कवठेमहांकाळ, जि. सांगली ः येथे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
कवठेमहांकाळ, जि. सांगली ः येथे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’

सरकारसमोर आम्ही दुसरा पर्यायदेखील ठेवत आहोत. पावडर प्लांटचालकांनी शेतकऱ्यांचे दूध २५ रुपये रोखीत खरेदी केल्यास आम्ही मान्य करू. पावडरवाल्यांना सरकारने काय द्यायचे ते द्यावे; पण शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर प्लांटवाल्याने दिल्यास इतर संघ आपोआप २७ ते २९ रुपये दर आम्हाला देतील. आता काय करायचे ते सरकारने ठरवावे, असे श्री. शेट्टी यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले.

पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान देण्याबाबत सरकार निर्णय घेत नसल्याचे पाहून खासदार राजू शेट्टी यांनी आज (ता. १९) राज्यभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राज्यभरात मुलाबाळांसह जनावरे घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. तर तिसऱ्या दिवशीही राज्यात दूध आंदोलनाची धग कायम होती. दूधदराबाबत कोणताच तोडगा न निघाल्याने मुख्यमंत्री आज पुन्हा बैठक घेणार आहेत. दुसरीकडे आंदोलनामुळे मुंबई, पुण्याची दूधकोंडी होण्यास सुरवात झाली आहे.  ‘‘आजचा राज्यव्यापी चक्का जाम शेतकरी उत्स्फूर्तपणे करीत आहेत. कारण, माझे ८ हजार कार्यकर्ते पोलिसांनी पकडून ठेवले आहेत. आजच्या आंदोलनानंतर आम्ही पुन्हा पुढची दिशा जाहीर करू. आंदोलनाची तीव्रता वाढविण्याची आमची तयारी आहे. कोणी मध्यस्थीला पाठवले तर चर्चा करणार का, मला निरोप आला आहे. मी देखील तयार आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दाम दिलेच पाहिजे यावर मी ठाम आहे,’’ असे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. 

गुजरातचे दूध रोखले राज्याच्या विविध भागांमध्ये टॅंकरफोड आंदोलन करून पुणे, मुंबईकडे जाणारे ५० टक्के दूध रोखण्यात स्वाभिमानी यशस्वी झाली. त्यामुळे मुंबईला दूध पुरविण्याचा एकमेव पर्याय गुजरातचा होता. मात्र खासदार शेट्टी यांनी मुंबई- अहमदाबाद हायवेवर ठाण मांडले. गुजरातची सीमा असलेल्या दापचरी चेकपोस्टवर रात्रभर पहारा ठेवत तो पर्यायदेखील शेट्टी यांनी बंद केला. हायवेने येणारे दुधाचे टॅंकर अडवून शेट्टी बुधवारी भल्या सकाळी डहाणूरोड रेल्वे स्थानकात घुसले. ‘‘मुंबईत रेल्वेने दूध नेण्याचा डावदेखील स्वाभिमानीने उधळून लावला. सौराष्ट्र एक्स्प्रेसला दुधाचे टॅंकर जोडले जातात. मात्र, आंदोलकांच्या धमकीमुळे ४४ हजार लिटर क्षमतेचे बारा दूध टॅंकर जोडले गेले नाहीत. मुंबईला दूधपुरवठा करणाऱ्या अमूलची पुरती कोंडी करण्यात आली आहे,’’ असेही स्वाभिमानीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

सदाभाऊ खोत यांच्यावर रोष  ‘‘स्वाभिमानीची मागणी रास्त आहे. त्याला सर्व शेतकरी व राजकीय पक्षांचादेखील पाठिंबा आहे. राज्य सरकारने चर्चेला बोलावले असते तर दुसऱ्याच दिवशी आंदोलन समाप्त झाले होते. मात्र, यात कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नको तितका हस्तक्षेप झाला. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनीही परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही. खोत यांच्या हस्तक्षेपामुळेच कार्यकर्ते आणखी बिथरले आहेत,’’ असेही स्वाभिमानीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची धग स्वाभिमानीचे प्राबल्य असलेल्या मिरजेच्या सावळवाडी, माळवाडी, दुधगाव व बागणी भागात स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी एसटी बसेसवर तुफान दगडफेक केली. कोल्हापूर जिल्ह्यात दूध आंदोलनाला हिंसक वळण लागले. जयसिंगपूर येथून पोलिस संरक्षणात मुंबईकडे निघालेल्या वारणा, गोकूळ, नंदणी दूध संघाचे १९ टँकर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी फोडले. साताऱ्याच्या खंडाळा भागातील अहिरे येथे ग्रामपंचायत चौकात माजी सभापती रमेश धायगुडे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून संताप व्यक्त केला. कर्नाटकच्या सीमा भागातून सोलापूरला येणारे दूध स्वाभिमानीने रोखून त्याचे वाटप गोरगरिबांना करण्यात आले. सोलापूरमध्ये बंदमध्ये दूध संकलन करणारे बेगमपूर येथील नेचर डिलायटचे दूध संकलन केंद्र फोडले गेले. स्वाभिमानीचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष बिळ्यांनीसिद्ध सुंटे यांना पोलिसांनी वडकबाळ येथे आंदोलन करताना ताब्यात घेतले.

 पुण्यातदेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, प्रवक्ते अनिल पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, अर्ध्या तासात पुन्हा सोडून देण्यात आले. स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष रौनक जया शेट्टी यांनाही अटक करून जमिनीवर सोडण्यात आले. त्यांनी डेक्कन व कर्वे रस्त्यावर दुधाची दोन वाहने फोडली होती. मराठवाड्यात जालना येथे तिसऱ्या दिवशीही स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ढोरकुले पाटील, नामदेव खोसे, सुरेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दुधाचे टॅंकर रस्त्यात रिकामे केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद भागात आंदोलन सुरू असताना जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांना मात्र भूम पोलिसांनी अटक केली. 

शेट्टी यांना अटक झाल्यास भडका ः पोपळे  खासदार शेट्टी हे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहेत. मात्र, सरकार राजकारण करीत असून, अधिकार नसलेला एक राज्यमंत्री नको तितकी लुडबूड करीत आहे. आम्हाला काहीही मोठेपणा देऊ नका, चर्चेलाही बोलवू नका; पण शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात त्यांचा हक्क जमा करा. आम्ही आंदोलन मागे घेऊ, असे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे यांनी स्पष्ट केले. 

चक्का जाम निर्णायक ठरेल ः पवार  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजचा चक्का जाम निर्णायक स्वरूपाचा करण्याचा ठरविले आहे. आम्ही मिळेल तेथे वाहतूक अडविणार आहोत. कोणत्याही स्थितीत दुधाची वाहतूक पूर्णतः रोखण्याचे ठरविण्यात आलेले आहे. गोकूळचे टॅंकर पेटविण्यात आल्यामुळे मुंबईच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत. चितळे डेअरीने संकलन बंद ठेवल्यामुळे पुण्यातदेखील परिणाम झाला आहे, असे स्वाभिमानीचे प्रवक्ते अनिल पवार यांनी सांगितले.  अमूल डेअरीसमोर शेट्टींचा ठिया मुंबईत गुजरातमधून महामार्ग व रेल्वेने येणाऱ्या दुधाची नाकेबंदी केल्यानंतर खा. राजू शेट्टी बुधवारी सायंकाळी मुंबईतील बोईसरच्या अमूल डेअरीसमोरच ठिय्या देऊन बसले. डेअरीत दूध आत जाणार नाही आणि बाहेरचेदेखील दूध आत घेऊ देणार नाही, अशी भूमिका खा. शेट्टी यांनी घेतल्याने पोलिसांचीही कोंडी झाली. 

आंदोलनातील दिवसभरातील घडामोडी 

  • ‘स्वाभिमानी’ची राज्यभरात ‘चक्का जाम’ची हाक
  •  गुजरातवरून मुंबईला येणारे दुध रोखले
  •  रेल्वेने दूध नेण्याचा डाव स्वाभिमानीने उधळला
  •  ठिकठिकणी आंदोलनाला हिंसक वळण
  •  शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक
  •  बोईसरच्या अमूल डेअरीसमोरच शेट्टींचा ठिय्या
  •  आंदोलन तीव्र करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना
  •  मुख्यमंत्री आज घेणार पुन्हा बैठक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com