राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा

राज्यात सध्या निर्यातक्षम केळी फारशी उपलब्ध होत नाही. अधिक दर देऊनही अनेकदा केळी मिळत नाही. यामुळे परदेशातील निर्यातीवर परिणाम झाला आहे. - प्रशांत धारपुरे, केळी निर्यातदार
केळी
केळी

जळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण झाला असून, केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून आखातातील किंवा परदेशातील केळी निर्यात मागील २० दिवसांपासून बंद झाली आहे. सध्या फक्त अकलूज, टेंभूर्णी (जि. सोलापूर) येथे निर्यातक्षम केळी उपलब्ध होत असल्याची माहिती केळी व्यापारातील अभ्यासकांनी दिली आहे.  अकलूज व टेंभूर्णी येथे काही कंपन्या परदेशात केळी निर्यातीसाठी काम करीत असून, तेथून प्रतिदिन चार कंटनेर केळीची निर्यात परदेशात सुरू आहे. निर्यातक्षम केळीला १३५० रुपयांपर्यंत दर सध्या मिळत आहे. मध्यंतरी केळी मिळतच नव्हती, त्यामुळे निर्यातदारांना जादा दर द्यावे लागले. रावेर, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील केळी निर्यात मागील मागील २० दिवसांपासून बंद झाली आहे. परिणामी केळीच्या दरांवर दबाव आहे. कुठलीही दरवाढ किंवा दरांमधील सुधारणा जळगाव जिल्ह्यात मागील २० ते २५ दिवसात झालेली नाही. सध्या रावेरातील निंभोरा, केऱ्हाळे, कर्जोद, रसलपूर, चिनावल, निंबोल, विटवा आदी भागात केळी उपलब्ध होत आहे. तर यावल तालुक्‍यातील सांगवी बुद्रुक, भालोद, साकळी भागात केळीचा पुरवठा सुरू आहे. ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहे. नवती बागांमधील कापणी अंतिम टप्प्यात आहे. तर चोपडा, जळगाव, जामनेर, भडगाव भागात कांदेबागांची कापणी ऑक्‍टोबरच्या सुरवातीला सुरू होईल.   जून महिन्यातील वादळी पाऊस आणि तापमान यामुळे केळीच्या दर्जावर परिणाम झाला. घडांवरील स्कर्टिंग बॅगही वादळाने फाटल्या. रावेर व यावलमध्ये पंजाब, काश्‍मीर व दिल्ली येथे बॉक्‍समध्ये पाठवणुकीची केळी मिळणेही दुरापास्त होऊ लागले आहे. मागील महिन्यात प्रतिदिन १२ ते १३ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) बॉक्‍समधील केळीची पाठवणूक काश्‍मीर, पंजाब व दिल्ली येथे होत होती. ती सध्या फक्त प्रतिदिन आठ ट्रक एवढीच होत आहे. मध्यंतरी काही केळी निर्यातदारांनी रावेरात पाहणी केली, परंतु केळी निर्यातीचे सौदे होऊ शकले नाहीत. शहादा (जि. नंदुरबार) येथून जूनमध्ये प्रतिदिन एक कंटेनर केळीची निर्यात आखातात झाली. तेथूनही सध्या निर्यात बंद झाली आहे, कारण शहादा तालुक्‍यातील जवखेडा, ब्राह्मणपुरी, खेड तसेच नजीकच्या मध्य प्रदेशातील खेतिया भागातील निर्यातक्षम केळीची कापणी पूर्ण झाली आहे. अकोट (जि. अकोला) येथील केळी निर्यातही बंद झाल्याची माहिती मिळाली. जूनच्या मध्यापूर्वी राज्यातून प्रतिदन आठ ते नऊ कंटेनर केळीची परदेशात केळी निर्यात होत होती. या महिन्यात मात्र प्रतिदिन चार कंटेनर केळी निर्यात सुरू आहे. तीदेखील पुढे कमी होण्याची शक्‍यता आहे.  रावेरातून सहा महिन्यांत ३६० कंटेनरची निर्यात रावेर तालुक्‍यातून जानेवारी ते जून या दरम्यान परदेशात ३५० कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची निर्यात झाली. तांदलवाडीसह निंबोल, केऱ्हाळे, मस्कावद, वाघोदा येथे निर्यातक्षम केळी उपलब्ध होत होती. तांदलवाडीमधून सर्वाधिक निर्यातक्षम केळी उपलब्ध झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com