देशात खरीप पेरणीला प्रारंभ

खरिप पेरणी
खरिप पेरणी

नवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या पेरणीला सुरवात झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत संथगतीने पेरणी सुरू आहे. देशात आतापर्यंत ५४ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात ५५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.  देशात २०१७-१८ च्या रब्बी पिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने काढणीला उशीर झाला. त्यामुळे सुरवातीला पेरणी कमी झाली असल्याचा अंदाज आहे. खरीप पेरणीला प्रारंभ झाला असला तरी मागील वर्षीपेक्षा यंदा जवळपास एक लाख हेक्टरने पेरणी कमी झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे पीक भाताची पेरणी एक लाख ९ हजार हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी याच काळात एक लाख ८८ हजार हेक्टरवर भाताची लागवड झाली होती. कडधान्य पेरणीही यंदा सुरवातीलाच माघारली आहे. मागील वर्षी या काळात ५४ हजार हेक्टरवर कडधान्य पेरणी झाली होती. आता मात्र १६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्य पेरणी माघरण्याचे मुख्य कारण हे पडलेल्या किमती आहेत. देशात मागील हंगामात कडधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर कडधान्यांचे दर हमीभावाच्या खूपच कमी झाले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कडधान्य पेरणीला कमी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात जशी पेरणी वेग घेईल तशी कडधान्य पेरणी कमी होण्याची शक्यता आहे.  तेलबीया पेरणी १२ हजार हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी याच काळात २८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तसेच खरिपातील आणखी एक महत्त्वाचे पीक मक्याची पेरणीही कमी झाली आहे. मागील वर्षी याच काळात सहा हजार हेक्टरवर मक्याची पेरणी झाली होती. यंदा मात्र केवळ दोन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. २०१८-१९ मध्ये सरासरी मॉन्सून होणार असल्याने खरिपात चांगल्या उत्पादनाची आशा आहे. खरिपाला पिकांना सिंचनाची सोय नसल्याने हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो.  पीकनिहाय खरीप पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक     २०१८-१९    २०१७-१८
भात     १०९,००० १८८,०००
तूर   २,००० २,०००
उडीद   ७,००० २२,०००
मूग    २,०००     ८,०००
इतर कडधान्य    ५,०००    २१,०००
  ज्वारी   ३,०००     १५,०००
बाजरी  १,०००   १,०००
मका   २,०००      ६,०००
भुईमूग    २,०००   ६,०००
तीळ   ९,०००  १७,०००
ऊस   ४,७२२,०००  ४,६४४,०००
ज्यूट     ५४४,०००  ५६८,०००
एकूण     ५,४०८,०००  ५,५०४,०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com