देशी कापूस बियाण्यांच्या तुटवड्याची मोठी शक्यता

आमच्याकडे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची तयारी केली आहे. ठिबक अंथरण्याचे काम अनेक शेतकऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात मात्र अजूनही कोणतेही कापूस बियाणे आलेले नाही. लागवड सुरू झालेली नाही; परंतु पुढील आठवड्यात मात्र शेतकरी प्रतीक्षा करणार नाहीत, असे वाटते. - अतुल मधुकर पाटील, शेतकरी, केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव.
कापूस बियाणे
कापूस बियाणे

जळगाव  : कापूस लागवडीत राज्यात क्रमांक एक असलेल्या जळगाव जिल्ह्यात तापीकाठासह कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये देशी संकरित व देशी सुधारित कापूस वाणांची मागणी वाढली आहे. यंदा सुमारे दोन ते सव्वादोन लाख देशी कापूस बियाण्याच्या पाकिटांची मागणी आहे. परंतु खासगी कंपन्या व इतर पुरवठादारांकडून फक्त २० हजार पाकिटे उपलब्ध होणार आहेत. अर्थातच बियाण्याची टंचाई निर्माण होईल, हे स्पष्ट झाले असून, यामुळे बियाण्यांचा काळाबाजार वाढण्याची शक्‍यता शेतकरी व बियाणे बाजारातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.  जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख २० हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड केली जाते. यंदा कापसाच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाज आहे. परंतु मॉन्सूनची स्थिती चांगली राहील, असे तूर्त तरी सांगितले जात असल्याने पूर्वहंगामी कापूस लागवडीत फारशी घट होणार नाही. तसेच कोरडवाहू कापूस लागवडही सर्वसाधारण क्षेत्राएवढी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा पूर्वहंगामी व कोरडवाहू मिळून सुमारे चार लाख ७० हजार हेक्‍टरवर कापूस लागवड होऊ शकते. यात यंदा देशी सुधारित व देशी संकरित कापूस बियाण्याची मागणी अधिक दिसत आहे. कारण धुळ्यासह रावेर, शिरपुरातील अनेक देशी कापूस उत्पादकांना गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झालेला असताना देशी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी आले. रावेरात देशी कापसाची पूर्वहंगामी लागवड केली जाते. बेवड म्हणून रावेर, यावल, चोपडा भागात देशी कापूस लागवड अधिक असते. शिरपूर, शहादा व तळोदा येथेही पूर्वहंगामी कापूस लागवडीत देशी कापूस बियाण्यास शेतकरी पसंती देतात.  एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन लाख पाकिटे एवढी देशी कापूस बियाण्यांची मागणी आहे. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही देशी कापूस वाणांची सुमारे ३५ ते ४० हजार पाकिटांची मागणी आहे. परंतु देशी कापूस बियाणे अजूनही उपलब्ध झालेले नाही. तर बीटी कापूस बियाणेही २० मेनंतर येईल, असे सांगितले जात आहे. जेवढी मागणी देशी कापूस बियाण्यांची आहे, तेवढे मिळणार नाही, असे कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिसत आहे. कृषी विभागाने बीटी कापूस बियाण्यांची लागवड अधिक असते या दृष्टीने कापूस बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यात २३ लाख ६० हजार कापूस बियाण्यांची पाकिटे मिळणार आहेत. त्यात फक्त २० हजार पाकिटे ही देशी कापूस बियाण्यांची असतील.  धुळ्यात साडेआठ लाख पाकिटे येतील. यात देशी कापूस बियाण्यांची सुमारे १० हजार पाकिटे मिळण्याची शक्‍यता आहे. तूर्त तरी पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू झालेली नाही. परंतु शेतकऱ्यांनी शेतात मशागत करून ठिबक अंथरून ठेवली आहे. रावेर, यावल व मुक्ताईनगरमधील तापीकाठावर पूर्वहंगामी कापसासंबंधीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यातच जिल्ह्यात बियाणे अजूनही आलेले नाही. कापसाचा हंगाम लांबणीवर पडू नये म्हणून शेतकरी गुजरात, मध्य प्रदेशातून कापूस बियाणे मिळेल का, या संदर्भात चाचपणी, चौकशी करू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मध्य प्रदेशातील खरगोन, बऱ्हाणपूर, बडवानी भागात कापूस बियाण्यांसंबंधी जात आहेत. तर धुळे व नंदुरबारमधील शेतकरी गुजरातमधील निझर, वाका चार रस्ता भागात देशी व इतर कापूस बियाण्यांसंबंधी जात आहेत. धुळ्यातील काही शेतकरी इंदूर, सेंधवा, बडवानी येथून कापूस बियाणे आणण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पुढील आठवड्यात जिल्ह्यात बीटी व नॉन बीटी कापूस बियाण्याचा काळा बाजार फोफावण्याची शक्‍यता आहे. 

प्रतिक्रिया देशी कापूस बियाणे मागणी वाढत आहे. आपण या बियाण्यांची  अधिक मागणी केली आहे. काही कंपन्यांनी पुरवठ्याची तयारी दाखविली आहे. जेवढे अधिक देशी कापूस बियाणे उपलब्ध करता येईल, त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पुरवठ्यासंबंधीचे अधिकार शासन व पुरवठादार यांच्याकडे आहेत. अशात शेतकऱ्यांनी मात्र विनापावती, अनधिकृत संस्था, व्यक्तींकडून कापूस बियाणे खरेदी करू नये. बियाणे बोगस निघाले तर त्याची जबाबदारी शेतकऱ्याचीच असेल.  - मधुकर चौधरी,  कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com