राज्यात गोदामांचे जाळे निर्माण करणार : सुभाष देशमुख

सुभाष देशमुख
सुभाष देशमुख

मुंबई : राज्यात हमीभावाने कापूस, तूर, हरभरा व इतर कडधान्ये तसेच तृणधान्ये खरेदीसाठी गोदामांची जिल्हानिहाय उपलब्धता, साठवण क्षमता आदी तपशील जमा करून राज्यातील विविध विभागांच्या गोदामांचे जाळे (ग्रीड) निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. या अनुषंगाने मंत्री देशमुख तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कृषी विभागाचे प्रभारी अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे, जलसंपदा विभागाचे सचिव रा. वा. पानसे, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक एन. नवीन सोना, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, पणन महासंघाचे सरव्यवस्थापक कल्याण कानडे यांच्यासह पणन विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील सहकारी पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘अटल महापणन विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रमांबरोबरच धान्यसाठवण गोदामांचा व्यावसायिक व पूर्ण क्षमतेने वापर अपेक्षित आहे. यासाठी कार्पोरेट क्षेत्रासह समाजाच्या विविध घटकांचा सहभाग घेण्यात येत आहे.  खरेदी केले जाणारे धान्य ठेवण्यासाठी जवळच्या गोदामाची माहिती मिळण्यासह वाहतुकीचा खर्च वाचू शकेल. या ग्रीडमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सहकारी संस्था आदींच्या गोदामांची माहिती जमा करण्यात येणार आहे. यामध्ये गोदामांचे जीआयएस मॅपिंगसह स्थळ दाखविणारे ऑनलाइन नकाशे वेबसाईट व ॲपवर उपलब्ध करुन देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. नॅशनल को-लॅटरल मॅनेजमेंट सर्व्हिसेस लि. (एनसीएमएल) या कॉर्पोरेट संस्थेने स्वत:चे गोदामांचे ग्रीड स्थापन केले आहे. या संस्थेची मदत राज्यातील गोदामांचे ग्रीड किंवा नेटवर्क तयार करण्यासाठी घेण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. बापट यांनी सहकार व पणन विभागाच्या गोदामांसह पाटबंधारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांच्या गोदामांचा धान्य साठवणुकीसाठी उपयोग करण्याचे निर्देश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com