विधिमंडळ कामकाजाला जोरदार पावसाचा फटका

विधिमंडळ कामकाजाला जोरदार पावसाचा फटका
विधिमंडळ कामकाजाला जोरदार पावसाचा फटका

नागपूर  : सरकारने आपल्या अट्टहासाने नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी (ता. ६) पहिल्याच पावसात वीज गेल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज स्थगित करावे लागले. राज्यात दुर्गम प्रदेशात वीजपुरवठा केला असल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या विधान भवनच्या पॉवर हाउसमधे पाणी साचल्याने संपूर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.  पॉवर हाउसमध्ये पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटरदेखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. विधान भवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील? असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधान भवनाच्या आवारात विचारत होते.  या वेळी विधान भवन परिसरात विरोधी सर्व सदस्य या विषयावरून सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या या निष्काळजीपणावर सडकून टीका केली. अजित पवार यांनी तर संताप व्यक्त करत, कशाला केला होता अट्टहास? मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय? असा सवाल केला.   

‘‘विधिमंडळाच्या इतिहासात अधिवेशन काळात लाइट जाऊन कामकाज बंद पडावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार, नागपूरला अधिवेशन घेण्याचा निरर्थक बालहट्ट यामुळे ही वेळ आली आहे,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले, तरी फडणवीस सरकारने नागपुरात पावसाळी अधिवेशन घेऊन ''जलयुक्त नागपूर'' असल्याचे मात्र दाखवून दिले आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

दरम्यान, पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज बंद होण्याची ही पहिली वेळ नसून, नागपुरात झालेल्या पहिल्या पावसाळी अधिवेशनातदेखील पाऊस आल्याने कामकाज बंद केले होते, असा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे.   शिवसेनेचा पलटवार  पाऊस पडल्याने मुंबई दरवर्षी तुंबते यावरून शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भाजपवर नागपूर तुंबल्याने शिवसेनेने पलटवार केला. रविभवन व आमदार निवासासह विधान भवनात पाणी तुंबल्याने शिवसेनेने हल्लाबोल केला. मुंबईचा नैसर्गिक भूभाग समुद्रसपाटीला असून, नागपूरपेक्षा कित्येक पट पाऊस जास्त पडतो. मात्र मुंबई महापालिका तातडीने उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणते, असा दावा आमदार सुनील प्रभू यांनी केला. मुंबई तुंबल्यानंतर महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. आता नागपुरात पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन बंद करावे लागले याला नागपूर महापालिका जबाबदार नाही काय? जो न्याय राजधानी मुंबई मनपाला दिला जातो तो न्याय उपराजधानी नागपूर देणार काय, असा सवाल शिवसेना नेते व आमदार उपस्थित करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com