Pongal, Bailpola | Agrowon

बैलांच्या खांद्यावर शेतीचे ओझे
रमेश चिल्ले
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पेरणी असो की कोळपणी, नांगरणी, वाहतूक असो बैलांनी साथ दिली तरच शेती उत्तम पिकते. शेतीच्या उत्पादनात बैलाचा वाटा मोठा आहे. वर्षभराच्या कामातून त्याला विश्रांती देऊन त्याने केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा शेतकऱ्यांचा एक अल्पसा प्रयत्न म्हणजे बैलपोळा होय.

पेरणी असो की कोळपणी, नांगरणी, वाहतूक असो बैलांनी साथ दिली तरच शेती उत्तम पिकते. शेतीच्या उत्पादनात बैलाचा वाटा मोठा आहे. वर्षभराच्या कामातून त्याला विश्रांती देऊन त्याने केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा शेतकऱ्यांचा एक अल्पसा प्रयत्न म्हणजे बैलपोळा होय.

पोळा हा सण सगळीकडे एकाच दिवशी साजरा होत नाही. त्या त्या परिसरातील शेतीच्या हंगामानुसार तो असतो. काही ठिकाणी जेष्ठामध्ये हा सण साजरा करतात. दक्षिणेत आंध्र, तमिळनाडू, केरळात हाच सण बेंदूर या नावाने साजरा केला जातो. तिथे भात लावणीचा हंगाम संपला की हा सण येतो. मध्य महाराष्ट्रात आषाढात एक दिवस ठरलेला असतो. सोलापूर, मराठवाडा व कर्नाटकातल्या काही भागात श्रावणातल्या अमावस्येला पोळा सण साजरा करतात. कदाचित शेतीच्या मशागतीचा, पावसाचा व पेरणीचा विचार ध्यानात घेऊन शेतकऱ्यांनी तो मागे-पुढे केलेला असावा. दिवस कोणताही असो पशुसाठी एक दिवस राखून ठेवण्याचे स्मरण आपल्या कृषी संस्कृतीला झाले हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात बैलाचे स्थान ट्रॅक्‍टर, मळणीयंत्र, पेरणी यंत्राने घेतल्याने तसेच चारा पिकाच्या कमतरतेमुळे व शेतीच्या विभाजानामुळे शेती एकर दोन एकरात विभागली गेली आहे. प्रत्येक छोट्या शेतकऱ्याला बैल ठेवणे, त्यासाठी गडी ठेवणे आता परवडनासे झाले आहे. आताच्या परिस्थितीत केवळ चाळीस टक्के शेतकऱ्याकडे बैल राहिले आहेत. पूर्वी मारुतीला बैल फिरवायला, दोन-तीन तास लागत असत. मागच्या वर्षी माझ्या गावी पोळ्याला बैल फिरवताना केवळ अर्धा तासात सगळे बैल जिकडे-तिकडे झाले. तेवढी गर्दी आढळून आली नसल्याने लहानपणाच्या पोळ्याची रौणक डोळ्यासमोरून हालता हलत नव्हती. मुद्दाम पोळ्याला कोण चांगले बैल ठेवतो याबाबत चर्चा होत असे. बैलाच्या सांभाळण्यावर शेतकऱ्याचा गावात सत्कार केला जात असे. जिल्हा, तालुका व राज्य पातळीवरील प्रदर्शनात बैलांना बक्षिसे दिली जात असत. आता दुष्काळ, अवर्षणामुळे चारा कमी झाला आहे. खुराक देऊन कोणी बैल ठेवीत नाहीत हे सगळे अभावानेच पहायला मिळते अन्‌ दुःखही वाटते की बैल हे पशुधन लुप्त तर नाही होणार? 

शेतीतील बैलाची सेवा इतर प्राण्यांपेक्षा अधिक मोलाची म्हणावी लागेल. बैल हा खेड्यातल्या प्रत्येक अडचणीवरील उपाय आहे. खेड्यातील नित्य आणि अनित्य अशा जीवनाला आपला खांदा देणारा हा शेतकऱ्यांचा जिवलग मित्र आहे. औत, नांगर, कुळवणी, चारा, खते, शेतमाल ने-आण करण्यासाठी त्याचीच मदत होते. पूर्वीच्या काळात दवाखान्याला, रुग्णाला ने-आण करण्यासाठी व वऱ्हाडी मंडळीसाठी बैलगाडीच होती. मुऱ्हाळी म्हणून नववधूला किंवा लग्न समारंभाला बैलगाड्या सजवून छत घालून, बैलांना झुली, घुंगरमाळा घालून धुरभरण्या पांदी-शेत रस्त्याने जाण्याची मजा काही औरच. यासाठी बैलगाडीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पूर्वी आंबाड्यापासूनच्या गोंडे, मटाट्या, म्होरक्‍या, कासरे, दावे बनवित. त्यांना वेगवगळे रंग आणून रंगवीत. आता त्या लोकर व सुतापासून केलेल्या रंगीबेरंगी मटाट्या-गोंडे शहरातल्या दुकानात मन वेधून घेतात. त्या काळात बैलांना साबणाने धुवून, पाण्यात पोहणी घालून त्यांना अंडी, तेल पाजून, तुकतुकीत करीत. शिंगे तासून आकार देत. शेपटीची गोंडे कापून वेगवेगळी नक्षी करीत. शिंगांना वारनिश लावून अंगावर रंगीत छापे मारून सजवीत. आत्ताही राज्यातील बहुतांश गावात ही प्रथा चालूच आहे. पोळ्याचा पहिला दिवस म्हणजे बैलाच्या वर्षभर ज्या खांद्यावर जू ठेवून औत, नांगर टाकून, गाडी ओढून तो सुजायचा. त्यावर घट्टे पडतात, रक्त निघते त्या खांद्याला हळद व लोणी लावून चोळले जाते. म्हणजे त्याची सूज, दाह कमी होते. हळदीत औषधी गुणधर्म असल्याने जखम लवकर बरी होते. बैलांना आराम पडतो म्हणून त्या विधीला खांदे मळणी असे म्हणतात. मग गुळाच्या पाण्यात तेल टाकून त्यांना पाजले जाते. त्याला गुळवणी पाजणे असे म्हणतात. त्यामुळे पोट साफ होते. खिचडा, खीर ही रात्री खाऊ घातली जाते. अंगावरची गोचीडे, घाण काढली जाते. दोन-तीन दिवस सतत धुतल्याने तो स्वच्छ व तजेलदार होतो. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे पोळ्याला त्याला घुंगरमाळा, गोंडे गळ्यात घालून, मेंढ्यांच्या काळ्या लोकरीची कंडे गळ्यात पोटावर व पायात बांधले जातात. त्यामुळे कुणाची दृष्ट लागत नाही. पांढऱ्या बैलाला ही काळी कंडे फारच शोभून दिसतात. अन्‌ लाल बैलांनाही साजरे दिसत. असा थाटामाटात हलगीच्या वाद्यवृंदाने वाजवत मुख्य वेशीतून गावात मंदिराभोवती फिरवून तिथे त्यांची पूजा करून मग घरची पूजा होते. त्या दिवशी शेतातील नांगर, कुळवाचे फास फारूळे, जनावळ्याच्या विड्या, तिफणीचे वाटी, चाते, जू धुवून त्यांना गेरू चुना लावून अंगणात मांडून बैलाच्या शेपटीच्या केसापासून बनवलेली दोरी त्यावर ठेवून पूजा केली जाते. बैलाचा गोठा सारवून त्यावर रंग चुना लावून गेरू चुण्यापासून भिंतीवर बैल, फास, फारूळे, सूर्य, चंद्राची चित्रे काढून गोठाही सजवला जातो. गुरांची, बैलांची बांधायची दावे, म्होरक्‍या, वेसणी बदलल्या जातात. त्या नव्या घातल्या म्हणजे तुटत नाहीत. गोठ्यात गोचीडे डास-माशांसाठी औषधी टाकून तो रोगमुक्त केला जातो. जेणेकरून बैल-गाई-गुरांचे आरोग्य चांगले राहावे. पाण्याचे हौद, टोपले स्वच्छ करून त्यातून पेंड चारली जाते. पाणी स्वच्छ निर्जंतुक पिल्याने सहसा बैलांना कुठला आजार होत नाही. कृषी संस्कृतीतील हत्यारे धुवून, रंगवून मनोभावे पुजली जातात. म्हणजे शेतीत वापरावयाची अवजारे, इखनांची व बैलाची मनोभावे पूजा करून संध्याकाळी बैलांना झुली घालून मारुतीच्या मंदिराभोवती फेरी मारून घरी आणून मालकीण-मालकांच्या हस्ते हळद-कुंकू लावून ओवाळून गोड पुरणाच्या पोळीचा घास भरवला जातो. शिंगात गोल कोडबळे अडकावले जाते. मगच दिवसभराचा उपवास मालक सोडतो. म्हणजे बैलासाठीच्या कृतज्ञतेचा, त्याच्या उपकाराची परतफेड करण्याचा हा दिवस. वाजत-गाजत नवरदेवागत मिरवल्यानंतर गायीबरोबर त्याची पूजा केली जाते. त्यावेळी घरादाराला आंब्यांच्या पानांची तोरणे बांधली जातात. मुलं गोंड्याची चाबकं रंगवून वाजवतात. गड्याला मालक नवे कपडे देतो. बैलाला भरपूर आयुष्य लाभावे. त्याची प्रकृती उत्तम राहावी म्हणून मनोभावे देवाकडे प्रार्थना केली जाते. कारण बैलाच्या जिवावरच शेतीचा डोलारा उभा असतो. तो ऊन, पाऊस, थंडी चिखलात शेतीच्या मशागतीची कामे करतो म्हणूनच धनधान्य व्यवस्थित उगवून घरादाराला बरकत येते. पेरणी असो की कोळपणी, नांगरणी बैलांनी साथ दिली तरच शेती उत्तम पिकते. म्हणजे शेतीच्या उत्पादनात बैलांचा वाटा मोठा आहे.

- रमेश चिल्ले
 : ९४२२६१०७७५
(लेखक शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)
 

इतर संपादकीय
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
मेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...
थेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...
बँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार! बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...
इडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...
शेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....
"आशा'कडून न होवो निराशा! "आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
बीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...
साखरेचा वाढला गोडवाशेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या...
धरणात गाळ आणि गाळात शेतकरीजगणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून...