कर्जमाफीच्या घोळामुळे रखडले पीककर्ज

​चार वर्षांपूर्वी केसीसीअंतर्गत घेतलेले ६० हजार रुपये कर्ज थकले. पुनर्गठनासह एक लाख १५ हजार रुपये कर्ज होते. केसीसीचे व्याजासह ७० हजार रुपये माफ झाल्याचे गावात लागलेल्या यादीमुळं कळाले. पुनर्गठनाच्या ६६ हजार कर्जास माफी नाही. पुनर्गठनाच कर्ज तेवढ भरा लगेच नवीन कर्ज देतो असे मॅनेजरनं सांगितले. - इंदूबाई कदम, धामदरी, ता. अर्धापूर.
अर्धापूर, जि. नांदेड ः भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत अनुदान, विमा परताव्याचे पैसे काढण्यासाठी लागलेली रांग.
अर्धापूर, जि. नांदेड ः भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत अनुदान, विमा परताव्याचे पैसे काढण्यासाठी लागलेली रांग.

नांदेड ः गावातही कर्जमाफीच्या याद्या लावल्या आहेत. त्यातील नाव बघून बरं वाटत आहे. पण बॅंकेमध्ये जाऊन विचारले तर बॅंक व्यवस्थापक कॉम्प्युटर मध्ये बघून इथं तुमच नाव दिसत नाही. कर्जमाफी नाही असे सांगत असल्यामुळे पदरी निराशा पडत आहे. कर्जमाफी मिळाली नाही म्हणून खात्यावर थकबाकी दिसत आहे. त्यामुळे बॅंक पीककर्ज देत नाही. जून महिना संपला असतानाही कर्ज मिळत नाही. त्यामुळे पेरणी कशी करावी, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.   पीककर्ज वाटपातील अडचणी जाणून घेण्यासाठी मालेगाव आणि अर्धापूर येथील बॅंकांच्या शाखांना भेट दिली असता कर्ज वाटपाची गती अजूनही अत्यंत धीमीच असल्याचे आढळून आले. बोंड अळीचे अनुदान, पीकविमा परताव्याची रक्कम तसेच बचत खात्यावर असलेली उरली सुरली रक्कम उचलण्यासाठी सध्या गर्दी दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने पीक कर्जवाटपाबाबत उदासीन असलेल्या तीन बॅंकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. कारवाईची तंबी दिल्यानंतर अन्य बॅंकांदेखील काहिशा नरमल्या. शेतकऱ्यांच्या संघटना, लोकप्रतिनिधींचा रेटा वाढल्याने आता कुठे कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी सात-बारा,नोड्यूज, बाॅंडपेपर घेऊन येण्यास सांगत आहेत. गावे दत्तक नसल्यामुळे कर्ज देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे. मालेगाव येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत लावलेल्या कर्जमाफीच्या यादीतील नाव बघून सावरगांव येथील शेतकरी तुकाराम जाधव हे व्यवस्थापकाच्या कॅबीन मध्ये पासबुक घेऊन गेले. परंतु काॅम्प्युटर मध्ये त्यांचे नाव नसल्याचे सांगितले. असेच चित्र अर्धापूर येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत निदर्शनास आले. गावातील लागलेल्या यादीतील नाव बघून सेलगांव येथील मारोतराव राजेगोरे यांनी बॅंकेत विचारणा केली असता माफीत बसत नसल्याचे सांगण्यात आले. यादीत नाव असूनही बॅंका ते नसल्याचे सांगत कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. दीड लाख रुपयापर्यंतच्या कर्जास कुटूंब हा घटक ठेवल्यामुळे अडचणी ठरत आहे. दीड लाखावरील रक्कम भरण्यास पैसे नाहीत. कर्ज मिळत नसल्यामुळे नुसत्या रिकाम्या चकरा कशाला मारायच्या म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बॅंकेत जाणे बंद केले आहे. त्यामुळे जून महिन्यात पीक कर्जासाठी बॅंकात दिसणारी गर्दी यंदा दिसत नाही.  

प्रतिक्रिया दोन वर्षांपूर्वी २० हजार रुपये पीक कर्ज घेतले. दुखण्याला पैसा लागला. गेल्या वर्षी आमदनीही झाली नाही. त्यामुळं थकले पण त्याला माफीही नाही. नव्या कर्जासाठी व्याजासह २३ हजार भरा म्हणतात. पैसे नसल्यामुळं अजून पेरणी केली नाही. - उत्तम वाघमारे, सावरगाव, ता. अर्धापूर. मह्या आणि पोराच्या नावानं अंशी-अंशी हजार रुपये असे एक लाख ६० हजार कर्ज चार वरसांपूर्वी उचलेले त्याचे तीन लाख झाले. माफीसाठी बॅंकेत जाऊन विचारले तर दोघाचे कुटूंब एकच असल्यानं कुणालाही एकाला दीड लाखाची माफी मिळेल एकाचे दीड लाख भरा म्हणतात. पेरणीसाठी मागामागी केली तर भरायचे कसे थकबाकीदारच राहणार आहोत. - मारोती गवळे, धामदरी, ता. अर्धापूर. बॅंकेत लावलेल्या यादीत नाव आहे. पण मॅनेजरनं कॅाम्प्युटर पाहून यादीत नाव दिसत नसल्याचे सांगितले. यादी लावून उपयोग काय. - तुकाराम जाधव, सावरगाव, ता. अर्धापूर.

तीन वरसापूर्वी घेतलेल्या एक लाखाचे आता दीड लाख झाले आहेत. गावात लागलेल्या यादीत नाव आले म्हणून बॅंकेत आलो. पण मॅनेजर माफीत बसत नाही पैसे भरा म्हणतायत. आमदनी वरच्या वरी पुराना झाली. विमाबी मिळाला नाही. भरण्यासाठी पैसे जुटत नाहीत. - मारोतराव राजेगोरे, सेलगाव, ता. अर्धापूर.

जानेवारी महिन्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत असल्याचा मॅसेज मोबाईलवर आला. बॅंकेत येऊन विचारले तर यादीत नाव आले नसल्याचे सांगितले. गावात तसेच इतर बॅंकांनी यादी लावल्या आहेत. पण एसबीआयने अजून लावली नाही. - गंगाप्रसाद गवळे, उमरी, ता. अर्धापूर.

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून घेतलेल्या ९० हजार कर्जाचे १ लाख ३७ रुपये झालेले कर्ज माफ झाले आहे.आता मुद्दल तेवढे कर्जे देतो त्यासाठी कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले आहे. - व्यंकटी जंगीलवार,   चणापूर, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com