाय. पेरणी कशी करायची? बॅंकवाले नुस्ता अंत पाहताहेत. कर्ज मागतोय म्हणजे गुन्हा करतोय का?.. या शब्दात वडांगळीच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वडांगळी शाखेत आलेल्या शेतकऱ्याने संताप व्यक्त केला.  पीक कर्जासाठीची ‘वेटिंग'' संपायला तयार नाही. पेरणीचा वाफसा निघून गेल्यास पुन्हा पिकच हातातून जाण्याची भीती आहे. राग, संताप, असहायता..याचं मिश्रण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होतंय. आज ना उद्या कर्ज मिळेल ही आशा आहे. त्यामुळे फक्त वाट पाहणंच शेतकऱ्यांनी स्वीकारलंय. वडांगळी गावची बॅंक ऑफ महाराष्ट्र ही परिसरातील १५ गावांची बॅंक आहे. त्यामुळे महिनाभरापासून या बॅंकेत वर्दळ सुरू आहे. जिल्हा बॅंकेचे दरवाजे बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे वळण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र, शेतकऱ्यांची गर्दी जास्त, कर्मचाऱ्यांची संख्या कमी. पीक कर्जाशी संबंधित कृषी अधिकारी येणार आठवड्यातून एकदा. तोही वेळेवर येत नाही. या स्थितीत पीक कर्जाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे.  कर्जमाफीच्या घोळाचा फटका सिन्नर तालुक्‍यात मका, सोयाबीन, कांदा ही मुख्य पिके. या पिकांसाठी आतापर्यंत प्रामुख्याने गावाच्या सोसायटीतून म्हणजे जिल्हा बॅंकेकडून अर्थपुरवठा होत होता. कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांकडून कर्ज भरून घेतले. मात्र, पुन्हा कर्ज देण्यास हात वर केले आहेत. या स्थितीत गावातील सोसायटी व जिल्हा बॅंक शाखेत शुकशुकाट पसरला आहे. त्याच वेळी राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेत वर्दळ वाढली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकेत कर्ज मिळण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. थोड्या वजनदार कर्जदारांनाच या बॅंकेचे अधिकारी सहकार्य करीत असून, इतर ७० टक्के सामान्य कर्जदार शेतकऱ्यांना वेगवेगळी कारणे सांगून परत पाठविले जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.  प्रतिक्रिया जिल्हा बॅंकेने मार्च महिन्याच्या आतच सगळं कर्ज भरून घेतलं. नंतर आता कर्ज तर दूरच; पण आमचेच पैसे बॅंकेत अडकलेत. पैसे असून खरिपाकरिता वापरता येत नाही; मग या बॅंकांचा उपयोग तरी काय? - निवृत्ती सानप, जामगाव, ता. सिन्नर

कागदपत्रांमधली त्रुटी काढून प्रकरण लांबवणे नाहीतर ते नाकारणे हेच बॅंकेत जास्त चाललंय. कर्मचारी कमी असल्याचं कारणं सांगून दरवेळी कर्जाचं काम पुढं ढकलंल जातंय.  - सचिन ठोक, वडांगळी, ता. सिन्नर

दरवर्षी नित्यनेमानं कर्ज भरीत आलो आहे. यंदा मात्र पिकातून उत्पन्नच मिळाले नसल्याने भरता आले नाही. बॅंकेत गेल्यानंतर अगोदर कर्ज भरा. नंतरच पुढील कर्जाचं बघू. असं सांगताहेत. पुन्हा कर्ज मिळेल की नाही, याबाबत स्पष्ट कुणीही सांगत नाही. - सखाराम सांगळे, वडगाव, ता. सिन्नर

राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सरळ सरळ अडवणुकीचंच धोरण स्वीकारलेलं दिसतंय. अधिकाऱ्यांच्या संपर्कातील कर्जदार आहेत त्यांचीच कामे होत आहेत. बाकी सर्वसामान्य शेतकरी कर्जदार फक्त हेलपाटे घालीत आहे.  - जितेंद्र घोटेकर, वावी, ता. सिन्नर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com