मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेर

कर्जमाफीच्या यादीत नाव आले तसे दीड लाखावरील कर्ज भरले. बॅंकेने कर्ज भरल्याचा दाखला दिला. नंतर बॅंकेने त्यांना नव्याने पीककर्जासंबंधी सर्च रिपोर्ट व इतर कागदपत्रांची मागणी केली. ही सर्व कागदपत्रे मार्चमध्ये दिली; पण नव्याने पीककर्ज जून अर्धाअधिक संपला तरी मिळाले नाही. - प्रल्हाद देवराम सपकाळे, करंज, ता. जि. जळगाव
मुबलक पाणी... पण्  पैशाअभावी शेत नापेर
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेर

जळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव आले... ९० हजार कर्ज होते... त्यावरचे चार हजार रुपये व्याज भरले... पण अजूनही सोसायटीकडून नव्याने पीककर्ज मिळाले नाही... ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, त्यांना निम्मेच कर्ज देणार, असे सोसायटीवाले सांगतात... बॅंकेत सारख्या चकरा मारीत आहे... पण आज... उद्या... अशीच उत्तरे दिली जातात. माझे शेत तापी नदीकाठी असल्याने मुबलक पाणी आहे... काय करावं... हाती पैसा नाही... चार एकरपेक्षा अधिक जमीन नापेर आहे... पाऊस नसल्याने सावकारही व्याजाने पैसे देत नाही... देवा नको रे परीक्षा घेऊ... मरण बरं, अशी हतबल, हताश प्रतिक्रिया कठोरा (ता. जि. जळगाव) येथील वृद्ध शेतकरी अशोक हरचंद सपकाळे यांनी दिली. पीककर्ज वितरणासंबंधीची चालढकल, गोंधळ याबाबत ‘ॲग्रोवन’ने भोकर (ता. जि. जळगाव) येथे स्टेट बॅंकेनजीक सोमवारी (ता. १८) शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. अशोक सपकाळे यांनी सोसायटीकडून ९० हजार रुपये कर्ज घेतले होते. ते थकले. त्यांचे नाव मागील वर्षी कर्जमाफी योजनेत जसे आले तसे त्यांनी लागलीच त्यावरील व्याजाचे पैसे भरले. त्यांची सुमारे चार एकर शेती आहे. कूपनलिकेला मुबलक पाणी आहे. कापसाची शेती ते करतात. चार मुले व परिवार आहे. मुले शेती व मजुरी करतात. नव्याने पीककर्ज त्यांना सोसायटीकडून अजून मिळालेले नाही. यातच ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांना मंजूर कर्जदराच्या निम्मेच कर्ज देण्याचे आदेश सोसायटीला प्राप्त झाल्याने जेथे ९० हजार मिळायचे, तेथे आता फक्त ४५ हजार रुपये कर्ज मिळेल. मुबलक पाणी असूनही शेतात पेरणीच झाली नाही. सावकाराकडे जायचे म्हटले तरी पाऊस नसल्याने तेदेखील पैसे द्यायला तयार नाही. या वयात उन्हात वणवण फिरणे झेपत नाही, परवडत नाही, असे सपकाळे म्हणाले. फुपणी (ता. जि. जळगाव) येथील रवींद्र नामदेव करंदीकर हेदेखील पीक कर्जासंबंधी पत्नीसोबत भोकरला स्टेट बॅंकेनजीक आले होते. सोसायटी निम्मेच कर्ज देईल म्हणते, म्हणून स्टेट बॅंकेकडून पीककर्ज मिळावे यासाठी ते रणरणत्या उन्हात भोकरला आले होते. बाहेर पत्नीसह उभे होते. काय कागदपत्र लागतील... साहेबाला केव्हा भेटायचे... साहेब आपले काम करतील ना..., अशा आशाळभूत स्थितीत ते बॅंकेनजीक दुपारपर्यंत थांबून होते. आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. एक दिव्यांग मुलगी आहे. तिला शासनाकडून मदत म्हणून निधी मिळतो. हा निधी आला की नाही, याच्या चौकशीसाठी भोकरला वारंवार चकरा माराव्या लागतात. निम्मी जमीन भागीदारीने गावातीलच एका व्यक्तीला कसायला दिल्याचे रवींद्र म्हणाले. बॅंकेत पीककर्जाचा जसा प्रश्‍न आहे. तशाच केळी पीक विमाधारकांच्याही समस्या असल्याचे शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर समोर आले. त्यात फुपणी येथील दिनकर रामदास सपकाळे यांचे विमा हप्ता भरूनही भरपाईची मागच्या वर्षाची देय रक्कम बॅंकेत प्राप्त झालेली नव्हती. त्यांची तीन हेक्‍टर बागायती शेती आहे. आता पुन्हा केळीचे वादळात नुकसान झाले. तलाठी व विमा कंपनीला १२ दिवसांपूर्वी सांगूनही पंचनामे पूर्ण केलेले नसल्याचे दिनकर म्हणाले. फुपणी येथील लक्ष्मण आत्माराम पाटील हे गुलाबी बोंड अळीसंबंधी नुकसान भरपाईची रक्कम आली की नाही, याच्या चौकशीसाठी आले होते. त्यांनाही बॅंकेतून नकारघंटाच ऐकविण्यात आली. सावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) येथील प्रकाश विठ्ठल पाटील यांचीही केळी पीकविम्यासंबंधीची तक्रार होती. आपण नियमीत कर्जदार आहोत. कर्जदारांना विमा हप्ता भरणे बंधनकारक आहे. पण स्टेट बॅंकेने विमा हप्ता कर्जाच्या रकमेतून कपात केला नाही. म्हणून मागील वर्षाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले. या संदर्भात बॅंकेकडे कैफियत मांडायला अनेकदा आले, पण कुणी दाद घेत नसल्याचे प्रकाश म्हणाले. आजारी शेतकऱ्याला मनःस्ताप करंज (ता. जि. जळगाव) येथील प्रल्हाद देवराम सपकाळे हे मागील १५ वर्षे भोकर येथील स्टेट बॅंकेचे नियमित कर्जदार शेतकरी आहे. त्यांचे वय ६७ वर्षे आहे. मधुमेह, किडणी असंतुलन असे आजार त्यांना आहेत. घरात पडल्याने त्यांचा उजवा डोळा पूर्णतः निकामी झाला असून, डाव्या डोळ्यातूनही कमीच दिसते. त्यांना चालायचे म्हटले तर आधार हवा लागतो. अशा स्थितीत त्यांची मुले सुनील व गणेश हे बॅंकेत पीककर्जासाठी चकरा मारीत आहेत. ‘ॲग्रोवन’ने करंज येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या नावे दोन हेक्‍टर २० आर शेती आहे. त्यावर चार लाख पीककर्ज घेतले होते. ते थकीत झाले. कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव जसे आले तसे त्यांनी दीड लाखावरील कर्ज भरले. बॅंकेने कर्ज भरल्याचा दाखला दिला. नंतर बॅंकेने त्यांना नव्याने पीककर्जासंबंधी सर्च रिपोर्ट व इतर कागदपत्रांची मागणी केली. ही सर्व कागदपत्रे मार्चमध्ये दिली. पण नव्याने पीककर्ज जून अर्धाअधिक संपला तरी मिळाले नाही. बागायती शेतीला पैसे अधिक लागतात. पैसेच नसले तर सर्व कामे ठप्प होतात. बॅंकवाल्यांना आता काय सांगावे. माझी तब्येत साथ देत नाही. अन्यथा मी स्वतः जाऊन बॅंकेला जाब विचारला असता. मुले रोज भोकर येथे स्टेट बॅंकेत चकरा मारतात. काम काही होत नाही. काय वाईट दिवस आले शेतकऱ्याचे..., असे दुःख प्रल्हाद सपकाळे यांनी सांगितले. प्रतिक्रिया ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांना मंजूर कर्जदराच्या निम्मेच कर्ज देण्याचे आदेश सोसायटीला प्राप्त झाले. बियाणे, शेत तयार करणे यासाठी किमान २० हजार रुपये लागतील. पण पैसेच नाहीत. त्यामुळे शेत तसेच पडून आहे. - अशोक हरचंद सपकाळे, कठोरा, ता. जि. जळगाव सोसायटीचे ६५ हजार कर्ज होते. बागायती एक हेक्‍टर २१ आर क्षेत्र आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव आले, पण सोसायटी कर्ज निल केल्याचा दाखला व नव्याने पीककर्जही देत नाही. - रवींद्र नामदेव करंदीकर, फुपणी, ता. जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com