सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टरवर

पेरणी
पेरणी

नवी दिल्ली ः देशात आतापर्यंत झालेल्या पेरणीत कापसाखालील क्षेत्र कमी झाले आहे. मात्र कापसानंतर महत्त्वाचे खरीप पीक असलेल्या सोयाबनचा पेरा किंचित घटला असला तरी सरासरी पेरणी झाली आहे. सोयाबीनचा पेरणीत चार टक्के घट झाली असून आतापर्यंत ५२ लाख हेक्टरवर झाला आहे, मागील वर्षी याच काळात ५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे.  कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोयाबीनची पेरणी चार टक्क्यांनी घसरली आहे. यानंतर पेरणीत जास्त वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. आता पेरणीचा कालावधी कमीच असल्याने शेतकरी पेरणी वाढवतील, याची शाश्वती कमीच आहे. तसेच देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेशात सोयाबीन पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने पेरणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पेरा कमी झाला आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत २८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात २९ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती; परंतु मगील वर्षीपेक्षा कमी पेरणी झाली असली तरी पण मागील पाच वर्षांतील सरासरीच्या क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली. पेरणी रखडली देशात यंदा वेळेआधीच मॉन्सून दाखल झाला होता. सुरवातीला चांगली सुरवात केली, मात्र त्यानंतर सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. यंदा कापसाखालील क्षेत्र कमी झाल्याने शेतकरी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र देशातील आकडेवारीचा विचार करता असे झाले नाही. सोयाबीनची पेरणी मागील वर्षीपेक्षा कमीच झाली आहे. महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक सर्वच राज्यांमध्ये पेरणी माघारली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लागवडीत चार टक्के घट झाली आहे. तलंगणात १५ टक्के, तर राजस्थानमध्ये १७ टक्के कमी पेरणी झाली आहे. कर्नाटकमध्ये पेरणी वाढली आहे.  जुलैच्या मध्यापर्यंतच पेरणी करा ः तज्ज्ञ कृषी तज्ज्ञांच्या मते, सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत असतो. त्यामुळे सोयाबीनची पेरणी आणखी वाढेल, परंतु त्यात फार वाढ अपेक्षित नाही. जुलैच्या मध्यानंतर पेरणी केल्यास पिकाला बदलत्या हवामानाचा फटका बसून उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तसेच पिकाला आवश्यक असलेल्या पावसात खंड पडल्यास उत्पादकता घटू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याच कालावधीपर्यंत सोयाबीनची पेरणी करावी.  राज्यनिहाय सोयाबीन पेरणी (लाख हेक्टरमध्ये)

राज्य २०१८-१९ २०१७-१८ सरासरी
तेलंगणा १.०९ १.२८ २.३२
कर्नाटक २.६२ १.९५ २.४४
मध्य प्रदेश २७.५५ २८.६४ ५८.४५
महाराष्ट्र १६ १६.२८ ३५.८४
राजस्थान ३.६० ४.३३ १०.७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com