जैवतंत्रज्ञान प्रसारासाठी शास्त्रज्ञांना पाठिंबा : शेतकरी संघटना

तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदेत बोलताना डॉ. दत्तात्रेय शिराळे. या वेळी डॉ. सुभाष थेटे, डॉ. पंकज बिहाणी, अनिल घनवट, गुणवंत पाटील, शिवेंद्र बजाज, डॉ. पुनीत लुथ्रा, अजित नरदे.
तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदेत बोलताना डॉ. दत्तात्रेय शिराळे. या वेळी डॉ. सुभाष थेटे, डॉ. पंकज बिहाणी, अनिल घनवट, गुणवंत पाटील, शिवेंद्र बजाज, डॉ. पुनीत लुथ्रा, अजित नरदे.

पुणे  : जनुकीय तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या फायद्याचे असतानाही केवळ दडपशाहीच्या जोरावर सरकारकडून या तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्यात आला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या प्रसारातील अडथळे हटविण्यासाठी शास्त्रज्ञांना पाठिंबा देण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदेत घेण्यात आला.  दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्या प्रतिमेला प्र. भा. भोसले यांच्या हस्ते बीटी कपाशीचा पुप्षहार घालून परिषदेला सुरवात झाली. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट, अजित नरदे, गुणवंत पाटील, असोसिएशन ऑफ बायोटेकचे शिवेंद्र बजाज, शास्त्रज्ञ डॉ. पुनीत लुथ्रा, डॉ. सुभाष थेटे व डॉ. दत्तात्रेय शिराळे, राजीव साने, प्रदीप आपटे, माजी खासदार प्रदीप रावत, संजीव माने, अमर हबीब, उपस्थित होते. राज्याच्या विविध भागांतून या परिषदेसाठी शेतकरी आले होते.  शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख अजित नरदे या वेळी म्हणाले, की देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या वापरापासून हेतुतः दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. २००० मध्ये गुजरातमध्ये प्रथमतः बीटी कपाशीची लागवड झाली असता केंद्र सरकारने विरोधी भूमिका घेतली. बीटी कापूस नष्ट करण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी गुजरातमध्ये गेले व तेथील शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. आतादेखील विरोधाची भूमिका सरकार घेत आहे. मात्र, आमच्या विकासाचे तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोचविण्यास आडकाठी आणणाऱ्यांचा शेतकरी कडाडून विरोध करतील. जैवतंत्रज्ञान राक्षसी नसून ते पर्यावरणाला उपयुक्त आहे. त्यामुळे बाऊ न करता कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाला मान्यता दिली पाहिजे. मात्र, भारतात या तंत्रज्ञानाच्या विरोधात गैरसमज पसरवून शेतकऱ्यांना या तंत्राच्या वापरापासून दूर ठेवले जात आहे. जगात २७ देशांमधील १८० लाख शेतकरी १८० दशलक्ष हेक्टरपेक्षाही जादा क्षेत्रात जनुकीय सुधारणा केलेल्या (जीएम) पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यालादेखील या तंत्रापासून दूर ठेवता येणार नाही, असे डॉ. बिहाणी म्हणाले.  मोन्सॅन्टो कंपनीचे शास्त्रज्ञ डॉ. पुनीत लुथ्रा म्हणाले, की की जागतिक शेतीत जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढतो आहे. दुष्काळाला सहनशील, योग्य नत्र वापर, उत्पादकता वाढ, आरोग्यदायी तेल, तणनाशकांना सहनशील, पीक संरक्षण अशा विविध क्षेत्रांत या तंत्रज्ञाचा वापर पुढील एक दशकात होण्याची चिन्हे आहेत. मात्र, भारतात या तंत्राच्या प्रसारात गैरसमजातून अडथळे येत आहेत. याउलट पाकिस्तान व बांगलादेशने जीएम पिकांना स्वीकारत आहेत.  शास्त्रज्ञ डॉ. सुभाष थेटे म्हणाले, की गुलाबी बोंड अळी कापूस पिकावरच जगू शकते. नॉन बीटी रेफ्युजी बियाणे लावण्याची पद्धत बंद केल्यामुळे या अळीचा प्रसार वाढला. पंजाब, हरियानातदेखील रेफ्युजी बियाणे लावले जात नाही; मात्र तेथे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये संपूर्ण कापूस क्षेत्र हे रब्बी पिकांखाली जाऊन बोंड अळीची शृंखला तुटते.  असोसिएशन ऑफ बायोटेकचे शिवेंद्र बजाज म्हणाले, की २०१० पासून जनुकीय तंत्रज्ञानाला विरोध सुरू आहे. राजकीय विचारधारेमुळे तंत्रज्ञानाला विरोध असून, त्यामुळे देशातील कृषी विकासाला फटका बसला आहे. ‘एचटी’साठी शेतकरी संघटना काढणार यात्रा ‘एचटी’ बीटी अर्थात तणनाशकाला सहनशील असलेल्या कपाशीच्या बियाण्यास मान्यता देण्यासाठी शेतकरी संघटना धुळे ते चंद्रपूर अशी तंत्रज्ञान स्वातंत्र्य यात्रा काढणार असल्याचा ठराव तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदेत करण्यात आला. राज्यात प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक गुंठ्यात एचीबीटी कपाशी, बीटी वांगी व मोहरीची लागवड करावी, बीटी लागवड करण्याऱ्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पथके नेमण्याचा ठराव देखील परिषदेत करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com