आंतरपीक पपईने केले आल्याचे सक्षम अर्थकारण

आंतरपीक पपईने केले आल्याचे सक्षम अर्थकारण
आंतरपीक पपईने केले आल्याचे सक्षम अर्थकारण

सातारा जिल्ह्यातील भास्कर अप्पासाहेब गोरे यांनी आले पिकात पपई अशी आंतरपीक पद्धती यशस्वी केली आहे. आले पिकाचे दर नेहमीच भेरवशाचे असतात. त्यामुळे पपईचे आंतरपीक त्यांना नेहमीच आले पिकाचा नफा किंवा त्याचे अर्थकारण सक्षम करणारे ठरले आहे. मागील वर्षी त्यांनी पपईच्या नेहमीच्या वाणापेक्षा दुसरे वाण घेण्याचा प्रयत्न करीत किलोला दरही अत्यंत चांगला मिळवला आहे.

सातारा जिल्ह्यातील पाल (ता. कराड) हे खंडोबा देवस्थानसाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले गाव आहे. गावातून तारळी नदी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली. यामध्ये ऊस, आले ही प्रमुख पिके घेतली जातात. त्यामध्ये पपई, झेंडू, टोमॅटो, कोबी यासारख्या आंतरपिकांचे भरीव उत्पादन घेण्यात येथील शेतकरी आघाडीवर आहेत.

आल्यातील पपई गावातील भास्कर अप्पासाहेब गोरे हे पदवीधर व प्रगतशील शेतकरी आहेत. शेतीबरोबरच ते सहकारी, राजकीय व विधायक कामात अग्रेसर असतात. त्यांची १५ एकर शेती असून सर्व बागायत आहे. सातारा जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच आले हे गोरे यांचे देखील प्रमुख पीक आहे. सोबतीला ऊसही असतो. आले पिकात पपईचे आंतरपीक घेण्याची सातारा जिल्ह्यात पद्धत आहे. गोरेदेखील त्याचा अवलंब करतात. दरवर्षी साधारणपणे तीन ते चार एकर क्षेत्रावर त्यांचे आले पीक असते. आले हे असे पीक आहे की त्याच्या दरांमध्ये सतत चढ-उतार सुरू असतात. त्यामुळे नफा कायम बेभरवशाचा असतो. साहजिकच पपई हे आंतरपीक घेऊन आले पिकाचे अर्थकारण तोट्यात जाणार नाही असा त्यांचा विचार असतो.

पीक नियोजन, व्यवस्थापन गोरे यांचे यंदाचे प्रातिनिधीक पीक व्यवस्थापन पाहूया. त्यांना पपईत दरवर्षी विषाणूजन्य रोगाची समस्या जाणवते. मागील वर्षी त्यांना पपईच्या अन्य वाणाची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील किणी वाठार येथे मिळाली. हे वाण विषाणूजन्य रोगाला सहनशील असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्या वाणाचा प्रयोग करायचे ठरवले. चार एकर क्षेत्र आले पिकासाठी निवडले होते. तर ६५ गुंठे आले पिकात पपईचे नियोजन केले होते. दरवर्षी १५ मेच्या सुमारास आले लागवड होते. तर आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये त्यात पपई घेतली जाते.

ठळक बाबी

  • मागील वर्षाच्या प्रयोगात सप्टेंबर महिन्यात पपईच्या एक हजार रोपांची लागवड केली.
  • प्रत्येक रोप २८ रुपयांना पडले. एकरी सुमारे ७५० रोपे लागतात. मात्र मरतुक धरून ती जास्त आणण्यात आली.
  • आल्याचा एक ‘बेड’ सोडून म्हणजेच दोन सरीत नऊ फूट व दोन रोपांतील अंतर आठ फूट ठेवून पपई लावली.
  • पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला.
  •  उत्पादन, विक्री साधारणपणे नऊ महिन्यांनी म्हणजेच मे महिन्यात पपईच्या उत्पादनास सुरवात झाली. पहिला तोडा साधारण ४५० किलोचा मिळाला. रमजान सणाच्या काळात त्यास किलोला २० रुपये व काही वेळेस कमाल २५ रुपयांपर्यंतही दर मिळाला. अर्थात हा दर पुढे असाच राहात नाही. तर तो सहा रुपयांपासून १० रुपयांपर्यंत मिळतो. वाशी मार्केटला पपई पाठवली जाते. यंदा आत्तापर्यंत एकूण ५० टनांपर्यंत उत्पादन मिळाले अाहे. अजून काही काळ प्लॉट सुरू राहणार असून ३५ टनांपर्यंत उत्पादन मिळेल असा गोरे यांना अंदाज आहे.

    मार्गदर्शन  गोरे हे सह्याद्री साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत. उसाचे एकरी सरासरी ८० ते ९० टन उत्पादन ते घेतात. शेतीत त्यांना प्रमोद रेवतकर यांचे मार्गदर्शन मिळते. शेतीव्यतिरिक्त अन्य जबाबदाऱ्या असल्या तरी शेती हेच आपले प्रमुख उद्दीष्ट असून दररोज त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते असे त्यांनी सांगितले.

    यंदाची वैशिष्ट्ये

  • पपईचा नवा वाण विषाणूजन्य रोगाला सहनशील असल्याचे आढळले. त्यामुळे फवारण्यांची संख्या कमी झाली.
  • या वाणाचे फळ आकाराने लहान आहे. त्यामुळे छोट्या कुटूंबाकडून त्यास चांगली मागणी राहते.
  • फळांची गोडीही चांगली आहे. त्याचे सरासरी वजन एक किलोपर्यंत आहे.
  • पपईचा प्रत्येक आठ दिवसांनी तोडा केला जातो. कागदात पॅकिंग करून विक्रीस पाठविले जाते.
  • रमजान महिना लक्षात घेऊन पपई लागवडीचे नियोजन असते.
  • आले पिकाचे सक्षम अर्थकारण गोरे यांना एक वर्षात काढणी केलेल्या आल्याचे उत्पादन २५ गाड्या (प्रति गाडी ५०० किलो वजन)पर्यंत मिळते. पुढे ते काही महिन्यापर्यंत ठेवल्यास ४० गाड्यांपर्यंत उत्पादन मिळते. यंदा प्रति गाडी दर २० ते २२ हजार रुपये अाहे. मात्र तो अनेकवेळा साडेसात हजार रुपयांपर्यंतही खाली येतो. दरांची कोणतीच शाश्वती नसते. आले पिकाचा उत्पादन खर्च एकरी किमान पावणेदोन लाख रुपये असतो. मात्र पपईतून मिळणारे उत्पन्न आले पिकाचा खर्च कमी करते. किंबहुना त्याहून अधिक पैसेही मिळतात असे गोरे सांगतात.

    - भास्कर गोरे - ९८५०६९१३८१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com