मुरब्बी नेता, दिलदार माणूस

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता. त्यानिमित्त या नेत्याचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य याविषयीच्या आठवणींना दिलेला उजाळा.
संपादकीय
संपादकीय
काही माणसे राजकारणात गेल्यानंतर त्या क्षेत्रात इतकी हरवून जातात, की खास त्यांची अशी वैशिष्ट्येही झाकोळून तरी जातात किंवा लुप्त होतात. मुखवटे चढविताना मूळ चेहराच दिसेनासा होतो. वसंतदादा पाटील यांचे मला जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे, मोकळ्या मनाचा आणि दिलदार असा हा माणूस राजकारणाच्या प्रवासात आपल्या स्वभावधर्माप्रमाणेच वागत राहिला. त्यांच्याबरोबरच्या सहवासात आलेल्या अनेक अनुभवांतून माझ्या मनावर ठसला तो त्यांचा दिलदार स्वभाव. सहकार, शिक्षण, प्रशासन, राजकारण या क्षेत्रात त्यांनी गाजविलेल्या कर्तृत्वाचा आलेख काढतानाही त्यांचे हे माणूसपण ठळकपणे नजरेत येते. वडिलांचे निधन झाले. त्या वेळची गोष्ट. ६ फेब्रुवारी १९५४ ची. मला भेटायला त्या वेळी सांगलीहून वसंतदादा आले होते. सोबत गुलाबराव पाटील होते. ही माझी आणि दादांची पहिली भेट. त्यानंतर दादांसोबत आयुष्यातील अनेक क्षण आले. आज त्या साऱ्या आठवणी जाग्या होत आहेत. मला राजकारणात आणले ते स्वर्गीय राजारामबापूंनी. त्याकाळी सांगलीच्या आणि पर्यायाने पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणात वसंतदादा, राजारामबापू, गुलाबराव पाटील या तीन महनीय व्यक्‍ती होत्या. गुलाबराव मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत; मात्र त्यांचा वकूब त्या तोडीचाच होता. १९६२च्या निवडणुकीत माझे तिकीट कापले गेले. मी तरुण होतो, त्यामुळे बहुधा मला तिकीट मिळाले नाही. त्या वेळी फक्‍त वसंतदादा पाटील आणि राजारामबापू यांनाच तिकिटे मिळाली. त्यानंतर पुढे १९६७ ला मला तिकीट मिळाले. मी पन्हाळ्यातून निवडून आलो. त्या वेळी राजारामबापूंनी मला खूप मदत केली होती. तशी माझी राजकीय कारकीर्द त्यापूर्वीच सुरू होती; मात्र या निवडणुकीनंतर माझ्या राजकीय प्रवासाला वळण मिळाले. हे सर्व सांगण्याचे कारण यासाठीच, की त्या वेळी वसंतदादांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण होत नव्हते. त्यांचा दरारा मोठा होता. तो मला जवळून पाहता आला. दादांचे वैशिष्ट्य असे, की ते एखाद्याला केलेल्या मदतीची कधीही जाहीर वाच्यता करायचे नाहीत. अगदी त्यांना विचारले तरी. येणाऱ्या प्रत्येकाला ते भरभरून मदत करायचे. त्यांना माणसांची अचूक पारख होतीच. माणसांनी केलेल्या उपकाराची परतफेड जेवढी जमेल तेवढी करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. मला तर त्यांनी भरभरून दिले. दादा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मी शैक्षणिक संस्थेसंदर्भात परवानगीसाठी गेलो. दादांनी एक-दोन नव्हे तर तब्बल ३९ परवानग्या दिल्या. मी आश्‍चर्याने म्हणालो, ‘‘दादा इतक्‍या परवानग्या कशाला?’’ ते म्हणाले, ‘‘अरे करतोयस ना काहीतरी पुढाकार घेऊन, मग मागे कशाला थांबायचे?’’ खरे तर मेडिकल कॉलेज चालवण्यासंदर्भात माझी मलाच शंका होती, की मी ते चालवू शकेन की नाही; मात्र मी पुढे यशस्वी झालो. माझ्याविषयी त्यांना वाटणारा अकृत्रिम स्नेह मला अनेक प्रसंगांमधून जाणवला. त्याविषयी एकदा मी त्यांना विचारले, तर ते म्हणाले, ‘‘मी भूमिगत होतो तेव्हाची गोष्ट. तुझ्या वडिलांनी मला त्या वेळी एक हजार राणीछाप रुपये दिले होते. ते उपकार माझ्या कायम स्मरणात आहेत. अशी कृतज्ञतेची भावना जपणारी माणसे राजकारणासारख्या क्षेत्रात फार अभावाने आढळतात. अल्प शिक्षण झाले असले तरी अफाट निरीक्षण क्षमतेचा हा नेता होता. त्यांना नजरेतून सारे काही समजत असे. त्यांच्यात एक सुसंस्कृतपणा होता. त्यांनी कधीच कोणाला अपशब्द वापरला नाही. कोणालाही तोडून बोलले नाहीत. एखाद्याने खूपच घोळ केला, तर ते त्यांना ‘आता परत चुकू नकोस. तुला शेवटचे सांगतोय’ असे बोलून माफ करायचे. त्यामुळे चुकणारा माणूसही कधी त्यांच्यापासून तुटायचा नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांत त्यांचा आदरयुक्‍त प्रभाव होता. त्या वेळचा एक प्रशासकीय किस्सा सांगतो. १९७५-७६ मधली घटना असावी. त्या वेळी मराठवाड्यात फार दुष्काळ पडला होता. औरंगाबादच्या कलेक्‍टरने जळगाव येथून आयात धान्याच्या बोगी मागवल्या होत्या. पिण्याचा प्रश्‍न भेडसावू नये म्हणून सगळ्या विहिरी, तलाव ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवत नजर ठेवली होती. हे ज्या वेळी त्या वेळच्या मुख्य सचिवांना कळाले तेव्हा त्यांनी त्या कलेक्‍टरला डायरेक्‍ट निलंबनाचे फर्मान काढले होते. ताबडतोब मुंबईत भेटायला सांगितले. तो अधिकारी मुंबईत आला आणि काय त्याच्या डोक्‍यात आले कुणास ठावूक त्याने थेट ‘वर्षा’ गाठले. तेथे दादांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दादांनी मुख्य सचिवांना फोन करून सांगितले, की त्या कलेक्‍टरवर काही कारवाई करू नका. तरुण आहे. त्याचा दोष नाही. त्याचा हेतू चांगला आहे. त्याला मी सांगितले आहे. त्यामुळे तो पुन्हा तसे करणार नाही. अशा तऱ्हेने सनदी अधिकारी, सरकारी अधिकाऱ्यांशी त्यांचा खुला व्यवहार असे. त्यांच्या निरीक्षणापुढे, आकलनापुढे भले-भले अधिकारी भांबावून जात. त्यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती. सहकार क्षेत्रात दादांनी अनेकांना मदत केली. सहकार्य केले. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्र भरभराटीस आले. सांगली, मिरज, कोल्हापूर, या भागात सूतगिरण्या, साखर कारखाने उभारले, यामागे वसंतदादांची प्रेरणाच कारणीभूत ठरते. त्यामुळे या भागाचा विकास झाला. कायापालट झाला. दादा एखाद्याच्या मागे उभे रहायचे असेल, तर खंबीरपणे उभे राहत. त्याचे उदाहरण सांगतो. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा मी चेअरमन होतो. मी त्या वेळी मंदिर परिसरात प्राथमिक शाळा उभारण्याचा प्रयोग केला. त्यावर बरीच ओरड झाली. देवस्थान समितीचे पैसे खर्च केले म्हणून टीका झाली; मात्र दादा माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. गगनबावड्याला साखर कारखाना काढायचे ठरवले. त्याच्या मंजुऱ्या रखडल्या होत्या. शेवटी त्या मंजुऱ्या मिळाल्या. त्यात काही वर्षे गेली. कारखाना सुरू झाल्यावर वसंतदादा आले होते. रामराव आदिकदेखील उपस्थित होते. माझ्या आठवणीत हा शेवटचा माझा व वसंतदादांचा सार्वजनिक कार्यक्रम असावा. त्या वेळी दादा भरभरून बोलल्याचे आठवते. दादांच्या राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले. शेवटी शेवटी दादांच्या स्वभावाला न रुचणाऱ्या घटना घडल्या. त्यांना राजस्थानचे राज्यपाल करण्यात आले; मात्र आयुष्यभर लोकांत रमलेला हा नेता तिथे रमला नाही. त्यांचे मन लागले नाही. ते परत आले. स्वातंत्र्यसेनानी, भूमिगत चळवळी, तळागाळातून माणसांची नाळ असलेला, एक व्हिजन असणारा, भविष्याचा वेध घेणारा हा नेता विरळाच होता. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने माझे विनम्र अभिवादन. - डॉ. डी. वाय. पाटील ( शब्दांकन ः सिद्धेश्‍वर डुकरे ) (लेखक त्रिपुरा व बिहार राज्यांचे माजी राज्यपाल आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com