बिरभूमप्रकरणी आतापर्यंत २२ जणांना अटक

बिरभूम जिल्ह्यातील हिंसाचारप्रकरणी पश्‍चिम बंगाल पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांना अटक केली आहे. तृणमूल कॉग्रेसचे नेते बहादूर शेख यांची सोमवारी रात्री बागतुई येथे हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात दोन मुलांसह आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
22 people arrested so far in Birbhum case
22 people arrested so far in Birbhum case

कोलकता: बिरभूम (Birbhum) जिल्ह्यातील हिंसाचारप्रकरणी पश्‍चिम बंगाल पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांना अटक केली आहे. तृणमूल कॉग्रेसचे नेते बहादूर शेख (Bahadur Shekh) यांची सोमवारी रात्री बागतुई येथे हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात दोन मुलांसह आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीत मृत बहादूर शेख यांच्या मुलाचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी अन्य आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला.

हेही वाचा- वासरू संगोपनात ओळख क्रमां क महत्त्वाचा

बिरभूम जिल्ह्यातील रामपूरहटजवळील बागतुई येथील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी पश्‍चिम बंगाल सरकारने एसआयटी स्थापन केली असून अतिरिक्त महासंचालक (सीआयडी) ग्यानवंत सिंह (Gyanvant Sinh) यांच्या नेतृत्वाखाली घटनेची चौकशी करत आहे. याशिवाय घटनास्थळाची न्यायवैद्यक चाचणी करण्यात येत असून हिंसाचाराचे स्वरूप या तपासणीतून कळेल, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील या प्रकरणाचा तपासणी अहवाल राज्य सरकारकडे मागितला आहे. दरम्यान, डाव्या आघाडीने आज रामपूरहाट येथे मोर्चा काढला आणि हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी केली. हेही वाचा- शेणावरूनही ओळखा, जनावरांचे आरोग्य डाव्या आघाडीचे नेते बिमन बोस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. सामूहिक हत्याकांड अशा शब्दांत या घटनेचे बोस यांनी वर्णन केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचाही आरोप केला. या हल्ल्यात बेकायदा वाळू तस्करी करणाऱ्या लोकांचा सहभाग असल्याचाही दावा केला. निर्दयी हत्याकांड घडवून आणणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. रामपूरहाट परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त असून तणावाचे वातावरण आहे.

ममता काय म्हणाल्या

बिरभूम हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे. ममता म्हणाल्या, की सरकार आमचे असून आम्हाला जनतेची काळजी आहे. लोकांना त्रास होईल, असे आम्हाला कधीही वाटणार नाही. बिरभूमच्या रामपूरहाटची घटना दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आपण उद्या रामपूरहाटला जात आहोत. आपण या घटनेचे समर्थन करत नाही, परंतु गुजरात आणि राजस्थानमध्येही अशा प्रकारचा हिंसाचार घडला आहे. आम्ही निष्पक्ष कारवाई करू. हे बंगालचे राज्य असून उत्तर प्रदेशचे नाही. आपण तृणमूल कॉंग्रेसचे एक शिष्टमंडळ हाथरसला पाठवले होते. परंतु आम्हाला तेथे जाऊ दिले नाही. रामपूरहाटला येण्यापासून आम्ही कोणालाही रोखणार नाही, असे ममतांनी स्पष्ट केले.

राज्यपाल काय म्हणाले

बिरभूम हिंसाचारप्रकरणी राज्यपाल जगदीप धनकर यांनी बंगाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात केवळ हिंसाचार आणि अराजकतेचे वातावरण असल्याचे दिसून येते. मुख्य सचिवांकडे आपण अहवाल मागितला आहे. पीडित कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे धनकर म्हणाले.

गृहमंत्रालयाने मागितला अहवाल

बिरभूम जिल्ह्यातील हिंसाचारप्रकरणाची दखल घेत गृहमंत्रालयाने सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत, असे निर्देश दिले आहेत. पश्‍चिम बंगालचे अध्यक्ष सुकांतो मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या खासदारांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा या घटनेवर लक्ष ठेवून असून त्यांनी याप्रकरणी राज्य सरकारला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने देखील बिरभूमच्या पोलीस अधीक्षकांना आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावून माहिती मागितली आहे.

घटना काय घडली

बिरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथील तृणमूल कॉंग्रेसचे नेते बहादूर शेख यांच्यावर सोमवारी चार गुंडांनी हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संतापलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संशयितांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले. त्यामुळे ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांत दोन बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. याप्रकरणी काल ११ जणांना अटक केली होती. आज शेख यांच्या मुलासह आणखी ११ जणांना अटक केली. त्यामुळे आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य काही आरोपी पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com