‘एसएओ’ पदासाठी आता थेट केंद्रीय मंत्रालयातून शिफारशी

‘एसएओ’ पदासाठी आता थेट केंद्रीय मंत्रालयातून शिफारशी
‘एसएओ’ पदासाठी आता थेट केंद्रीय मंत्रालयातून शिफारशी

पुणे : कृषी खात्यामधील मलईदारपदांना चटावलेल्या अधिकाऱ्यांनी आता थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदाच्या बदल्यांसाठी केंद्रीय मत्रालयातून शिफारशी आणणे सुरू केले आहे.  राज्यात कृषी विस्ताराच्या ठप्प  झालेल्या कामकाजाला समुपदेशन बदल्यांमधून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध  करून देण्याचे प्रयत्न कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून सुरू आहे. मात्र, त्यांनी ‘ब्लॉक’ केलेली मलईदारपदे ‘ओपन’ करून सोयीने बदल्या केल्याचे उघड   झालेले आहे. दुसऱ्या बाजूला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणजेच एसएओपदासाठी बदल्यांचा पोरखेळ मांडल्याचे दिसत आहे.  धुळ्याचे ‘एसएओ’पद प्रकाश सांगळे यांच्या निवृत्तीमुळे काही दिवसांपूर्वी रिक्त झाले होते. या पदावर नाशिकचे ‘एसएओ’ तुकाराम जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता जगताप यांची बदली रद्द करण्यात आली आहे. धुळ्याच्या एसएओपदी जळगावचे एसएओ व्ही. एस. सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नगरचे आत्मा प्रकल्प संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांची बदली चंद्रपूरच्या एसएओपदी झाली होती. मात्र, आता ही बदली देखील रद्द करण्यात आली आहे. कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उदप पाटील यांनी चंद्रपूरचे एसएओ करण्यात आलेले आहे.  कृषी विभागाच्या नियोजनासाठी आयुक्तालयातील कृषिगणना उपायुक्तपद महत्त्वाचे असूनही ते मलईदार नसल्यामुळे या पदावर एका एसएओची नियुक्ती करूनदेखील तो पद घेण्यास राजी नसल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या बाजूला गडचिरोलीचे आत्मा प्रकल्पसंचालक प्रकाश पाटील यांना अमरावती एसएओपदी एक फेब्रुवारीला नियुक्त करण्यात आले होते. प्रत्यक्षात चार जूनच्या नव्या आदेशात पाटील यांची नियुक्ती रद्द् करून तेथे रवींद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ‘राज्यातील एसएओंच्या बदल्या ३१ मेपूर्वी करणे बंधनकारक होते. मात्र, मलईदार पदांसाठी घोळ घातला गेला. एका अधिकाऱ्याने चक्क केंद्रीय मंत्रालयातून शिफारसपत्र आणले. अशा पत्रांची दखल घेतलीच जाते असे नाही. मात्र, त्यातून प्रशासनावर दबाव पडतो. कारण, मंत्र्यांचे आदेश न पाळल्याचा संदेशदेखील यातून दिला जातो,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.  विस्तार कामापेक्षा आम्हाला मलईदार पदांमध्ये रस कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे गेल्या दहा दिवसांपासून कृषी मंत्रालयाला कोणीही वाली नाही. मात्र, मधल्या काळात बदल्यांचे आदेश धडाधड काढले जात आहेत. यात बदलदेखील केले जात आहेत. त्यामुळे कृषी मंत्रालय नेमके कोण चालवतो आहे, असा प्रश्न कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित करीत आहेत. ‘शेतकरी खरिपाच्या तयारीत असताना कृषी विभागाने बदल्यांचा तमाशा मांडला आहे. त्यामुळे विस्तार कामापेक्षा मलईदार पदांमध्ये कृषी अधिकाऱ्यांना रस असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. कृषी विभागातील बदल्या मार्च महिन्यात झाल्या तरच जूनमध्ये सुरू होत असलेल्या खरीप हंगामासाठी पूर्वतयारी अधिकारी करू शकतात; अन्यथा केवळ कागदी घोडे नाचवावे लागतात,’ अशी हताश प्रतिक्रिया कृषी विभागाच्या एका संचालकाने व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com