जागतिक कापूस लागवडीत घट निश्‍चित

कापूस
कापूस

जळगाव : कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या भारत, अमेरिका (यूएसए), चीन आणि पाकिस्तानात २०१८-१९ च्या हंगामात कापूस लागवडीत घटीचे संकेत आहेत. परिणामी पुढे कापसाचा पुरवठा कमी होईल. यामुळे दरात तेजी राहणार असल्याची माहिती व्यापार तज्ज्ञांनी दिली.   २०१७-१८ चा हंगाम भारतासाठी फारसा फलदायी ठरला नाही. भारतीय कापूस उत्पादकांना सरासरी दर ४५०० रुपयांपर्यंतच मिळाला. बोंड अळीने जिनींग, कापूस उद्योजकांना फटका बसला. उत्पादकता हेक्‍टरी ५७५ किलो रुईपर्यंतच राहीली. याच वेळी सरकीच्या दरात जानेवारी ते मेपर्यंत घसरण सुरूच राहीली. २१०० रुपयांवरून दर १४५० रुपये प्रतिक्विंटलवर आले. याचा फटका जिनर्सना बसला. सूत उत्पादकांनाही प्रतिकिलो २०० रुपये दर मिळाला. डॉलर वधारल्याने त्याचा निर्यातीला लाभ झाला.  चीनमध्येही सुमारे ४३ लाख हेक्‍टवर लागवड झाली होती. तेथेही उत्पादन ३५० लाख गाठींपेक्षा कमी आले आहे. अमेरिकेध्येही सुमारे २२० लाख गाठींचे उत्पादन हाती येईल, असे संकेत आहेत. भारत, चीन, अमेरिकेसह इतर प्रमुख देशांचा कापूस हंगाम संपला असून, नवा हंगाम सुरू झाला आहे. कापूस उत्पादनात भारत सरत्या हंगामात क्रमांक एक राहीला. आगामी हंगामात मात्र भारतात लागवड १० ते १२ लाख हेक्‍टरने कमी होणार आहे. अर्थातच उत्पादनही सुमारे १५ ते १८ लाख गाठींनी कमी येईल.  जागतिक स्तरावर लागवड सुमारे १७ ते १८ लाख हेक्‍टरने घटू शकते. भारतात पूर्वहंगामी कापूस लागवड जवळपास आटोपली आहे. पंजाब, हरियाणा, गुजरातेत क्षेत्र स्थिर राहणार आहे. पण महाराष्ट्र, तेलंगण, मध्य प्रदेशात लागवड कमी होईल, हे निश्‍चित आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात जे क्षेत्र कापूस पिकाखाली कमी होईल, त्यावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. अमेरिकेमध्ये ३८ लाख हेक्‍टवर कापूस लागवड अपेक्षित होती. परंतु, तेथे दुष्काळी स्थितीमुळे लागवड घटली असून, तेथे ३३ टक्के उत्पादन कमी येईल.

आगामी हंगामात सुमारे ६२ लाख गाठींनी उत्पादन कमी येईल, अशी माहिती आहे. चीनमध्येही क्षेत्र सर्वसाधारण राहील. चीनने आपला पीक नियोजनाचा अजेंडा कटाक्षाने राबविला आहे. तेथे लागवड वाढणार नाही. सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी असणार आहे. अमेरिकेमध्ये मार्च ते मेदरम्यान लागवड होते. तेथे लागवड घटल्याचे अहवाल समोर आले आहेत. चीनमध्येही मे ते जुलैदरम्यान लागवड होते. पाकिस्तानातही मार्च ते जुलैदरम्यान लागवड होते. चीनमधील लागवडीचे आकडे स्पष्टपणे समोर आलेले नाहीत. पाकिस्तानातही सुमारे २७ ते २८ लाख हेक्‍टरवर लागवड असेल. तेथील उत्पादन आठ ते १० लाख गाठींनी कमी येईल. पाकिस्तानातून पुढील हंगामात १०८ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी यांनी दिली.  जागतिक स्तरावर प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये लागवड कमी होण्याचे संकेत मिळताच देशांतर्गत बाजारात कापूस दर उच्चांकी पातळीवर पोचले असून, मंगळवारी (ता.१२) ५८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. सरकीचे दरही वधारून २२०० रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत.  आकडे दृष्टिक्षेपात

  • १७ ते १८ लाख हेक्‍टर : जागतिक कापूस लागवड घटण्याचे संकेत
  • २२०० रुपये प्रतिक्विंटल : सरकीचे दर
  • किमान २०० रुपये किलो : दर्जेदार सुताचे दर
  • ११० लाख हेक्‍टर : भारतातील अपेक्षित कापूस लागवड
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com