ऊस बेणे मळ्याने दिली आर्थिक सक्षमता

दुष्काळ हीच मानली संधी तीन-चार वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात गाव परिसरात अनेकांनी उसाची शेती थांबवली. त्यामुळे उसाची टंचाई निर्माण झाली. अशावेळी बेणेनिर्मिती हीच मुख्य संधी पुढ्यात दिसली. मग त्यावरच लक्ष केंद्रित केले, असे काळे म्हणाले.
साईनाथ काळे यांचा ०८०००५  या ऊस जातीचा बेणे प्लॉट
साईनाथ काळे यांचा ०८०००५ या ऊस जातीचा बेणे प्लॉट

नगर जिल्ह्यातील तेलकुडगाव (ता. नेवासा) हे गाव ऊसशेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावातील साईनाथ काळे अडीच वर्षांपूर्वी नव्या ऊसजातीचा बेणे प्लाॅट तयार करण्याकडे वळले. दर्जेदार बेणे तयार करून आत्तापर्यंत ६०० टन बेणेविक्री साधली आहे. हा व्यवसाय त्यांना आर्थिक प्रगतीकडे नेणारा ठरला आहे.    नगर जिल्ह्यातील नेवासा आणि शेवगाव तालुक्याच्या सीमेवर साधारणपणे दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे तेलकुडगाव वसले आहे. या गावाच्या परिसरात सुमारे तीन साखर कारखाने आहेत. त्यामुळे या गावात ऊसशेती चांगली रुजली. उसाचे आगार म्हणूनच या परिसराची ओळख होते. गावातील बहुतांशी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उसाचे एकरी अधिक उत्पादन घेतात.त्यासाठी ठिबक सिंचन, सुधारित जातींचा अवलंब, यांत्रिकीकरण, पाचटाची कुट्टी अशा विविध घटकांचा वापर करतात. मागील चार ते पाच वर्षांपासून वाढत्या तीव्र पाणीटंचाईमुळे येथील शेतकरी चांगलेच काकुळतीला आले होते. त्यावर मात करण्यासाठी काहींनी उसासाठी सबसरफेस ठिबक पद्धतीचा अवलंब केला आहे.  

काळे यांची ऊसशेती  गावातील भीमराज काळे हे अनेक वर्षांपासून ऊसशेतीत कार्यरत आहे. साईनाथ आणि आप्पासाहेब ही त्यांची दोन मुले त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. आर्थिक अडचणींमुळे साईनाथ यांना आठवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे सोडावे लागले. आप्पासाहेब यांनीही दहावीपर्यंत शिक्षण घेऊन वडिलोपार्जित असलेली शेती कसण्यास सुरवात केली. वडिलोपार्जित साडेसात एकर शेती होती; परंतु गेल्या अडीच वर्षांपूर्वी शेवगाव तालुक्यातील दहिगाव घेवरी येथे नव्याने चार एकर शेती घेतली आहे. जमीन भारी असल्याने येथेही ऊस लागवडीचा निर्णय घेतला. 

सुधारित जातींचा विचार काळे यांचे एकरी उत्पादन पूर्वी ४० ते ४५ टनांच्या आसपासच होते. प्रयत्नपूर्वक त्यांनी ते आता ७५ ते ८० टनांपर्यंत नेले आहे. उत्पादनवाढीच्या अनुषंगाने त्यांचा विविध तज्ज्ञांसोबत संवादही होतो. गावापासून जवळच ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आहे. येथील व्यवस्थापक काकासाहेब शिंदे व ऊस विकास अधिकारी मंगेश नवले यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने नव्याने विकसित केलेल्या ०८०००५ या वाणाची माहिती मिळाली. त्याचबरोबर या वाणाच्या बेणे प्लाॅटसाठी प्रोत्साहितही केले. याच कारखान्यामध्ये त्यांचे मामा  गोरख कमानदार कार्यरत अाहेत. त्यांनीही या प्रयोगासाठी प्रेरित केले. कारखान्याने दोन टन बेणे उपलब्ध करून दिले. 

बेणेमळा लागवडीतील बाबी   नव्या जातीचा बेणेमळा घेण्याच्या दृष्टीने काळे यांनी शेताची सर्वतोपरी तयारी करून घेतली. त्यात मशागत. खते, पाणी यांचे योग्य नियोजन केले. सन २०१२ पासून पुढील तीन वर्षे दुष्काळाशी सामना करावा लागला; मात्र पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी काळे यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला. सध्या त्यांच्याकडे दोन बोअरबेल व एक विहीर आहे. 

बेणे प्लाॅटची विक्री   आॅक्टोबरमध्ये लागवड केलेला ऊस साधारण सात ते आठ महिन्यांत बेण्यासाठी तयार झाला. नवी सुधारित जात असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून त्यास चांगली मागणी आली. त्यानंतर सहा हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बेण्याची विक्री केली. साधारणपणे अडीच एकरांवरील उसाची विक्री बेणे म्हणून अल्पावधीतच झाली. यातून काळे यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर हे क्षेत्र चार ते पाच एकरांपर्यंत वाढवले. पुन्हा जानेवारी २०१७ मध्ये विक्री केली. गेल्या अडीच वर्षांच्या काळात सुमारे ११ एकरांवर तयार केलेल्या बेणेमळ्यातून सुमारे ६०० टन बेण्याची विक्री करण्यात काळे यांना यश मिळाले आहे. काही शेतकरी प्रतिगुंठ्यानुसार बेण्याची विक्री करतात. काळे यांनी सहा हजार रुपये प्रतिटन या दराप्रमाणे विक्री केली. त्यांना सुमारे सात ते आठ महिन्यांचा बेळेमळा तयार करण्यासाठी सुमारे ४५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च आला. त्यांनी उत्पन्नही उल्लेखनीय असेच मिळवले आहे. अलीकडील काळात शेतकरी पाच बाय दीड फूट किंवा साडेचार बाय  दोन फूट अशा अंतरावर लागवड करू लागले आहेत. एक डोळा पद्धतीचाही वापर वाढला आहे. त्या हिशेबाने त्यांचे बेण्याचे अर्थशास्त्र व्यवस्थित राहील असेच पाहिल्याचे काळे म्हणाले.     या भागातील शेतकऱ्यांकडून राहिली मागणी हिंगोली, नंदुरबार, बीड, जालना, कोपरगाव, सांगली, सातारा, भीमाशंकर, शेवगाव, राहुरी, पुणे, कर्नाटक

व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून मित्रांनी केला प्रचार काळे म्हणाले, की नव्या जातीच्या बेण्याची विक्री करायची होती. त्यासाठी संदीप घोडेचोर,ज्ञानेश्वर काळे, बालकनाथ काळे, सतीश काळे, मच्छिंद्र म्हस्के या मित्रांची मदत महत्त्वाची ठरली. पूर्वी माझ्याकडे व्हॉट्सॲप ग्रुपची सुविधा नव्हती. तेव्हा याच मित्रांनी मी तयार केलेल्या बेण्याचा विविध ग्रुप्समध्ये प्रचार केला. त्यातून शेतकरी ग्राहक वाढण्यास मदत झाली. नंदुरबार भागातील एका शेतकऱ्याने ३२ टन बेणे त्या माध्यमातूनच खरेदी केले. त्याचबरोबर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांनीही प्रचारासाठी मदत केल्याचे काळे म्हणाले.  

साध्य केलेल्या बाबी... 

  •  पूर्वीच्या ऊसशेतीत मर्यादित उत्पन्न मिळत होते. बेणेविक्रीतून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी प्राप्त झाली. 
  •  अन्य शेतकऱ्यांना खात्रीशीर बेणे मिळाले. 
  •  नव्या जातींच्या प्रयोगाविषयी आत्मविश्वास वाढला  
  •  बेणेविक्री व्यवसायामुळे उत्पन्नाचे शाश्वत साधन मिळाले. 
  •  भांडवल खेळते झाले. 
  •  हक्काचे घर बांधता आले. 
  • दोन भावांचे संयुक्त कुटुंब आप्पासाहेब व साईनाथ या दोन भावांचे कुटुंब संयुक्तपणे राहते. घरात आई-वडील व अन्य मिळून सुमारे १० ते ११ सदस्य आहेत. संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ शेतीवरच असतो. उसाच्या जोडीला कांदा, भुईमूग आदी पिके असतात.  

    दुष्काळ हीच मानली संधी  तीन-चार वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात गाव परिसरात अनेकांनी उसाची शेती थांबवली. त्यामुळे उसाची टंचाई निर्माण झाली. अशावेळी बेणेनिर्मिती हीच मुख्य संधी पुढ्यात दिसली. मग त्यावरच लक्ष केंद्रित केले, असे काळे म्हणाले.   : साईनाथ काळे, संपर्क ९७६३५१२२०६, ९७३०९९२२०६ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com