Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

पर्यावरणाचे महत्त्व रुजविणारी "एईआरएफ'
अमित गद्रे
Sunday, July 19, 2015 AT 12:45 AM (IST)
अप्लाइड एन्व्हायर्मेंटल रीसर्च फाउंडेशन (एईआरएफ) ही संस्था देवरायांचे संवर्धन, पश्‍चिम उत्तर घाटातील जैविविधतेबाबत संशोधन, जैव इंधन तंत्रज्ञान विकास आणि प्रसाराबाबत कार्य करते. ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थांमध्येही पर्यावरण संवर्धनाबाबत जागृतीसाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात.

गाव परिसरातील पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीसाठी अप्लाइड एन्व्हायर्मेंटल रीसर्च फाउंडेशन (एईआरएफ) या संस्थेची स्थापना सन 1994 मध्ये डॉ. अर्चना गोडबोले आणि जयंत सरनाईक यांनी केली. संस्थेने देवराई आणि त्यातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती, पशुपक्ष्यांबाबत संशोधन आणि संवर्धनाबाबत काम सुरू केले. सरकारी संवर्धित जंगल परिसरात काम करण्यापेक्षा कोकण पट्ट्यात ज्या ठिकाणी खासगी जंगल आहे, जेथे देवरायांना संरक्षण नाही त्या गावांच्या मध्ये संस्थेने प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले.

गेल्या वीस वर्षांतील संस्थेच्या कार्याबाबत माहिती देताना डॉ. अर्चना गोडबोले म्हणाल्या की, "एईआरएफ' ही संस्था गाव परिसरातील देवराईचे संरक्षण आणि संवर्धन, पश्‍चिम उत्तर घाटातील जैविविधतेबाबत संशोधन, जैव इंधनासाठी उपयुक्त वनस्पतींबाबत संशोधन, दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन आणि संशोधन, गावकऱ्यांच्या सहकार्यातून गाव परिसरातील जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत उपक्रम राबविते. केरळ, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात संरक्षित जंगल आहे. मात्र आपल्या राज्यातील उत्तर- पश्‍चिम घाटात संरक्षित जंगले त्यामानाने मर्यादित आहेत. तरीही हा पट्टा जैवविविधतेच्या दृष्टीने वेगळा आहे. येथील वनस्पती, पशुपक्ष्यांच्या प्रजातीमध्ये विविधता आहे. आम्ही या घाटातील वनस्पती, पशुपक्ष्यांचा 20 वर्षांपासून अभ्यास करीत आहोत. जागतिक पातळीवर जैविविधतेच्या दृष्टीने उत्तर - पश्‍चिम घाट हा महत्त्वाचा "हॉट स्पॉट' आहे. त्या दृष्टीने संस्थेने आंतरराष्ट्रीय संस्थांचे येथील जैवविविधतेकडे लक्ष वेधले. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

देवराईचे संरक्षण आणि संवर्धन ः
संस्थेने गेल्या 20 वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्‍यात 280 देवरायांचे सर्वेक्षण पूर्ण केले. तसेच रत्नागिरी जिल्हातील इतर तालुके तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरायांचाही अभ्यास केला. कोकण पट्ट्यातील 150 गावांत ग्रामस्थांच्या मदतीने देवराई संवर्धन आणि विकासामध्ये संस्था कार्यरत आहे. संस्थेने या देवराईतील वनस्पती, पशुपक्ष्यांच्या प्रजातींचा अभ्यास करून ग्रामस्थांना याचे महत्त्व समजावून सांगितले. हवामान बदलाच्या काळात जंगलांचे महत्त्व कसे आहे, त्याचबरोबरीने या जंगलातून मिळणाऱ्या घटकांपासून उपजिविका कशा पद्धतीने करणे शक्‍य आहे याचीही माहिती संस्थेने देण्यास सुरवात केली. पर्यावरण संवर्धनाच्या बरोबरीने संस्थेने देवराई परिसर तसेच गाव परिसरातील पारंपरिक पद्धतीने जपलेल्या जलस्रोतांच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मोहीम राबविली. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यासाठी हे जलस्रोत उपयोगी ठरले. संस्थेने खासगी जमिनीवरील जंगल संवर्धनासाठी "माय फॉरेस्ट' हा उपक्रम राबविला आहे. संस्थेच्या या प्रयत्नातून खासगी उद्योग समूह आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने कोकणातील खासगी जंगल, देवरायांचे संवर्धन होत आहे.

ऊर्जा आणि जैव इंधनाबाबत जागृती ः
देवराई, पर्यावरण संवर्धानाच्या बरोबरीने याच परिसरावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्यासाठी शाश्‍वत आर्थिक विकासासाठी संस्था जैव इंधनाच्या दृष्टीने कार्य करीत आहे. गेल्या आठ वर्षांपासून संस्थेने जैव इंधनाच्या दृष्टीने उपयोग असणाऱ्या करंज, मोह, उंडी, सागरगोटा यासारख्या वनस्पतींचा अभ्यास केला आहे. संस्थेने सोनघर (ता. म्हसाळा), महाजने (ता. अलिबाग) येथे करंज तेल प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. तसेच ठाणे, भंडारा येथे मोहावर आधारित जैव इंधन प्रकल्पाची सुरवात झाली आहे. या प्रकल्पांना परिसरातील 40 गावे जोडली गेली आहेत. गावकरी करंज आणि मोहाच्या बिया गोळा करून या प्रकल्पाला देतात.

दुर्गम भागात वीजटंचाई ही कायमची समस्या. या भागातील लोकांना संस्थेने सौर कंदिलांचे वाटप केले. त्यासाठी एक मात्र अट अशी आहे की, इंधनासाठी जंगल परिसरातील करंज वृक्ष तोड बंद करणे. करंजाची तोड बंद केल्याने करंजाच्या बियांचे उत्पन्न मिळाले आणि सौर कंदिलामुळे दुर्गम भागातील धनगर वाड्यामध्ये प्रकाश पोचला.

शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग ः
संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी शाळेतील मुलांचाही सहभाग वाढवला आहे. मार्च ते मे या कालावधीत शालेय विद्यार्थी गाव परिसरातील विविध वनवृक्षांच्या बिया गोळा करून संस्थेकडे जमा करतात. संगमेश्‍वर, चिपळूण, दापोली तालुक्‍यातील 15 ते 20 शाळांच्या माध्यमातून वनवृक्षांच्या बिया गोळा करण्याचा उपक्रम राबविला जातो. परिसरातील वनवृक्ष आणि पर्यावरणाची माहिती असणारी भित्तीपत्रके शाळांच्या मध्ये लावण्यात आली आहेत. संस्थेचे कार्यकर्ते शालेय विद्यार्थांना परिसरातील देवराई, जंगलात नेऊन विविध वनस्पती आणि त्यांचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन करतात. यातून मुलांमध्ये परिसरातील वनस्पती, पशुपक्ष्यांच्या संवर्धनाविषयी जागृती होत आहे.

संस्थेने संगमेश्‍वर तालुक्‍यात कोसुंब, उजगाव आणि वाडा वेसराड या गावात स्थानिक वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्यासाठी रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेत दरवर्षी पाच हजार रोपे तयार केली जातात. या रोपवाटिकेत रक्तचंदन, बिवळा, बकूळ, मुचकंद, चांदाडा, कडूकवठ, काजरा, हिरडा, बेहडा, बिब्बा, रानबिब्बा यासारख्या देशी वृक्षांची रोपे उपलब्ध आहेत. ही रोपे गावकऱ्यांच्या सहकार्याने संरक्षित जंगलात लावली जातात तसेच विकतही दिली जातात.

हिरडा, बेहड्याचे संवर्धन आणि प्रमाणीकरण
कोकण आणि सह्याद्री पट्ट्यामधील देवराई संशोधन आणि संवर्धन, तसेच खासगी जमिनीवरील जंगल संरक्षणाचा कार्यक्रम राबविताना संस्थेला हिरडा- बेहडा या झाडांचे आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व लक्षात आले. गेल्या काही वर्षांत देवराई, जंगल आणि गाव परिसरातून हिरडा, बेहडा हे वृक्ष नाहीसे होत आहेत. हिरडा, बेहड्याला आयुर्वेदिक औषधी कंपन्यांकडून चांगली मागणी असते. स्थानिक लोक या परिसरातून हिरडा, बेहडा गोळा करून विकतात. परंतु त्यांना फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काही लोकांनी हिरडा, बेहडा हे वृक्ष लाकडासाठी तोडण्यास सुरवात केली. परंतु यामुळे गाव परिसरातील हिरडा, बेहडा नामशेष होऊ लागला. हे लक्षात घेऊन संस्थेने सह्याद्रीतील हिरडा- बेहडाच्या झाडांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली. हे प्रमाणीकरण फेयर वाइल्ड फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे करण्यात आले. या प्रमाणीकरणांतर्गत भीमाशंकर अभयारण्याच्या भोवतालच्या परिसरातील हिरड्याची झाडे आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील देवरायांमधील बेहड्याच्या झाडांची सविस्तर नोंद घेण्यात आली. या नोंदीमध्ये प्रत्येक झाडाचा घेर, उंची, फळे, फुले किती येतात याची माहिती संकलित केली. संबंधित गावकरी आणि ग्रामपंचायतीलाही याची माहिती देण्यात आली. संस्थेतर्फे संगमेश्‍वर तालुक्‍यातील कोसुंब, मोर्डे, उजगाव, विघ्रवली या गावातील लोकांना बेहडा आणि भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरातील ढगेवाडी, निगडाळे, तेरुंगण या गावातील लोकांना हिरडा गोळा करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. संस्था या लोकांना हिरडा आणि बेहडा वाळविणे, त्याची पूड करण्याबाबतही मार्गदर्शन करीत आहे. प्रमाणीकरणामुळे हिरडा, बेहड्याला चांगला दर मिळू लागला. गावकरी तसेच हिरडा, बेहडा गोळा करणाऱ्या लोकांनी प्रमाणीकरणाच्या दृष्टीने संस्थेच्या अटी पाळल्या आहेत. लोकांना उपजीविकेचे एक साधन मिळाले. त्यामुळे हिरडा, बेहड्याच्या झाडांचे संवर्धन होऊ लागले.

हॉर्नबील पक्ष्यांबाबत जनजागृती ः
उत्तर-पश्‍चिम घाटातील जंगलात ग्रेट हॉर्नबील, मलबार पाइड हॉर्नबील आणि मलबार ग्रे हॉर्नबील दिसतात. विशेषतः कोकणातील देवरायामध्ये यांचा चांगला अधिवास आहे. हॉर्नबील पक्ष्यांना गावकरी माडगरूड नावाने ओळखतात. गडद पिवळ्या चोचीचा, काळ्या-पांढऱ्या पंखाचा, रुबाबदार असा हा माडगरुड समुद्र किनाऱ्यापासून ते घाटमाथ्यापर्यंत सगळीकडे आढळतो. माडगरुडांना "जंगलाचे शेतकरी' असे म्हणतात, कारण माडगरुड विविध जंगली वनस्पतींच्या बिया खातात. या बिया त्यांच्या विष्टेतून जंगलात पडून रुजतात. त्यामुळे कडू कवठ, काजरा, दासवण या सारख्या दुर्मिळ वृक्ष प्रजाती जंगलाच्या विविध भागांत रुजलेल्या आपल्याला दिसतात. जंगलतोड आणि कमी होत चाललेल्या देवरायांमुळे माडगरुडांचीही संख्या कमी होत आहे. त्यामुळे देवराया आणि माडगरुड यांच्या संवर्धनासाठी संस्थेने गावकऱ्यांच्या सहकार्याने काम सुरू केले. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

संपर्क ः 020-25431870, एईआरएफ संस्था, पुणे 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: