जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब वाढवणे हाच उपाय

सोलापूर ः ॲग्रोवनच्या वतीने शुक्रवारी (ता. २९) आयोजित जमीन सुपीकता चर्चासत्राचे दीपप्रज्वलन करून उद््घाटन करताना डॉ. अजितकुमार देशपांडे.
सोलापूर ः ॲग्रोवनच्या वतीने शुक्रवारी (ता. २९) आयोजित जमीन सुपीकता चर्चासत्राचे दीपप्रज्वलन करून उद््घाटन करताना डॉ. अजितकुमार देशपांडे.

सोलापूर ः जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आज पॉइंट तीनपेक्षाही कमी आहे. जमिनीची सुपीकता कमी होत चालल्याने केवळ पिकांचे उत्पादनच नव्हे, तर उत्पादकता आणि गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे आवश्‍यक आहे, असा सूर ‘ॲग्रोवन''च्या वतीने आयोजित ‘जमिन सुपीकता'' या चर्चासत्रातून निघाला. ‘ॲग्रोवन''च्या वतीने आयोजित या चर्चासत्राचे यूपीएल कंपनी प्रायोजक आणि ट्रेडकॉर्प कंपनी सहप्रायोजक होते. चर्चासत्रात मृद व जलसंधारणतीतल तज्ज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे, प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनी मार्गदर्शन केले.  या वेळी ‘ॲॅग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ''चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, यूपीएल कंपनीचे अमोल आंधळे, ट्रेडकॉर्पचे तांत्रिक व्यवस्थापक चंद्रशेखर बोंडे आदी उपस्थित होते. डॉ. देशपांडे म्हणाले, की शेतीमध्ये जमिनीच्या आरोग्याला महत्त्व आहे. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, मुक्त चुना यावर जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता आणि स्वीकार्हता अवलंबून आहे. जमिनीतील सामू सातच्याही खाली आहे. तो किमान साडेआठच्या पुढे हवा आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण पॉइंट तीनच्या खाली आहे, भौतिक, रासायनिक आणि जैविक हे शेतीपद्धतीचे प्रकार आहेत. पाण्याच्या वापरालाही यात महत्त्व आहे. पाण्याच्या अतिरिक्त किंवा मुक्त वापराऐवजी ठिबकचा वापर करा, त्यामुळे जमिनी क्षारपड, चोपण होण्यापासून वाचतील.  श्री. चिपळूणकर म्हणाले, ‘‘शेतीमध्ये शेणखत, कंपोस्ट खताचा वापर वाढवला पाहिजे; पण बाहेरून कुजलेले आणून टाकणे योग्य नाही. तो शेतातच जागेवर कुजलेला पाहिजे. तण हेच धन आहे. त्यामुळे तण काढू नका, नांगरणी, कुळवणी वा कोणत्याही प्रकारची मशागत करू नका. माझ्या प्रयोगानुसार तणाला तणनाशकाने मारून ते शेतातच गाडा, कुजवा, शेतातील तण सेंद्रिय कर्ब वाढवणारे उत्तम खत होऊ शकते. जमिनीची सुपीकता वाढवण्यापेक्षा ती अधिक टिकून राहते.’’ या वेळी यूपीएल कंपनी अमोल आंधळे म्हणाले, की यूपीएल कंपनीने झेबा हे उत्पादन आणले आहे. ती माती भुसभुशीत करतेच, पण पाण्याची, खताची कार्यक्षमता वाढवते, वाहून जाणारे नत्र पिकाला उपलब्ध करून देते. ऊस, डाळिंब, द्राक्षासह भाजीपाला पिकात ठरावीक मर्यादेत ते वापरल्यास त्याचा फायदा होतो. ट्रेडकॉर्पचे चंद्रशेखर बोंडे म्हणाले, "शेतीचे आरोग्य बिघडले आहे. क्षारपड, नापिक जमिनीचे क्षेत्र वाढले आहे. सेंद्रिय कर्ब वाढवणे आवश्‍यक आहेच. पण जमिनीची भौतिक व जैविक सुधारणा करणे आवश्‍यक आहे.’’ प्रास्ताविकात ‘ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, की शेतीचे बिघडलेले आरोग्य लक्षात घेऊनच ‘ॲग्रोवन''ने यंदाचे वर्ष जमीन सुपीकता वर्ष म्हणून घोषित केले आहे. जमिनीची सुपीकता कमी होणे, हा विषय अतिशय गंभीर आहे. शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता या दोन्हींवर त्याचा परिणाम झाला आहे. जे जमिनीत आहे ते पिकाला आणि पुढे ते मानवाला मिळते, साहजिकच रोगी हा शेतात तयार होतो, याचा विचार आम्ही केला आणि हा विषय हाताळला.  कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत ‘सकाळ'' सोलापूर आवृत्तीचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सकाळ''चे वरिष्ठ उपसंपादक रजनीश जोशी यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, डॉ. दिनेश नांद्रे, कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार अमृतसागर, लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश करंडे, कृषिक्रांती फार्मर्स  क्‍लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे आदी उपस्थित होते.  चर्चासत्रातील मुद्दे...

  •    रासायनिकऐवजी आता जैविक पद्धतीच्या शेतीची गरज
  •    बाहेरून शेणखत, कंपोस्ट खत आणून कुजवण्याऐवजी जागेवर कुजलेला खत वापरा
  •    पाण्याचा अतिरिक्त, मुक्त वापर टाळा
  •    तण हेच धन, शेतातील तण उत्तम सेंद्रिय कर्ब ठरू शकते
  •    जमिनीतील सूक्ष्मजीवाची वाढ आणि जपणूक महत्त्वाची  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com