मराठवाड्यावर पाऊस अद्याप रुसलेलाच

मराठवाड्यावर पाऊस अद्याप रुसलेलाच
मराठवाड्यावर पाऊस अद्याप रुसलेलाच

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाची बेपर्वाई कायम आहे. त्यामुळे खरिपाची पिके कोमेजून चालली अाहेत. एकूण ७६ तालुक्‍यांपैकी तब्बल ६५ तालुक्‍यांत आजपर्यंत अपेक्षित पाऊसच पडला नाही. यापैकी ९० मंडळांत तर अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस पडला नसून १३३ मंडळांतील पावसाचा टक्‍का ७५ च्या आत राहिल्याची स्थिती आहे. पावसाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी केवळ ८० मंडळ अपेक्षित पावसाच्या कसोटीवर पास असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्‍यात आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ३५ टक्‍के पाऊस पडला. त्यापाठोपाठ कन्नड तालुक्‍यात ४१ टक्‍के, वैजापूर तालुक्‍यात ४९ टक्‍केच पाऊस पडला. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्‍यात केवळ ४७ टक्‍के, तर भोकरदन तालुक्‍यात पावसाने अपेक्षेचा निम्मी सरासरी कशीबशी गाठली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यात पावसाची स्थिती बिकट आहे. या तालुक्‍यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ४१ टक्‍के पाऊस झाला. धारूर तालुक्‍यात ५० टक्‍के, शिरूर कासार तालुक्‍यात ५६ टक्‍के, परळी, वडवणी तालुक्‍यात ५७ टक्‍केच पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५३ टक्‍के पाऊस झाला.

सात तालुक्‍यांत ५० टक्‍केही पाऊस नाही मराठवाड्यातील सात तालुक्‍यांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍याचा समावेश आहे.

केवळ ११ तालुक्‍यांत अपेक्षित पाऊस मराठवाड्यातील केवळ ११ तालुक्‍यांत आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत पाऊस झाला आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तब्बल आठ तर परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्‍याचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, हदगाव, हिमायतनगर, परभणीतील पुर्णा, हिंगोलीतील कळमनुरी, लातूरमधील निलंगा तालुक्‍याचा यामध्ये समावेश आहे.

राजुरी मंडळात केवळ ४५ मिलिमीटर पाऊस बीड जिल्ह्यातील बीड तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या राजुरी मंडळात आजपर्यंत २६८ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत आजपर्यंत केवळ ४५ मिलिमीटर पाऊस झाला. नाळवंडी मंडळात ७३ मिलिमीटर, पेंडगाव मंडळात ३० मिलिमीटर, गेवराई तालुक्‍यातील चकलांबा मंडळात ६९ मिलिमीटर, उमापूर मंडळात ७९ मिलिमीटर, परळी तालुक्‍यातील धर्मापुरी मंडळात ७८ मिलिमीटरच पावसाची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील निल्लोड मंडळात ६९ मिलिमीटर, बोरगाव बाजार मंडळात ६५ मिलिमीटर, कन्नडमधील चिकलठाणा मंडळात ७६ मिलिमीटर, गंगापूरमधील भेनडाला मंडळात ६६ मिलिमीटर पावसाची नोंद घेतली गेली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com