गुजरात तरले; हिमाचल जिंकले

गुजरात तरले; हिमाचल जिंकले
गुजरात तरले; हिमाचल जिंकले

नवी दिल्ली/ अहमदाबाद/ सिमला : देशासह जगाचेही लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले. अपेक्षेनुसार भाजपने गुजरातचा गड राखण्यात यश मिळविले आहे, तर हिमाचलमध्ये निर्भेळ यश मिळविले आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची, तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती.

सोमवारी मतमोजणीला सुरवात झाल्यावर सुरवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपने आघाडी मिळवली. रात्री ९ वाजता गुजरातचे निकाल स्पष्ट झाले यामध्ये भाजपला ९९ जागा मिळाल्या. तसेच हिमाचलमध्येही मोठी आघाडी असल्याने दोन्ही राज्यांत भाजप सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले आहे.

गेल्या २२ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजप सत्तेवर आहे. जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेलच्या मदतीने भाजपचा पराभव करायची काँग्रेसची रणनीती होती. त्यासाठी राहुल गांधी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यंदाच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रितरीत्या ६४ सार्वजनिक सभा घेतल्या. भाजपने ३४ तर काँग्रेसने ३० सार्वजनिक सभा घेतल्या.

एकूण महिला मतदारांची संख्या ४८ टक्के तरी आत्तापर्यंत गुजरातमध्ये केवळ एकदाच महिलेने मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. १८२ पैकी केवळ ११ जागी भाजपने तर १० जागी काँग्रेसने महिलांना उमेदवारी दिली होती. पहिल्यांदाच पूर्णपणे महिलांनी एखाद्या मतदार केंद्रावर सर्व जबाबदारी पार पाडली. यंदा ६८.७० टक्के मतदान झाले. २०१२ मध्ये हाच आकडा ७१.३२ इतका होता. म्हणजे यंदा मतदानाची टक्केवारी २.९१ टक्क्यांनी घसरली.

जिग्नेश मेवानी यांचा दणदणीत विजय गुजरातमधील दलित आंदोलनाचा चेहरा असलेला युवा नेता जिग्नेश मेवानी यांनी २१ हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बनासकंठा जिल्ह्यातील वडगाम-११ या विधानसभा मतदारसंघातून जिग्नेश मेवानी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जिग्नेशने ट्विट करत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेससाठी आशेचे किरण असणारे जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरवातीपासून आघाडी घेतली होती. जिग्नेश मेवानीला आपचाही पाठिंबा होता.

'ईव्हीएम'मुळे जिंकलेल्या भाजपला शुभेच्छा : हार्दिक पटेल गुजरात निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे 'ईव्हीएम'चे आहे, अशा शब्दात पाटीदार नेता हार्दिक पटेल याने भाजपवर टीका केली. अहमदाबाद, सुरत, राजकोट येथे पाटीदार मतदार जास्त असलेल्या भागातदेखील भाजपचे उमेदवार निवडुन येण्यावर देखील हार्दिकने प्रश्न उपस्थित केला. गुजरात निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामागे कुणी चाणक्य नसून या यशाचे कारण पेसा आणि भाजपद्वारे केला गेलेला अपप्रचार आहे.

आता १९ राज्यांत भाजप भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याचा नारा दिल्यानंतर एकापाठोपाठ एक विजय मिळविण्यास सुरवात केली. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्या वेळी भाजपकडे 7 राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून 19 झाली आहे. तर, काँग्रेसकडे 13 राज्ये होती आता ती संख्या अवघ्या 4 वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

गुजरात प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी शेतकरी, मच्छीमार व व्यावसायिकांच्या मु्द्द्यांवर भर दिला होता. भाजपला काँग्रेसने जोरदार टक्कर दिल्याचे बोलले जात आहे. 182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते.

पंतप्रधानांच्या जन्मगावातच भाजपचा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवलं असलं तरी त्यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यातच अनपेक्षित धक्का बसला आहे. मोदींचे जन्मगाव वडनगर हे उंझा मतदारसंघात येतं. त्याच मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या जागेवर काँग्रेसच्या आशा पटेल या निवडून आल्या आहेत.

निवडणुकीतील निर्णायक फॅक्टर्स

  • नरेंद्र मोदी यांचा सी प्लेन दौरा
  • राहुल गांधी यांनी १२ हिंदू मंदिरांना दिलेली भेट
  • हार्दिक पटेल यांची वादग्रस्त सीडी
  • ‘विकास जिंकला’ भाजपने प्रतिष्ठेच्या लढतीत गुजरातचा गड राखलाय आणि हिमाचल प्रदेशचं शिखर सर केलंय. या दोन्ही ठिकाणी भाजपचा झालेला विजय हा विकासाचा विजय अाहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ‘जीता विकास, जीता गुजरात... जय जय गरवी गुजरात,’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

    सर्वांचा मी आभारी असून, आपल्याबद्दल मला अभिमान आहे. या निकालांमुळे मी निराश झालो नसून, आपण सर्वांनी हे दाखवून दिले आहे, की काँग्रेसची शक्ती ही सन्मान आणि धैर्याने लढा देण्यात आहे. - राहुल गांधी , काँग्रेस अध्यक्ष

    कोणी काहीही पेरलं तरी त्यांना गुजरातमधील नागरिकांनी मोठी चपराक दिली आहे. २२ वर्षांपासून येथील जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास कायम आहे. - देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री

    पंतप्रधानांच्या नीतीचा हा विजय आहे. जातियवाद झुगारून लोकांचे विकासाला मत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजप सरकार स्थापन करणार, जनतेचे अभिनंदन. - अमित शहा , अध्यक्ष, भाजप

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com