पोळ्याच्या सजावटीला हवीच वेसण भरजोर

माझ्या कुटुंबातील सर्व सहा सदस्य या दीड दोन महिन्यांच्या कालावधीत वेसण निर्मितीसाठी राबतात. पूर्वीइतकी जनावरे नसल्याने मागणी कमी होत असली तरी शेतकऱ्यांची बैलासाठी जिव्हाळ्याची भावना कमी झालेली नाही. पोळ्याला नवी वेसण घालण्याची व सजावट करण्याची परंपरा कायम आहे. त्यामुळे थोडी आशा आहे. - शेख पीर महम्मद शेख नूर महम्मद, वेसण कारागीर, कारंजा घाडगे, जि. वर्धा
कारंज्याच्या खर्डीपुऱ्यात बनते उत्तम दर्जाची वेसण
कारंज्याच्या खर्डीपुऱ्यात बनते उत्तम दर्जाची वेसण

कारंज्याच्या खर्डीपुऱ्यात बनते उत्तम दर्जाची वेसण  कारंजा घाडगे (ता. जि. वर्धा) येथील खर्डीपुरा भागातील कुटुंबे वेसण निर्मितीचा कौशल्यपूर्ण व कष्टाच्या व्यवसायात आहेत. हे सर्व कुटुंबीय श्रावणी पोळ्याच्या दृष्टीने आधी दोन ते अडिच महिने अहोरात्र राबत असतात, तेव्हा आपल्या बैलाच्या सजावटीसाठी उत्तम दर्जाची वेसण तयार होते. 

कृषी संस्कृतीमध्ये शेती आणि बैल यांची सांगड अविभाज्य आहे. या शेतकऱ्यांच्या व बैलांच्या दैनंदिन कष्टाच्या आयुष्यामध्ये पोळा या सणाला फार महत्त्व दिले जाते. बैल रंगवून, त्याची सजावट केली जाते. नवी वेसण घातली जाते. उत्तम दर्जाची वेसणीला शेतकरी प्राधान्य देतात. उत्तम दर्जाची वेसण तयार करण्याचा व्यवसाय रुजला आहे, तो वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे या गावात. त्यातील शेख इसाक यांचे कुटुंबीय तीन पिढ्यांपासून या व्यवसायात आहेत.   पूर्वी या व्यवसायामध्ये १० ते १२ कुटुंब कार्यरत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बैलांचे घटते प्रमाण आणि कमी होत गेलेली मागणी यामुळे रोजगाराचे अन्य पर्याय धुंडाळावे लागत आहेत. आता केवळ खर्डीपुरा भागातील पाच कुटुंब या व्यवसायात राहिली आहेत.   पावसाळ्यात अन्य मजुरीची कामे राहत नाही; त्यामुळे रोजगाराचे साधन म्हणून या काळात शेख इसाक यांच्यासह शेख पीर महम्मद शेख नूर महम्मद, शेख रहूम शेख करीम, शेख रफीक शेख गुलजार यांचे परिवारदेखील याच हंगामी व्यवसायात आहे. इतरवेळी गाद्या तयार करण्यासह अन्य कामे करतात.

वेसण तयार करण्याची प्रक्रिया

  • सुतगिरण्यांमध्ये टाकाऊ ठरलेल्या सुताला मागणी राहत नाही. अशाप्रकारचे सुत फुलांचे हार तयार करणारे विक्रेते टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून खरेदी करतात. अशा विक्रेत्याकडून वेसण तयार करण्यासाठी सुताची सुमारे ७५ ते ८० रुपये किलो दराने खरेदी केली जाते. 
  •  खरेदीनंतर धाग्याची सफाई होते. त्यानंतर विणकामगारांप्रमाणे धाग्यापासून कांडी, पराट, गाभा व शेवटच्या टप्प्यातील विणकाम होऊन वेसण तयार केली जाते. 
  •  पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया म्हणजे गाभा. हा गाभा तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारची लाकडी फ्रेम उपयोगात आणली जाते. वेसणची फिनिशिंग करण्यासाठी खास लाकडी चिपडीचा उपयोग होतो. 
  •  एका वेसणच्या भोवती दोन ते तीन गाठी (सुताचे विशिष्ट थर) माराव्या लागतात. त्यानंतर जाडजूड वेसण तयार होते.
  •  तीन ते साडेतीन फुटांची वेसण तयार करण्याची प्रक्रिया दिसायला सोपी वाटत असली तरी हे काम अतिशय चिकाटीचे, कौशल्याचे असते.
  •  एक वेसण तयार करण्याच्या प्रक्रियेत सुमारे तीन माणसांची गरज भासते.
  •    असा आहे खर्च

  •  जनावरांच्या आकारानुसार वेसण छोटी-मोठी लागते. एक वेसन तयार करण्याकामी १०० ते १५० ग्रॅम सूत लागते. 
  •  कुटुंबातील सर्वच सदस्य या कामात राबत असल्याने मजुरीवरील खर्चात बचत होते. गरज पडल्यास बाहेरील मजूर घेतले जातात. त्यांच्या कौशल्यानुसार मजुरी ठरते. विणकामाची साधारणपणे दोन रुपये प्रति वेसण मजुरी दिली जात असल्याचे शेख इसाक यांनी सांगितले. 
  •  हंगामात सकाळी सहा वाजता सुरू झालेले हे काम रात्री साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत चालते. 
  • अशी आहे बाजारपेठ

  •  पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैल असत. त्यांच्यासाठी वेसण खरेदी होत असे. मात्र, अलीकडे बैलांचे प्रमाण कमी होत आहे. वाढत्या यांत्रिकीकरणाचा फटका या व्यवसायाला बसत असून, एकेकाळी २० क्विंटलपर्यंत असलेली मागणी अलीकडे १० क्विंटलपर्यंत घसरली असल्याचे शेख इसाक यांनी सांगितले. 
  •  नागपूर येथील व्यापाऱ्यांकडून कारंजा येथील वेसणीला मागणी राहते, असे ते सांगतात. मध्य प्रदेशातील पांढूर्णा, तिगांव, मारुड, सावनेर, काटोल, कोंढाळी, बांगडापूर, तेलकामठी, नरखेड, मोहाड, कारंजा घाडगे, गोंडी मोहगाव, ठाणेगाव येथील व्यापारीदेखील वेसण येथूनच खरेदी करतात. २७० रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळतो. 
  •  किरकोळ व्यापारी प्रती जोडी (वजनाप्रमाणे) ४० ते ५० रुपयांना त्याची विक्री करतात. एका किलोत आकारमानानुसार १० ते १२ जोड बसतात. येथील मालाचा दर्जा तुलनेत चांगला असल्याने व्यापारी येथे शोधत येतात, असे ते सांगतात. 
  •  नागपूरच्या बुटीबोरी, फुकटनगर, महाकाळ नगर, काटोल यासह मध्य प्रदेशातील लोधीखेडा या ठिकाणी देखील वेसण निर्मितीचे काम होते.
  • मागणी घटल्याने तडव निर्मितीही थांबली खर्डीपुऱ्याचा परिसर पूर्वी तडव (शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्रीप्रमाणे आवरण) निर्मितीसाठीही प्रसिद्ध होता. त्यासाठी सिमेंटची पोती व अन्य साधनांचा वापर होई. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध आकाराचे तडव तयार केले जात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ताडपत्रींची उपलब्धता वाढत गेली. पर्यायाने तडव वापरण्याचे प्रमाण कमी झाले. मागणी नसल्याने हा व्यवसाय बंद झाला. तसाच प्रकार वेसण निर्मितीबाबत होण्याची भीती या कारागीर कुटुंबीयांमध्ये असल्याचे शेख इसाक सांगतात. पर्यायाने तडव वापरण्याचे प्रमाण कमी झाले. मागणी नसल्याने हा व्यवसाय बंद झाला. तसाच प्रकार वेसण निर्मितीबाबत होण्याची भीती या कारागीर कुटुंबीयांमध्ये असल्याचे शेख इसाक सांगतात.

       असे आहे या व्यवसायाचे इंगित...

  • एका वेसणसाठी १०० ते १५० ग्रॅम सूत लागते.
  • टाकाऊ सूत ७५ ते १०० रुपये किलोप्रमाणे मिळते.
  • एक वेसण तयार करण्यासाठी तीन व्यक्‍तींची गरज. वेसण तयार करण्याच्या टप्प्यानुसार कारागीराला मिळते मजुरी.
  • व्यापाऱ्याकडून वेसणला मिळणारा दर - २७० रुपये प्रति किलो.
  • एका किलोत आकारमानानुसार बसतात १० ते १२ जोड. 
  • किरकोळ विक्री - ४० ते ६० रुपये प्रति जोड.
  • व्यापाऱ्यांद्वारे होते थेट जागेवरूनच खरेदी.
  • कारंजा येथील वेसणला नागपूरसह मध्य प्रदेशातूनही मागणी. अनेक व्यापारी करतात थेट जागेवरून खरेदी. 
  • : शेख इसाक, ९५५२२६६७३८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com