सोच बदलिए, शौचालय बनाइए

उघड्यावरील मलमूत्र विसर्जनाने अनेक संसर्गजन्य आजार बळावत आहेत. परिसरातील जलसाठे, पर्यावरणाचे प्रदूषण वाढत आहे.
सोच बदलिए, शौचालय बनाइए

स्वच्छ भारत अभियान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. गाव-शहर परिसर कचरामुक्त ठेवण्यापासून उघड्यावर शौचास प्रतिबंध करण्यापर्यंत या अभियानांतर्गत प्रबोधन केले जाते. केवळ प्रबोधनच नव्हे तर या अभियानांतर्गत वैयक्तिक कुटुंबासाठी तसेच सामुदायिक शौचालये उभारून २ ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत देशात कोणीही उघड्यावर शौचास जाणार नाही, असा संकल्प करण्यात आला आहे. खरे तर हे अभियान सुरू होऊन आता लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील, परंतु आजही देशातील अनेक खेड्यांमध्ये घरामध्ये शौचालय नसल्यामुळे पुरुष तसेच माता भगिनींना उघड्यावर शौचास जावे लागते. काही ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत, परंतु पाण्याअभावी तसेच नियमित साफसफाई नसल्यामुळे त्यात घाणीचे साम्राज्य पसरल्याने त्यांचा वापर होत नाही. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नसल्यामुळे मुलींची कुचंबणा होते. विशेष म्हणजे प्रत्येत कुटुंबाकडे शौचालय असावे आणि त्याचा वापर व्हावा म्हणून १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. शौचालय नसेल तर काही सरकारी योजनांचा लाभही नाकारला जात आहे. स्वच्छ भारत अभियानांला अनेक नामांकित व्यक्ती, संस्था जोडून शौचालयाच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे. अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. असे असताना शौचालय बांधण्यासंदर्भात प्रामुख्याने ग्रामीण भागात उदासीनता दिसून येते, हे वास्तव आहे. स्वच्छ भारत अभियानाशी जोडलेली थीम घेऊन अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकरांची भूमिका असलेला ‘टॉयलेट ः एक प्रेमकथा’ हा चित्रपट नुकताच आला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांना हा चित्रपट सामुदायिकरित्या दाखविला जात आहे. काही ठिकाणी पालकमंत्री ग्रामीण महिला पुरुषांना चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जात आहेत. शौचालय तसेच स्वच्छतेचे महत्त्व लोकप्रतिनिधींसह लोकांनाही कळावे, हाच त्यामागचा उद्देश. महिलांचा आत्मसन्मान आणि सर्वांचेच आरोग्य असा सामाजिक विषय निवडलेल्या या चित्रपटाला लोकांचीही चांगली पसंती मिळत आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने १०० कोटीहून अधिक कमाई केली, यात बरेच काही आले. मंगळ असल्याने लग्न जुळत नसलेल्या मुलाच्या (चित्रपटातील नायक) आयुष्यात जवळच्या गावातील सुशिक्षित मुलगी येते. अनेक क्‍लृप्त्यांनंतर दोघे विवाहबद्ध होतात. परंतु घरात संडास नसल्याने लग्न मोडण्याची वेळ येते. असा एकंदरीत या चित्रपटाचा कथानक आहे. खरे तर ग्रामीण भागातील वास्तवाशी खूपच जवळ जाणारा हा विषय आहे. अनेक मुली नवऱ्याघरी संडास नसल्याने लग्नाला नकार देत आहेत. समस्येच्या गांभीर्यातून हा विरोध होत आहे, त्याचा सन्मान करायला हवा. उघड्यावर शौच हा केवळ महिलांच्या कुचंबणेचा विषय नसून सर्वांच्या आरोग्याशी निगडित हा विषय आहे. उघड्यावरील मलमूत्र विसर्जनाने अनेक संसर्गजन्य आजार बळावत आहेत. परिसरातील जलसाठे, पर्यावरणाचे प्रदूषण वाढत आहे. देशात अजूनही अनेकांना उघड्यावर संडासला जावे लागण्यास नागरिकांबरोबर शासन-प्रशासनही जबाबदार आहे. लोकांनी आपली सोच बदलून शौचालय बांधण्यासाठी पुढे यायला हवे. शासन-प्रशासनाने हा विषय अधिक गांभीर्याने घेऊन कामाला लागायला हवे. लोकप्रतिनिधींनी चित्रपटातून प्रेरणा घेऊन का होईना, वैयक्तिक तसेच सार्वजनिक संडास बांधण्याची योजना नेटाने पुढे न्यायला हवी. प्रशासनानेही अधिक पारदर्शकतेने आणि गतिमानतेने स्वच्छ भारत अभियानांतर्गतचे उपक्रम राबवायला हवे. असे केले तरच पुढील दोन वर्षांत या अभियानाचा संकल्प सिद्धीस जाईल, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com