सुपीक मातीचे देवालय ः ब्राझील

ॲमेझॉन नदीच्या गाळाने ब्राझीलची लाखो हेक्‍टर जमीन सुपीक केली आहे. तिच्या दोन्ही किनाऱ्यांवर वाढणारी वृक्षसंपदा तिच्या पुरावर नियंत्रण तर ठेवतेच, पण त्याचबरोबर तिच्या मधून वाहणाऱ्या गाळामध्ये सेंद्रिय घटकात वाढही करते.
संपादकीय
संपादकीय
ब्राझील या देशाची मृदा सुपीक होण्यासाठी काही नैसर्गिक बाबी कारणीभूत ठरतात. त्यातील पहिली बाब म्हणजे या राष्ट्राची वाहिनी ॲमेझॉन नदी. अतिशय स्वच्छ पाणी असलेली ही नदी बाराही महिने वहात असते. महत्त्वाचे म्हणजे तिच्या दोन्हीही तीरांवर अनेक ठिकाणी घनदाट जंगले आहेत. या देशाच्या मध्यवर्ती भागामधून विषुववृत्त जाते. त्यामुळे येथे भरपूर पाऊस पडतो. परंतु येथील माती सुपीक असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता सतत जमिनीमध्ये मुरत असते. भूगर्भात असलेला नैसर्गिक पाणीसाठा ही या राष्ट्राची मोठी जलश्रीमंती आहे. आणि ती त्यांना या सुपीक मातीमुळेच प्राप्त झाली आहे. या राष्ट्रास निसर्गाचे मिळालेले अजून एक वरदान म्हणजे ॲमेझॉनचे घनदाट जंगल. ब्राझील या राष्ट्रास भेट देण्याची संधी मला सात वर्षांपूर्वी मिळाली आणि निमित्त तसे साधेच होते. आदिवासी भागात लहान बाळांच्या कुपोषणाचा अभ्यास करताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे मातेच्या दुधानंतर बाळांना सरळ भाकरीच्या आहार दिला जातो. या दोन्हींच्या मध्ये बालकांच्या पोषणासाठी आवश्‍यक असणारा पातळ आहार देण्याची पद्धत येथील भागात आढळत नाही. आणि नेमके हेच कुपोषणाचे मुख्य कारण ठरत होते. शास्त्रज्ञ म्हटले, की संशोधन आणि त्यानंतर निष्कर्ष हे आलेच. आदिवासी बाळांचे आईचे दूध सुटल्यानंतर मी साबुकंदाचा पातळ आहार देण्याची योजना तयार करून मातांना त्याचे शिक्षण दिले. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत ही योजना आणली आणि कुपोषण दूर झाले. हा प्रयोग मी आफ्रिकेतील अनेक गरीब राष्ट्रांमध्ये पाहिला होता. तेथे हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. आपल्याकडे केरळच्या पश्‍चिम घाटामध्ये साबुकंद मुबलक पिकतो आणि तेथील लोक त्याचा आहारात समावेश करतातसुद्धा. साबुकंदावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मी माझा शोधनिबंध सादर केला. ही परिषद ब्राझीलिया विद्यापीठ, ब्राझीलमध्ये झाली होती आणि या निमित्ताने या सुपीक मातीच्या देवालयास भेट देण्याची संधी मला मिळाली. अर्ध्यापेक्षा जास्त जंगल असलेल्या या राष्ट्रामध्ये जेथे पाहावे तेथे फक्त सुपीक मातीच दिसते आणि याचे श्रेय ॲमेझॉनचे घनदाट जंगल आणि त्या भागात खळाळत वाहणाऱ्या ॲमेझॉन नदीला जाते. सूर्यकिरण जमिनीवर पोचू शकत नाहीत, एवढा काळोख आजही तेथे पाहावयास मिळतो. या जंगलात असणारे कितीतरी वृक्ष, वेली, झुडपे मानवास अज्ञात आहेत. तेथील प्राणी, कीटक, पक्षी यांची श्रीमंती अगणित आहे. शहरी माणसे एक दोन किलोमीटर आत जाऊन काळोखाच्या भीतीने बाहेर येतात. पण याच घनदाट जंगलात आजही तेथे अनेक आदिवासी जाती-प्रजाती निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहतात. जंगलात आढळणारा साबुकंद हाच त्यांचा मुख्य आहार आहे. ॲमेझॉन नदीच्या गाळाने या राष्ट्राची लाखो हेक्‍टर जमीन सुपीक केली आहे. तिच्या दोन्ही किनाऱ्यांवर वाढणारी वृक्षसंपदा तिच्या पुरावर नियंत्रण तर ठेवतेच, पण त्याचबरोबर तिच्या मधून वाहणाऱ्या गाळामध्ये सेंद्रिय घटकात वाढही करते. या राष्ट्रात रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीस जास्त महत्त्व आहे ते याचमुळे. ॲमेझॉन जंगलामधील सुपीक मातीच्या संदर्भातील एका कार्यशाळेस मी मुद्दाम हजेरी लावली. संबंधित कृषी शास्त्रज्ञाने या जंगलातील सुपीक माती गोळा करून त्यावर लावलेला भाजीपाला आणि हरितगृहातील भाजीपाला यांचा तुलनात्मक अभ्यास करून निसर्गाने मानवास दिलेली सुपीक माती ही मानवनिर्मित हरितगृहातील उत्पादनासापेक्षाही जास्त उत्पादन आणि नफा मिळवून देते, तेही कुठेही पैशाचा अपव्यय न करता हे सिद्ध करून दाखविले. घनदाट जंगलात वृक्षवेलीची पाने, त्यांच्या छायेत वाढणाऱ्या रांगत्या वनस्पती शेकडो वर्षांपासून जमिनीची सुपीकता वाढवत असतात. या जंगलामधील ही सुपीकता अनेक ठिकाणी चार- पाच फूट खोलपर्यंत पोचली आहे. या जंगलास खेटून लाखो हेक्‍टरवर शेती केली जाते. कुठेही रासायनिक खत वापरले जात नाही. मात्र उत्पादन विक्रमी असते. ब्राझीलमध्ये उद्योगधंदे विपूल आहेत. शहरांची लोकसंख्या आणि वाढही भरपूर आहे. पण सर्वकाही निसर्गाचा, जंगलाचा आणि नद्यांचा सन्मान ठेवूनच. शासनातर्फे शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपीकता नियमितपणे मोजली जाते. जेथे ती कमी असते तेथे शासनातर्फेच वृक्षलागवड करून वाढविली जाते. ऊस आणि साखर कारखान्याचा हा देश सेंद्रिय शेतीसाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. रासायनिक शेतीचे क्षेत्र वाढवू न देणे याकडे शासनाचे काटेकोर लक्ष असते. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे जमिनीची सुपीकता टिकवणे. या देशाच्या सुपीक जमिनीवर पिकवलेल्या काजू उत्पादनास जगभरातून मोठी मागणी आहे. ब्राझीलमध्ये पाऊस भरपूर असला तरी या देशाचा ईशान्य पूर्व भाग कायम दुष्काळाच्या छायेत असतो. या भागात शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर गवताळ प्रदेशाची निर्मिती चालू आहे. जमीन सुपीक करण्यामध्ये तंतुमय मुळे असणाऱ्या गवताच्या प्रजातींचा मोठा सहभाग असतो. सुपीकतेला प्राधान्य देऊन या देशाने गेल्या दोन दशकांमध्ये एकरी दुप्पट उत्पादन योजना राबवली आणि ती यशस्वीसुद्धा केली. म्हणूनच कृषी उत्पादन, निर्यातीमध्ये आज हा देश जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलची कॉफी ही या देशाच्या सुपीक जमिनीची जगास एक उत्कृष्ट भेट आहे आणि यांस केळीसुद्धा अपवाद नाही. या देशामधील जमीन सुपीकता ॲमेझॉन नदीर खोरे, ॲमेझॉन जंगल आणि विषुववृत्ताचा भरपूर पावसाळी प्रदेश येथे पाहावयास मिळते पण शहरी परिसरात, मोकळ्या विस्तीर्ण कृषी क्षेत्रात आजही मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर पाहावयास मिळतो. शासनाचे कायदे आणि नियम कितीही काटेकोर असले, तरी त्यामध्ये पळवाटा या असतातच, आपण मात्र जमेची बाजू पाहावयाची असते आणि मी नेमकी हीच पाहिली. ॲमेझॉन नदी, ॲमेझॉनचे पर्जन्य, जंगल पाहून या राष्ट्राची साठ टक्के शेतजमीन सुपीक का आहे, याचे उत्तर मिळते. ज्या देशात नद्या वर्षभर खळखळ वाहत असतात, त्यांच्या तीराकाठी वृक्ष श्रीमंती असते आणि जंगले घनदाट असतात आणि ती संरक्षित असतात त्या देशाची माती जीवंत आणि सुपीक असते. अशा जमिनीवर वाढणारी पिके आनंदाने डोलत असतात. यालाच मी देवालय म्हणतो. ब्राझील हे राष्ट्र सुपीक मातीचे देवालय आहे, ते याचमुळे. डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com