वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेत

वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेत
वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेत

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी मराठी भाषिक तसेच मराठवाडा विभागातील शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांच्या जाणकार व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी विभागातील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी संघटना यांच्याकडून केली जात आहे. वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपत आहे. नवीन कुलगुरू निवडीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती मंजुळा चेल्लूर या अध्यक्ष असलेल्या शोध समितीने कुलगुरू पदासाठी विहित मुदतीत नामनिर्देशपत्रे सादर केलेल्यापैकी आवश्यक अर्हता, अपेक्षित अनुभव, इच्छित कौशल्य आणि क्षमता असलेल्या १५ उमेदवारांना शनिवारी (ता. १९) मुंबई येथे मुलाखतीसाठी बोलावले होते; परंतु १२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी डाॅ. किरण कोकाटे, डाॅ. अशोक ढवण, डाॅ. उत्तम महाडकर, डाॅ. चिखले हे चार उमेदवार मराठी भाषिक आहेत. अन्य ८ जण अमराठी भाषिक उमेदवार आहेत. मुलाखतीनंतर राज्यपालांपुढे सादरीकरण करण्यासाठी अंतिम पाच उमेदवारांची शिफारस करण्यात आली. त्यामुळे लवकरच नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल. कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू हे निवृत्त होण्याच्या आत नवीन कुलगुरूंची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुपदी आयसीएआर किंवा अन्य संशोधन संस्थातील अमराठी भाषिक शास्त्रज्ञ, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तींची नियुक्ती केली जात आहे. यामुळे मराठी भाषिक पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. अमराठी भाषिक कुलगुरूंना भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकपद्धती, अर्थकारण, प्रशासकीय कामकाज समजून घ्यायला मोठा कालावधी लागतो. शेतकरी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अडचणी येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या शास्त्रज्ञांना प्रशासकीय कामांचा फारसा अनुभव नसतो. मराठवाडा विभागात कोरडवाहू क्षेत्र बहुल आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कुलगुरू पदावर विराजमान होणारी व्यक्ती मराठी भाषिक, प्रश्नांची जाणकार असावी. त्या अनुषंगाने राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था आदी ठिकाणी संचालक, तसेच अन्य महत्त्वांच्या पदावर राहिलेल्या अनुभवी व्यक्तीची कुलगुरुपदी निवड करणे आवश्यक आहे. मागच्या वेळी राज्यपालांपुढे सादरीकरणासाठी शिफारस करण्यात आलेल्या पाच उमेदवारांमध्ये एकही मराठी भाषिक उमेदवार नव्हता. त्या वेळी शेजारच्या तेलंगणा राज्यातील डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांची कुलगुरुपदी निवड करण्यात आली. डाॅ. व्यंकटेश्वरलू हिन्दी भाषेत उत्तमरीत्या संवाद साधतात. त्यांना मराठी चांगल्याप्रकारे वाचता येते. त्यामुळे त्यांना या भागातील समस्या जाणून घेण्यासाठी फारशा अडचणी आल्या नाहीत. परंतु अन्य राज्यातील अमराठीभाषिक कुलगुरूमुळे संवादसह अनेक बाबतीत अडचणी येतात. त्यामुळे नवीन कुलगुरू निवडतांना मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकरी, प्राध्यापक, कर्चमारी संघटनांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे मागणी गेल्या काही वर्षांपासून अमराठी भाषिक व्यक्तींची महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू पदावर वर्णी लावली जात आहे. मराठी भाषेचा गंध नसलेले कुलगुरू लादल्याने शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी मराठी भाषिक व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी मागणी कृषी विद्यापीठ प्राध्यापक संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com