पिकाचे सापळे.. शिवार ओस... नुसता ढगाळा !

सर्वदूर महिनाभरापेक्षा जास्त काळ पावसाची ओढ पैठण तालुक्‍यातील स्थिती सर्वाधिक भयावह खरिपाबरोबरच रब्बीवरही प्रश्नचिन्ह जायकवाडी वगळता बहुतांश प्रकल्प बंधारे तहानलेले ऑगस्टचा माध्यान्ह तरी नद्या-नाले कोरडेठाक
औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाबरोबरच रब्बीवरही प्रश्नचिन्ह
औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाबरोबरच रब्बीवरही प्रश्नचिन्ह

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या पैठण तालुक्‍यातील २१ गावातील शेतशिवाराचा फेरफटका मारला असता, चारदोन ठिकाणचे अपवाद वगळता पाण्याविना दम तोडणाऱ्या पिकांचे सापळे उभी असलेली शिवारं निर्मनुष्य होती. गावात चौकशीचा प्रयत्न केला तर आपली दखल घ्यायला कुणी सरकारचा माणूस आला की काय, अशी भावना झालेले लोक आशाळभूत नजरेने जमतात. व्यथा मांडतात. पिण्याचं पाणी, चारा, चरितार्थ, मुलांचं शिक्षण अशा अनेक बाबींसाठी त्यांचा सुरू असलेला संघर्ष सुन्न करणारा आहे. प्रशासन माहिती देऊनही दखल घेत नसल्याने शासनव्यवस्थेच्या अनास्थेविषयीही शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत चालल्याचे चित्र आहे.  

पैठण  तालुक्‍यातील आडूळ, रजापूर, देवगाव, थापटी,  तांडा, ब्राह्मगव्हाण, गेवराई (मर्दा), पारूंडी, पारूंडी तांडा, सुलतानपूर, कडेठाण, तुपेवाडी, बालानगर, खेर्डा, पुसेगाव, नानेगाव, दावरवाडी, नांदर, कुतुबखेडा, सालवडगाव, चोंढाळा, केकतजळगाव, पाचोड आदी गाव शिवारातील थोडंबहूत पाण्याची सोय असलेली चार दोन शेत वगळता सारा खरीप सुकून गेलायं. मुख्य पीक कपाशीला अकाली वृद्धत्व आलंय. पावसाबद्दल शेतकऱ्यांना विचारता, ‘‘कसला पावसाळा साहेब, आधी उन्हाळा आता नुसता ढगाळा, येतो वाटतंय, येतच नाही. जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात थोडाबहुत आलेला पाऊस वगळता तो बेपत्ता झाला तो पीक गेली तरी परतला नाही’’ हे शेतकऱ्यांचं सांगणं बरच काही सांगून जातं. 

प्रकल्पांची स्थिती  औरंगाबाद जिल्ह्यातील सुखना, लहूकी, गिरिजा, वाकोद, खेळणा, अंबाडी, गडदगड, पूर्णा-नेवपूर, अंजना पळशी, शिवना टाकळी, ढेंभापुरी, नारंगी, बोरदहेगाव या १३ मध्यम प्रकल्पांमध्ये २०१२ पासून २०१५ पर्यंत ऑगस्टमध्येच उपयुक्‍त पाणीसाठा नसण्याची स्थिती होती ती यंदाही कायम आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९० लघु प्रकल्पांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केवळ ६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात केवळ १ टक्‍काच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

खरीप पीककर्ज वाटप स्थिती  औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, व्यापारी व ग्रामीण बॅंकेच्या एकूण शाखांमधून ५ ऑगस्टपर्यंत यंदा केवळ ९४२४६ शेतकऱ्यांनाच खरीप पीक कर्जाचे वाटप केले गेले. २०१६ मध्ये ५ ऑगस्टपर्यंत ७४८ कोटी ६२ लाख ४० हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. यंदा मात्र १२०१ कोटी ७८ लाख ६६ हजार रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३२ टक्‍केच कर्जवाटप करण्यात आले आहे. 

पीकविमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण  ५ लाख ३१ हजार ८०२ शेतकऱ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ५४ शेतकऱ्यांच आपल्या खरीप पिकाचा वीमा उतरविता आला आहे. ४३ हजार ७४८ शेतकरी वीमा उतरविण्यापासून वंचितच आहेत.

पाऊस स्थिती यंदा १६ ऑगस्टपर्यंत ३८५.५९ मिलिमीटर पाउस पडणे अपेक्षीत होते प्रत्यक्षात केवळ सरासरी २२०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण केवळ ५७ टक्‍के आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ  ३२ टक्‍केच पाऊस पडला आहे. 

साडेतीन हजार हेक्‍टरवरील पीक मोडली औरंगाबाद जिल्ह्यातील ३४६५ हेक्‍टरवर पीक मोडल्याची नोंद आहे. हे सर्व क्षेत्र पैठण तालुक्‍यातील आहे. यामध्ये २२०० हेक्‍टरवरील कपाशी, १२२६ हेक्‍टरवरील मूग व ३९ हेक्‍टरवरील उडदाच्या क्षेत्राचा समावेश आहे.   पावसाच्या दडीने स्थिती बिकट

  •  पैठण तालुक्यात पावसाचा खंड ५० ते ६० दिवसांवर 
  •  तुरळक व हलका पाऊस वगळता महिनाभराचा खंड सर्वदूरच 
  •  केकतजळगावच्या ग्रामसभेने घेतला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचा ठराव
  •  ऑगस्टच्या तेरा दिवसांत पाच शेतकऱ्यांनी संपविले जीवन
  •  शेततळी तयार परंतु पाण्याचा थेंबही साठला नाही.
  •  जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर  
  •    पीकनिहाय उत्पादनात घट (आता पाऊस आला तर)

  • कपाशी उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट निश्‍चित
  • तुरीतही ४० ते ५० टक्‍के घटीचा अंदाज 
  • मका उत्पादनात ४० ते ५० टक्‍के घट
  • सोयाबीनमध्ये ४० ते ५० टक्‍के घटीचा अंदाज
  • पैठण, गंगापूर सोयगाव तालुक्‍यात मूग, उडदात ७० टक्के घट 
  •  हलक्‍या जमिनीतील खरिपाची संपूर्ण पिके संपल्यात जमा.  
  • शासनाकडून दखल नाही

    पैठण तालुक्‍यातील पारूंडी, केकतजळगाव शिवारातील खरिपाची पिकचं नाही तर बागाही संपल्या आहेत. पाण्याशिवाय शेती नाही म्हणून लाखोचा खर्च करून केलेल्या पाइपलाइन, ठिबक संच निरुपयोगी ठरले आहेत. पिकाच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची पंधरवडा उलटूनही दखल नाही. आता पाऊस आला तरी पोळ्यापर्यंत कशीबशी जनावरं सांभाळायची. शासनानं दखल घेऊन त्यांच्या चाऱ्याची सोय केली तर ठिक नाय तर ती सोडून देण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  तालुकानिहाय प्रत्यक्ष पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

    तालुका    पाऊस    टक्‍का औरंगाबाद    २०७.५५     ५४.४ फुलंब्री     २८३.७५    ७३.८४ पैठण    १०६.५८    ३०.९८ सिल्लोड    ३३०    ८२.२९ सोयगाव    १९३.९८    ४२.३० वैजापूर    २३२.३०    ८९.०९ गंगापूर    १५३.२१    ४७.६७ कन्नड    २८६.८५    ६४.७१ खुलताबाद    १८२.३२    ३९.४८

    दृष्टिक्षेपात औरंगाबाद जिल्हा

  •  खरिपाचे क्षेत्र (उस वगळता) : ६ लाख ८३ हजार ३७५ हेक्‍टर
  •  ३१ जुलैपर्यंत पेरणी झालेले क्षेत्र : 
  •  ६ लाख ७३ हजार ७९० हेक्‍टर
  •    पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र  पीक                     क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) खरीप ज्वारी            १४९८ बाजरी                   ३०३१९ मका                     १७६२८९ इतर                       १९२८ तूर                        २९१५९ मूग                       १४४२० उडीद                   ५३९६ इतर                      १००० खरीप भुईमूग          ५८४५ खरीप तीळ               ५१ खरीप सूर्यफूल           ०८ सोयाबीन                ११५२६ इतर                      १४५५ कापूस                   ३९४८९६

    आधी चार वर्षांचा दुष्काळ, एक सालं बर आता पुन्हा पिकं गेली. जगणंच अवघड होऊन बसलं. शासन प्रशासनव्यवस्थाबी लक्ष देईना. कळवूनही कुणी पाहणी करेना. कशी व्यवस्था आहे म्हणावं ही जनसेवेची. - योगेश नलावडे, शेतकरी, पारूंडी, ता. पैठण https://www.youtube.com/watch?v=kPYW23zu7fg

    वाहून नाय आला पाणी शेतातून, त्यावर उगवलं. जो गेला तं जळून गेलं पणं आलां नायं. आता बी येतं का नायं कायं सांगाव, असं साल पाह्यलं नायं. प्यायला पाणी नाय, जनावरांना चारा नाय, अन पिकं बी गेली. - मुरली नजन, शेतकरी, कुतुबखेडा. ता. पैठण

    २७ जूनपासून पाऊस नाही. आता पाऊस आला तं कपाशी, तूर येईल थोडीबहुत. पणं शेवटी पाऊस येण्यावरच सारं खरिपाचं गणित अवलंबून आहे. - दादासाहेब ठोंबरे, शेतकरी, सालवडगाव.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com