agrowon special article on world soil day | Agrowon

सजीव माती तर समृद्ध शेती
अशोक साकळे
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

ज्या मातीच्या एक ग्रॅम निर्मितीसाठी २०० वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो, त्या मातीला ‘मातीमोल’ म्हणून तिची किंमत शून्य ठरवणारे आम्ही किती कृतघ्न! आज जागतिक मृदा दिनानिमित्त मातीची सुपीकता, तिचे आरोग्य कसे टिकवायचे, यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब लोकसंख्येला ९५ टक्के अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती. म्हणून मातीला आपण ‘काळी आई’ म्हणतो. भरघोस आणि दर्जेदार पिकांचे उत्पादन हवे असेल तर आपल्या शेतातील मातीसुद्धा तेवढीच निरोगी आणि सुपीक हवी. ‘अन्न व कृषी संघटने’द्वारा (एफएओ) ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या वर्षीचे घोषवाक्य आहे, ‘पृथ्वीचे संरक्षण करूया मातीच्या रक्षणाने’. मातीचे महत्त्व अधोरेखित करून तिच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस!

आता प्रश्न पडतो की असे काय घडले, की मातीसाठी असा दिवस साजरा करण्याची वेळ यावी. तर मग ही आकडेवारी पाहा. भारताच्या ३२८.७३ दशलक्ष जमिनीच्या क्षेत्रफळापैकी १२०.४० दशलक्ष एवढी जमीन नापीक होत चालली आहे. पाणी आणि हवेमुळे देशातील दरवर्षी ५.३ अरब टन सुपीक मातीची धूप होऊन ती नष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या ३.०७ दशलक्ष भौगोलिक क्षेत्रफळापैकी सुमारे ४२.५० टक्के जमीन खराब आहे. राज्यातील १५९ लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळाच्या छायेत येते. इतर राज्यांच्या तुलनेत ऊस वगळता इतर सर्व पिकांची उत्पादकता कमी असून, महाराष्ट्रात सुमारे १४६ लाख हेक्टर क्षेत्रफळावर माती आणि पाणी संवर्धनाची तत्काळ गरज आहे.

मातीची निर्मिती प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असून, खडकांपासून बारीक मातीचे कण निर्मितीसाठी शेकडो वर्षे लागतात. ऊन, वारा, पाऊस या निसर्गचक्राद्वारे हळूहळू अनेक प्रकारचे खडक खंडित होत होत मातीत रूपांतरित होतात. मातीचे प्रारूप चार घटकांत विभाजित केले जाते. ज्या मातीत ४५ टक्के मातीचे कण, २५ टक्के पाणी, २५ टक्के हवा आणि ५ टक्के सेंद्रिय कर्ब असते, ती पिकाच्या वाढीसाठी आदर्श माती! हे प्रमाण जर बिघडले तर मातीचे आरोग्य बिघडले असे समजावे.

मातीची सुपीकता आणि उत्पादकता हे मातीचे गुणवत्ता मोजण्याची दोन परिमाणे आहेत. मातीची सुपीकता म्हणजे पिकाला लागणारे सर्व अन्नघटक पुरवण्याची मातीची अंगभूत क्षमता. ही क्षमता मातीच्या निर्मिती प्रक्रियेपासून तयार झालेली असते. ती सहजासहजी बदलता येत नाही. पिकाच्या वाढीसाठी १७ अन्नघटक लागतात. यापैकी एका अन्नघटकाची जरी कमतरता भासली तर पिकाच्या वाढीवर आणि पर्यायाने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. सुपीक मातीत सर्व अन्नघटक पुरेशा प्रमाणात, पिकाला उपलब्ध होतील अशा स्वरूपात असतात. मातीची सुपीकता प्रयोगशाळेत मातीच्या नमुन्याची तपासणी करून ठरवली जाते. म्हणून दर तीन वर्षांनी मातीची आरोग्यपत्रिका काढली पाहिजे. मातीची उत्पादकता पिकाच्या एकरी उत्पादनाशी संबंधित आहे. सुपीक मातीचे योग्य व्यवस्थापन करून, योग्य बियाणे निवड, संतुलित खतांचा वापर, कीड व रोग नियंत्रण करून एकरी किती उत्पादन शेतकरी घेतो यावरून त्या मातीची उत्पादकता ठरते.  

सुपीक मातीची मोठ्या प्रमाणावर होणारी धूप हा चिंतेचा विषय आहे. सुपीक माती चार प्रमुख कारणांनी नष्ट होत आहे. १) पाऊस, नद्यांना पूर आदींमुळे पाण्याच्या प्रवाहात सुपीक माती वाहून जात आहे. २) वृक्षतोडीमुळे व चराऊ कुरणे नष्ट झाल्याने ओसाड जमिनींवरील मातीची वाऱ्याद्वारे धूप होत आहे. ३) भौतिक कारणांनी होणारी धूप जसे की शहरीकरण, औद्योगीकरण, रस्ते विकासात मातीचे स्थलांतर ४) रासायनिक प्रक्रियेने होणारी धूप जसे की सतत एकच पीक घेण्याने निर्माण झालेली अन्नघटकांची कमतरता, घटते सेंद्रिय कर्ब, पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे साचलेले क्षार यामुळे जमीन कडक होणे, नापीक होणे.

मातीचे आरोग्य बिघडण्याचे प्रमुख कारण आहे पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धूप, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर, एकच एक पीक वारंवार घेणे आदी. रासायनिक खतांमुळे जमीन खराब होते असे सर्रास बोलले जाते, हे सत्य नाही. रासायनिक खत हे पिकाचे अन्न आहे जे कमी मात्रेत अधिक अन्नद्रव्ये पिकाला हवे, तेव्हा उपलब्ध करतात. जमीन खराब होते रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धतीने वापर व शिफारसीपेक्षा जास्त वापरामुळे! खऱ्या अर्थाने मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याच्या जास्त वापरामुळे. पिकाला पाणी दिल्यानंतर ते पाणी पीक मुळावाटे हवे तेवढे शोषून घेते, बाकीचे जमिनीत साचून राहते. साचलेले पाणी मातीमधील हवा बाहेर काढून त्याची जागा घेते. वेळीच पाण्याचा निचरा नाही झाला तर पिकांच्या मुळांना हवा मिळत नाही. झाडाची वाढ खुंटते. साचलेल्या पाण्यात मातीतील क्षार विरघळतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते; मात्र पाण्यातील क्षार जमिनीवर मातीच्या कणात अडकून राहतात. म्हणून जास्त पाणी देणे कधीही घातक असते. 

मातीचे आरोग्य तपासणी करण्यासाठी शेतातून मातीचा योग्य पद्धतीने नमुना काढून तो प्रयोगशाळेत तपासून घेणे हे शेतकऱ्याचे पहिले कर्तव्य आहे. प्रयोगशाळेत मातीमधील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालशचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, मातीचा सामू, विद्युत वाहकता आदी घटकांचे प्रमाण, त्याला अनुकूल पीक व त्या पिकासाठी खताची शिफारस या बाबींची विस्तृत मातीची आरोग्यपत्रिका तयार करून शेतकऱ्याला दिली जाते. मातीचा सामू ६.५ ते ७.५ असल्यास पिकाच्या विकासासाठी आदर्श असतो. मातीतील सेंद्रिय कर्ब हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सेंद्रिय कर्ब हे मातीत राहून पिकाच्या वाढीसाठी अहोरात्र झटणाऱ्या जिवाणूंचे खाद्य असते. शिवाय सेंद्रिय कर्ब जर जास्त (१ टक्क्यापेक्षा जास्त) असेल तर जमिनीत पाणी चांगले मुरते, ओलावा टिकून राहतो, माती भुसभुशीत राहते. म्हणून चांगले कुजलेले शेणखत, लेंडीखत, गांडूळखत किंवा हिरवळीच्या खतांच्या रासायनिक खतांसोबत आवश्य डोस द्यावा. पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी १७ अन्नद्रव्याची गरज असते. नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नघटक बहुतांश शेतकरी वापरतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे दुय्यम अन्नघटक असून, शेतकरी यांच्या वापराकडे दुर्लक्ष करतात.युरियासारखे प्रचलित, स्वस्त खते वापरून शेतकरी पिकाचे आणि मातीचेही नुकसान करत आहेत. माती परीक्षण अहवालनुसार खते वापरल्यास मातीचे आरोग्य उत्तम राहीलच आणि उत्पादनसुद्धा वाढेल.

शेतातील काडी कचरा, गवत न जाळता मूलस्थानी पिकाच्या अवशेषाचे विघटन केल्यास सेंद्रिय कर्ब वाढू शकते. पाणलोट क्षेत्र विकासावर भर देऊन माथा ते पायथा योजना प्रभावीपणे राबवाव्या लागतील. शेतातील झाडांची संख्या घटत आहे. बांधावर, पाणलोट क्षेत्रात, गायरान आदी क्षेत्रांत वृक्षारोपण असेल तरच मातीची धूप थांबू शकेल. पिकाची फेरपालट करावी. मुगानंतर ज्वारी आणि सोयाबीननंतर गहू पेरावा. डाळवर्गीय पिके हवेतील नत्र शोषून जमिनीत स्थिर करतात जे पुढील पिकाला उपलब्ध होते व मातीतील अन्नद्रव्याचे संतुलन राखले जाते. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी संतुलित खत वापर अत्यंत गरजेचे आहे. माती हे अत्यंत दुर्लभ पण दुर्लक्षित संसाधन आहे, ही जागरूकता देशातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.

अशोक साकळे : ७७९०८९१२८८ 
(लेखक इफ्कोचे क्षेत्र अधिकारी आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...