agrowon special article on free trade and minimum support price | Agrowon

खुला व्यापार आणि हमीभाव
मिलिंद मुरुगकर 
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

एकदा का ‘डब्ल्यूटीओ’च्या शेतकरारावर सह्या केल्या, की मग हमीभाव मागणे चुकीचे आहे हे गृहीतच मुळात चूक आहे. डब्ल्यूटीओच्या करारातच हमीभावाची तरतूद आहे. कारण डब्ल्यूटीओचा करार खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करतो; मुक्त अर्थव्यवस्थेचे नाही.

शेतीमालाच्या खुल्या व्यापाराचे समर्थन करणे आणि हमीभावाची मागणी करणे यात काही विसंगती आहे का, खुल्या व्यापाराचे समर्थन केल्यावर सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाची मागणी करणे हा दुटप्पीपणा ठरतो का, हे प्रश्न महत्त्वाचे अशासाठी, की शेतकरी आंदोलनातील काही लोकांनी अशी भूमिका घेऊन राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली आहे. कारण या दोन्ही नेत्यांनी पूर्वी ते शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेत असताना खुल्या अर्थव्यवस्थेच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. 

मुळात एक गोष्ट लक्षात घेऊया की शेतीमालाच्या व्यापारासंदर्भात खुल्या अर्थव्यवस्थेची भूमिका घ्यायची आहे, की मुक्त अर्थव्यवस्थेची? मुक्त अर्थव्यवस्था याचा अर्थ सरकारने कोणत्याही परिस्थितीत व्यापारात हस्तक्षेप न करणे; आणि अशी मुक्त अर्थव्यवस्थेची भूमिका काही लोकांची असते. त्यांचा हमीभाव या कल्पनेलाच विरोध असतो. त्यांची अशी भूमिका असते, की सरकारने आयातीवरील आणि निर्यातीवरील सर्व बंधने काढून टाकावीत आणि मग बाजारपेठेत उतरून हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्याची गरजच नाही. पण या ‘मुक्त अर्थव्यवस्थावादी’ लोकांच्या भूमिकेला काही आधार आहे का? तसा कोणताच आधार नाही. त्यांना आपली भूमिका हे भारतीय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे हे सिद्ध करायचे असेल तर त्यांनी गेल्या दहा वर्षांतील देशांतर्गत बाजारातील भाव आणि आंतरराष्ट्रीय भाव याची तुलना करावी आणि हे सिद्ध करावे, की फक्त निर्यात खुली असावी, हमीभावाची काहीही आवश्यकता नाही; पण असे न करता केवळ हमीभावाची गरज नाही असा उद्घोष करत राहणे हे योग्य नाही. सत्य हे आहे की हे लोक असे सिद्ध करूच शकत नाही. त्यांची ही भूमिका केवळ विचारप्रणालीवर आधारित आहे. त्याला वास्तवाचा आधार नाही. 

एकदा का ‘डब्ल्यूटीओ’च्या शेतकरारावर सह्या केल्या, की मग हमीभाव मागणे चुकीचे आहे हे गृहीतच मुळात चूक आहे. डब्ल्यूटीओच्या करारातच हमीभावाची तरतूद आहे. कारण डब्ल्यूटीओचा करार खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करतो; मुक्त अर्थव्यवस्थेचे नाही. विदर्भ, मराठवाडा या भागांतील कोरडवाहू शेतकाऱ्यांसाठी तूर आणि इतर डाळींचे भाव ही महत्त्वाची गोष्ट आहे; आणि डब्ल्यूटीओच्या शेतीकरारात या पिकांचे हमीभाव वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याने डब्ल्यूटीओच्या कराराचा कोणताही भंग होत नाही. तूर आणि इतर डाळींचे हमीभाव वाढवलेच पाहिजेत आणि हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करणे ही बांधिलकी शासनाने स्वीकारलीच पाहिजे, अशी ठाम भूमिका भारताचे सध्याचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनीच घेतली आहे. 

ते आपल्या अहवालात म्हणतात, की आपला देश सातत्याने डाळीच्या तुटवड्याचा सामना करत आला आहे. भारताची डाळींची गरज ही देशांतर्गत उत्पादनापेक्षा नेहमीच जास्त राहिली आहे; आणि ही तूट पुढील काही वर्षे वाढत जाणार आहे. ही गरज आपण आयातीद्वारे भरून काढतो, पण हा मार्ग किफायतशीर नाही. याचे कारण जगात डाळ उत्पादन खूप कमी देशांत होते, आणि भारत हा एक प्रमुख डाळ उत्पादक देश आहे. डाळीचे देशांतर्गत भाव आणि आंतरराष्ट्रीय भाव यांची तुलना आपल्याला असे दाखवते, की जेव्हा देशातील भाव वाढलेले असतात तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातील भावदेखील वाढलेले असतात; आणि जेव्हा ते कमी असतात तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातील भावदेखील कमी असतात. याचा अर्थ असा, की जेव्हा भारताला डाळींची गरज असते; म्हणजे देशातील भाव वाढलेले असतात, तेव्हा आयात करणे हे खर्चिक असते; कारण तेव्हा आंतराष्ट्रीय बाजारातील भावदेखील वाढलेले असतात. उदाहरणार्थ तुरीच्या बाबतीत गोष्ट लक्षात घेऊ, की भारताची आयात ही भारताबाहेरील एकूण तूर उत्पादनाच्या ३० टक्के इतकी प्रचंड असते. त्यामुळे भारत खरीददार म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात उतरला, की दर प्रचंड वाढतात आणि ही आयात महाग ठरते; आणि त्यामुळे आयातीवर अवलंबून राहणे देशाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे देशांतर्गत डाळीची उत्पादकता आणि उत्पादन वाढवणे याला पर्याय नाही. त्यासाठी सुब्रमण्यम यांना हमीभाव वाढवणे आणि त्याची प्रभावी खरेदी करणे हा महत्त्वाचा पर्याय वाटतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की शेतकरी आंदोलनातीलच काही लोक हमीभाव मागणे यालाच आक्षेप घेतात. त्यांची ही भूमिका निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधी आहे. 

शेतकरी आंदोलनातील या लोकांची अशीही समजूत होती, की एकदा का डब्ल्यूटीओचा शेतीकरार अमलात आला, की सरकारला शेतीमालाच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध घालता येणार नाहीत. हीसुद्धा समजूत खोटी होती. डब्ल्यूटीओच्या करारानंतरदेखील निर्यातबंदी नेहमीच लादली गेली आहे. आता तर सरकारने हमीभाव या संकल्पनेचा आधारच काढून घ्यायला सुरवात केली आहे. नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण सत्तेवर आल्यावर पन्नास टक्के नफा देणारे हमीभाव देऊ, असे आश्वासन दिलेच नाही, असे देशाचे कृषिमंत्री लोकसभेत सांगतात; आणि पंतप्रधान त्यावर मौन बाळगतात. हा खोटेपणा एकीकडे, तर दुसरीकडे जाहीर केलेले हमीभावदेखील मिळत नाहीत याबद्दल न बोलता सरकार आम्ही किती खरेदी केली याचे आकडे फेकत राहते. आणि याच वेळेस शेतकरी आंदोलनातीलच काही लोक सरकार खरेदीत उतरले की फक्त भ्रष्टाचार होतो असे म्हणून सरकारच्या भूमिकेला एकप्रकारे समर्थनच देतात. सरकारच्या अकार्यक्षमेतेची जबाबदारी महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी का बरे स्वीकारावी? सरकारने जाहीर केलेले हमीभाव त्यांना मिळालेच पाहिजेत एव्हढीच त्यांची भूमिका असली पाहिजे.
राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील सदस्य असलेल्या सुकाणू समितीवर अशीही टीका केली जाते, की ते स्वामिनाथन कमिशनच्या हमीभावाच्या (टीकाकारांच्या मते अव्यवहार्य) अशा मागणीला पाठिंबा देत आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की सुकाणू समिती ही आंदोलकांची समिती आहे. आंदोलन म्हटल्यावर त्यात रणनीती असणे अपरिहार्य आहे. जे सरकार जाहीर केलेले हमीभाव देण्याची बांधीलकी दाखवत नाही आणि पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन दिलेच नाही असे म्हणते, त्या सरकारवर ‘तुम्ही दिलेले पन्नास टक्के नफ्याचे आश्वासन पूर्ण करा’, असा आग्रह हे दोन नेते आणि शेतकरी सुकाणू समिती धरत असतील, तर त्यात कोणताच बेजबाबदारपणा नाही. उलट असा आग्रह न धरणे हा बेजबाबदारपणा ठरेल. 

मिलिंद मुरुगकर 

(लेखक कृषी अर्थशास्त्राचे 
अभ्यासक आहेत)

इतर संपादकीय
तूर घ्या तूर, मोझांबिकची तूर! कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे पर्व संपताच...
मधमाश्‍या नाहीत तर मानवी जीवन नाहीजून २०१५ मध्ये इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च...
उंटावरून शेळ्या नका हाकूगेल्या हंगामात राज्यात कापसावर गुलाबी बोंड अळीचा...
स्वस्त पशुखाद्य दुकान संकल्पना राबवा शासनाच्या आदेशानुसार गाईच्या दुधाला ३.५ टक्के...
डोळे उघडवणारे ‘अदृश्य सत्य’संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या...
भूगर्भाची तहान भागवूया उन्हाच्या झळा वाढल्याने यंदा आपले राज्य देशात...
‘दादाजीं’ची दखल घ्याउघड्या डोळ्यांनी पाहिलं मरण कशाला आता रचता सरण...
उत्पन्न दुपटीसाठी हवा कोरडवाहू शेतीवर भरभा रत सरकारने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये...
चुकीच्या धोरणामुळे खतांचा असंतुलित वापर रासायनिक खते सम्पृक्त (कॉन्सन्ट्रेटेड) ...
आता गोंधळ ‘ॲंटीडोट’चागेल्या हंगामात कापसावर रासायनिक कीडनाशकांच्या...
गोड साखरेची कडू कहाणीमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साखर...
केंद्रस्थानी हवा लहान शेतकरीज गभरातील ९० टक्के लहान शेतकरी हे ८० टक्के अन्न...
तेलंगणाचा ‘मास्टर स्ट्रोक’तेलंगणा सरकारने खरीप हंगामासाठी निविष्ठा...
नागलीला प्रोत्साहन म्हणजे कुपोषण आणि...कर्नाटकच्या निवडणुकीच्या धांदलीत, विद्यमान...
दूध संघ तुपाशी, उत्पादक उपाशीदुधात मिठाचा खडा’ या विषयावरील जितेंद्र पाटील...
रसाळ गोमट्या फळांसाठी...आंब्यांचा हंगाम चालू आहे. या वर्षी आंब्याला मोहर...
सुरक्षित माती; सुरक्षित मानवमाती प्रदूषित झाल्याने मानवी व जनावरांच्या...
मातीच्या गंधाचे देणे सुगंध रुपानेच फेडलेवसईमधील प्रगतिशील शेतकरी आणि स्व. वसंतराव नाईक...
शेती विकासासाठीचे ‘पीपीपी’ मॉडेलशेतीला चालना देण्यासाठी शासकीय पातळीवर विविध...
गटशेती योजना का फसली?सद्यपरिस्थितीत शेतीतील अनेक समस्यांवर मात करून...