राज्यातील धरणांमध्ये २१ टक्के पाणीसाठा

धरणसाठा
धरणसाठा

पुणे : राज्याच्या घाटमाथ्यावर तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा ३ हजार २४६ प्रकल्पांंची एकूण क्षमता १४४२.७९ टीएमसी असून, मिळून जून अखेरपर्यंत धरणांमध्ये ३००.१६ टीएमसी (२१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा गतवर्षीपेक्षा दोन टक्के अधिक पाणीसाठा असून, गेल्यावर्षी याच तारखेला धरणांमध्ये अवघा १९ टक्के असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.  मे आणि जून महिन्यात राज्यात पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी समाधानकारक पाणीसाठ्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात २८ टक्के, पश्‍चिम महाराष्ट्रातील कोयना धरणात ४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर उजनी धरणाचा पाणीसाठा अचल पातळीत आहे. अमरावती विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून २५.३४ टीएमसी (१७ टक्के), नागपूर विभागात १८.६८ टीएमसी (११ टक्के), कोकण विभागात ५१.०८ टीएमसी (४१ टक्के), नाशिक विभागात ४०.७४ टीएमसी (१९ टक्के), पुणे विभागात ११५.९० टीएमसी (२२ टक्के), तर मराठवाडा विभागात ४८.३६ टीएमसी (१९ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

जायकवाडी धरणात २१.७८ टीएमसी पाणीसाठा मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पामध्ये यंदा पाणीसाठा उपयुक्त पातळीत आहे. धरणामध्ये २१.७८ टीएमसी म्हणजेच २८.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सिना कोळेगाव, माजलगाव, मांजरा, येलदरी, सिद्धेश्‍वर या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून, काही धरणे अचल साठ्यात आहेत. मराठवाड्यातील मोठ्या ४४ प्रकल्पांमध्ये २९.५९ टीएमसी (१९ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ७.७७ टीएमसी (२१ टक्के) आणि लहान ८३२ प्रकल्पांमध्ये ११.०१ टीएमसी (१८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात होतय वाढ सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाने पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील धरणांमध्ये पाणी जमा हाेत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. उजनी धरण मात्र अचल पातळीत गेले आहे. मात्र, धरणाच्या अचल साठ्यातही ५३.१३ टीएमसी पाणीसाठा आहे. भीमेच्या उपनद्यांवर असलेली धरणे भरल्यानंतर उजनीचा पाणीसाठा वाढणार आहे. तर कोयनेत ४३.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ९३.८३ टीएमसी (१७ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये १३.२४ टीएमसी (२८ टक्के) आणि लहान ६४० प्रकल्पांमध्ये ८.८३ टीएमसी (१८ टक्के) पाणीसाठा आहे.  नाशिक विभागात ४०.७४ टीएमसी नाशिक विभागातील धरणांच्या परिसरात जोरदार पावसाअभावी धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. कडवा, करंजवण, गिरणा, तिसगाव, पुणेगाव, मुकणे धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर वाकी आणि चणकापूर प्रकल्पांचा पाणीसाठा अचल पातळीत आहे. अर्जुनसागर, ओझरखेड, गंगापूर, दारणा, पालखेड, वैतरणा प्रकल्पांमध्ये २० ते ३० टक्केपाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिक विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ४०.७४ टीएमसी पाणीसाठा झाला. यात मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये २५.७३ टीएमसी (२० टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये ७.२० टीएमसी (१६ टक्के) आणि लहान ४८५ प्रकल्पांमध्ये ७.८० टीएमसी (२१ टक्के) पाणीसाठा आहे.  कोकणात ४१ टक्के पाणीसाठा  सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह कोकण किनाऱ्यावर पावसाने धुव्वाधार पाऊस झाला. सह्याद्रीच्या पश्‍चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांमुळे कोकणातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोकणातील सर्व धरणांमध्ये मिळून ४१ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकणातील भातसा, सुर्या धामणी, सुर्या कवडास, तिल्लारी प्रकल्प यासह ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून ३२.१३ टीएमसी (४८ टक्के), ७ मध्यम प्रकल्पामध्ये ८.९३ टीएमसी (५२ टक्के) तर १५७ लघू प्रकल्पात ८.७६ टीएमसी (५१) पाणीसाठा आहे.  अमरावती, नागपूरमध्ये अत्यल्प पाणीसाठा विदर्भातील पूर्व भागात असलेल्या नागपूर आणि पश्‍चिम भागातील अमरावती विभागात गतवर्षी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने यंदा या विभागातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये ११.८६ टीएमसी (१० टक्के), मध्यम ४२ प्रकल्पांमध्ये ३.५७ टीएमसी (१६ टक्के), लघू ३२६ प्रकल्पांमध्ये २.१८ टीएमसी (१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील मोठ्या १० प्रकल्पात १२.९२ टीएमसी (१५ टक्के), मध्यम २४ प्रकल्पांमध्ये ५.७५ टीएमसी (२४ टक्के), लघू ४०९ प्रकल्पांमध्ये मिळून ६.६७ टीएमसी (१८ टक्के) पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. 

राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील ३० जूनपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा उपयुक्त साठा टक्केवारी
अमरावती ४४३ १४७.४८ २५.३४ १७
कोकण १७५ १२३.६७ ५१.०८ ४१
नागपूर ३८५ १६६.०३ १८.६८ ११
नाशिक ५६१ २०९.०७ ४०.७४ १९
पुणे ७२५ ५३७.४४ ११५.९० २२
मराठवाडा ९५७ २५९.१३ ४८.३६ १९
एकूण ३२४६ १४४२.७९ ३००.१६ २१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com