यंदाच्या मॉन्सूनचं वेगळेपण काय?

सप्टेंबर महिना सरला, तरी मॉन्सून काढता पाय घेण्याची चिन्हं नाहीत. यंदाचा मॉन्सून एकूणच अनेक प्रकारे वैशिष्टपूर्ण ठरला. त्याचं वितरण असमान होतंच; पण त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटनांमुळे हवामान अंदाज, हवामानशास्त्र विभाग चर्चेत राहिले. यंदाच्या मॉन्सूनचं नेमकं वेगळेपण काय? याचा घेतलेला हा वेध...
संपादकीय
संपादकीय

नैॡत्य मॉन्सूनची ओळख करून द्यायची झाली, तर तो भारतात दर वर्षी न चुकता येणारा एक पाहुणा आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्याची आपण आतुरतेनं वाट पाहतो, त्याचं स्वागत करतो, चार महिने त्याच्या सहवासाचा लाभ घेतो; पण शेवटी इतर कोणत्याही पाहुण्यासारखी त्याचीही परत जायची वेळ येते. साधारणपणे एक जूनच्या सुमारास मॉन्सून केरळवर दाखल होतो आणि एक सप्टेंबरच्या आसपास तो पश्‍चिम राजस्थानवरून परत निघतो. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही तारखा क्वचितच काटेकोरपणे पाळल्या जातात. यंदाच्या वर्षी मॉन्सूननं अगदी २९ सप्टेंबरपर्यंत परत निघायचं नावच घेतलेलं नाही. दर वर्षी येणाऱ्या या आपल्या पाहुण्याचा मुक्काम यंदा जवळजवळ एका महिन्यानं लांबला आणि आता कुठं तो परत जायच्या तयारीत आहे. यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला, त्यामुळं एकूणच यंदाच्या मॉन्सूनचा आढावा घ्यायची आता वेळ आली आहे. 

नाराजी आणि विनोदही... अलीकडच्या काळात हवामानशास्त्रानं जगभरात आणि विशेषतः भारतात खूप प्रगती केली असल्याचं आपल्याला मानावंच लागेल. भारतीय लोक परदेशात जाऊन आल्यावर नेहमीच तिकडच्या हवामानाच्या अंदाजांची वाखाणणी करत असतात. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आता अत्याधुनिक डॉप्लर रडारचं जाळं देशभर पसरवलं आहे. इस्रोचे दोन संवेदनशील उपग्रह वातावरणाचं अहोरात्र निरीक्षण करत आहेत. देशात ठिकठिकाणी स्वयंचलित उपकरणे बसवली गेली आहेत. परदेशाहून सक्षम मॉडेल्स आयात केली गेली आहेत आणि त्यांचा वापर करण्यासाठी अतिशक्तिशाली संगणक उपलब्ध आहेत. अशा सर्व अद्ययावत सुविधांनी भारतीय हवामान खातं आज सुसज्ज झालं असल्याचं आपण पाहत आहोत. अर्थात तरीसुद्धा इतर देशांसारखं भारतीय हवामान खातंही अचूक अंदाज का वर्तवू शकत नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडतो. 

भारताच्या वातावरणावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत नैॡत्य मॉन्सूनचं साम्राज्य असतं. जूनच्या आधीच मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागतात आणि सप्टेंबरच्या अंती तो तातडीनं परततो, असंही नाही. म्हणून वर्षातले सहा महिने आपल्या देशात मॉन्सूनची चर्चा होत राहिली, तर त्यात नवल नाही. या काळात हवामानशास्त्र विभाग विविध स्तरांवर आपले पावसाचे अंदाज वर्तवत राहतो. लोक पावसाइतकीच त्या अंदाजांची आतुरतेनं वाट पाहत असतात; पण पुष्कळदा त्यांचं समाधान होत नाही. मग हवामानाचा अंदाज एक चर्चेचा आणि कधी कधी विनोदाचाही विषय बनतो.  नेहमीप्रमाणे यंदाच्या मॉन्सूनच्या दरम्यानही हवामानाच्या अंदाजांविषयी व्यंग्यचित्रं रेखाटली गेली. एवढंच नाही, तर दोन घटनांमुळं हवामान खातं जास्त चर्चेत आलं. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ऑगस्टमध्ये म्हणाले ः ‘‘हवामान खात्याची भाकितं इतक्‍यांदा चुकली आहेत, की या वेळी त्यांचा अंदाज बरोबर आला, तर मी स्वतः हवामानशास्त्रज्ञांच्या तोंडात साखर घालीन.’’ प्रत्यक्षात त्यानंतरच्या तीन-चार दिवसांत हवामानशास्त्र विभागानं सांगितल्याप्रमाणं राज्यात खरोखरच सर्वदूर भरपूर पाऊस पडला. विशेष म्हणजे पवार यांच्या कार्यकर्त्यांनी खरोखर पुण्याच्या सिमला ऑफिसच्या  भव्य वास्तूमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना भेट म्हणून साखरेचं एक पोतं दिलं. असाच आणखी एक प्रकार यंदा घडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका घटनेबाबत थेट नाराजी व्यक्त केली. यामागची पार्श्वभूमी सांगायची, तर २६ जुलै २००५ रोजी मुंबईत पडलेल्या अभूतपूर्व पावसामुळं निर्माण झालेली भयानक परिस्थिती मुंबईकर अजून विसरलेले नाहीत. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून गेल्या बारा वर्षांत अनेक उपाय केले गेले असले, तरीसुद्धा मुंबईकरांच्या मनातली भीती संपूर्णपणे नाहीशी झालेली नाही.

यंदा २९ ऑगस्टला ती सुप्त भीती जागृत झाली, असं म्हणायला हरकत नाही. त्या दिवशी काही तासांच्या अवधीत कोसळलेल्या मुसळधार पावसानं मुंबई पुन्हा एकदा जलमय झाली. तरी पण परिस्थिती बहुतांशी आटोक्‍यात राहिली. मात्र, त्यानंतर झालं असं, की दुसऱ्या दिवशीही म्हणजे ३० ऑगस्ट रोजी तसाच पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली. यावेळी मात्र तितक्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही. हवामान अंदाजाच्या आधारावर राज्य सरकारनं ३० ऑगस्टला सरकारी कार्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना सुटी दिली आणि लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला; पण सरकारनं घेतलेले हे खबरदारीचे उपाय काहीसे व्यर्थ ठरले. त्यामुळं या संदर्भात फडणवीस यांनी केंद्रीय पृथ्वीविज्ञान विभागाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक पत्र लिहून हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. 

मुंबईत पाऊस कुठं, कधी आणि किती पडणार याचं भाकित करण्याचं काम निर्विवादपणे हवामान खात्याचं आहे. ते भाकीत अचूक ठरावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणं हवामान खात्याकडून अपेक्षित आहे; पण पावसाच्या रूपानं पडलेल्या पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी हवामान खात्याची निश्‍चितपणे नाही. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे, ती म्हणजे मुंबईत पुन्हा एकदा म्हणजे १९ सप्टेंबर रोजी तशीच परिस्थिती उद्भवली. मुंबईवर पूर्ण सप्टेंबर महिन्यात जेवढा पाऊस अपेक्षित असतो, तेवढा पाऊस अवघ्या २४ तासांत कोसळला. यावेळी मात्र हवामानाचा अंदाज व्यवस्थितपणे दिला गेला होता, शासकीय यंत्रणा सज्ज होती आणि मुंबईचं जनजीवन तुलनेनं फारसं विस्कळित झालं नाही. हे प्रशंसनीय नाही का? मात्र, एकूणच यंदा सर्वांचं ‘पाऊसभान’ खूप जागृत झाल्याचं जाणवलं.

‘सरासरी’चा अंदाज हवामान खात्याकडून मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचं दीर्घावधी पूर्वानुमान दोन टप्प्यांत केलं जातं. त्या प्रथेनुसार यंदाच्या मॉन्सूनसाठीचं पहिलं पूर्वानुमान एप्रिल महिन्याच्या मध्यावर घोषित करण्यात आलं. देशात जून-सप्टेंबर या चार महिन्यांतलं एकूण पर्जन्यमान सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. हवामान खात्याच्या व्याख्येनुसार, त्याला ‘सामान्य किंवा सरासरी मॉन्सून’ म्हटलं गेलं. त्याशिवाय पावसाचं वितरण समसमान राहण्याची चांगली शक्‍यता आहे, असंही सांगण्यात आलं. ही गोड बातमी लोकांच्या मनात ताजी असतानाच, नैॡत्य मॉन्सून अंदमान-निकोबारमध्ये १४ मे २०१७ रोजी म्हणजे सहा दिवस आधीच दाखल झाला आहे, असं हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं.

नैॡत्य दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह अधिक प्रबळ बनल्यामुळं तो केरळवर वेळेआधी पोचेल, अशी एक आशा लोकांच्या मनात निर्माण झाली आणि राज्यातली जनतासुद्धा आतुरतेनं आकाशाकडं बघू लागली. प्रत्यक्षात मात्र देशाच्या मुख्य भूमीवर मॉन्सूनचं व्हावं तसं जोरदार आगमन झालं नाही. राज्याच्या सीमेवर मॉन्सून अनेक दिवस खोळंबून राहिला. शेतकऱ्यांच्या आशेचं निराशेत रूपांतर झालं. मॉन्सूनच्या आगमनाच्या आधारावर केल्या गेलेल्या पेरण्या वाया गेल्या आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट झेलावं लागलं. अनेकांनी नेहमीच्या पिकांऐवजी दुसरी पिकं निवडली. 

डॉ. रंजन केळकर  ः ९८५०१८३४७५ (लेखक हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com